Literature

अथ प्रथमोध्यायः

जो आत्मा देव गुरू । तीहीं रुपें साचारू ।
तो म्यां वंदिला परत्परू । अनन्य भावें ॥१॥

अन्य म्हणिजे दुजियासी । दुजेपण तें जो नासी ।
तथा गुरुपदीं मित्रत्वासी । ठाव कैसा ॥२॥

सोऽहं भावनेंचे नमन । श्रुतीचें ऐसें वचन ।
नमनीं नसेंचि भिन्नपणा । येणेंरीतीं ॥३॥

नमन दावी न मन । ऐक्यत्वाचेंचि हें मनन ।
नमीं म्हणताचि मी न । ऐसा अर्थु ॥४॥

सागरा जैं नमी नदी । तैं सांडोनि सकळ उपाधि ।
स्वयंची मग ती महोदधि । तेवींच हें ॥५॥

ऐक्य भावनेचा उमस । नमनाचा हा वृत्तिलेश ।
महोदधीं तरंग विकास । जयापरी ॥ ६ ॥

नमनें कल्पिजेल द्वैत । तरी तें निखळ अद्वैत ।
गुरुकृपा ही ऐसी विकसित । आमोद पसरी ॥ ७ ॥

ब्रह्मचि आपुल्या वैभवें । प्रगटे महीं स्वभावें ।
तेंचि गुरुरूप बरवें । तारूं जगा ॥ ८ ॥

निर्विषय सुखाची मूस । प्रगटे बरवेंपणें विशेष ।
उद्धरावया अशेष । जीव-जातां ॥ ९ ॥

सुवर्णाचें जेवी घडण। दावी अपूर्व बरवेपण।
ब्रह्मची तेवीं आपण । श्रीगुरुरूपें ॥ १० ॥

अलंकारें सुवर्णासी । नामरूपाची प्रौढी जैसी ।
तेवींच श्रीगुरुरूपेसी । शोभे परवस्तु ॥ ११ ॥

पंडितांचें पांडित्य । शोभे जैसें सभेत ।
तैसें गुरुरूप जगांत | महत्त्व ब्रह्मींचें ॥ १२ ॥

जेवीं माधुर्य प्रकट फळी । तेवीं परब्रह्मीं ही नव्हाळी ।
सद्गुरुरूपें सुकाळीं । लाभे जगा ॥ १३ ॥

संपूर्ण चिदानंद सोहळा । निज निरतिशयाचा पुतळा ।
सकळ आबाळ गोबळा । आत्मरूप ॥ १४ ॥

कारुण्याचा महोदधि। सकळ सौभाग्य जीवा साधी ।
शेखी सारूनि उपाधि । चिदानंदी मेळवी ॥ १५ ॥

वेदहृदयींचें गुह्यज्ञान | ब्रह्मादिकांचें कोरीव ध्यान ।
समाधानाचें नंदनवन । तो हा सद्गुरु ॥ १६ ॥

परमार्थाचें शुभ जनन । गुरु-भक्तिच्या कुशीं जाण ।
वाढीस लागे समाधान । चंद्रकोरेपरी ॥ १७ ॥

सत्यधर्माचा दिनकर । उजळी सकळ चराचर ।
नाशी सकळ अंधःकार । अज्ञानाचा ॥ १८ ॥

निज थोरपणें गौरव । हा तो सामान्य स्वभाव ।
शिष्यासी दे निज थोरीव । वैशिष्ट्य सद्गुरुंचें ॥ १९ ॥

सामर्थ्य जयाचें अघटित । न मोडतां ठाईचें अद्वैत ।
शिष्याकरवीं प्रबोधवीत । सर्व जगा ॥ २० ॥

म्हणोनीच नाम त्या समर्थ। निरसावया सकळ अनर्थ ।
उजळवी सत्य परमार्थ निजबोधरूपें ॥ २१ ॥

बीजापासोनी जेवीं फळ । फळीं जेवीं बीज सुढाळ ।
त्या बीजापासाव बीज निर्मळ । उपजे जेवीं ॥ २२ ॥

तेवींच हें मजपर्यंत आलें। मज पासाव तुम्हां भलें।
तैसेचि हैं पुढे चालें। अखंडित ॥ २३ ॥

गुरुकृपेचेनि बळें । मी तूं पण हे नाढळे।
तूं पण जावोनि आकळे । मीचि एक ॥ २४ ॥

मी या आत्मीय स्फूर्ति । तूं हे दुजेपण भ्रांति ।
मीचि तूं होतां विश्रांति । गुरुपदीं अनन्य ॥ २५ ॥

मीचि तूं हें शिष्या जाण । श्रीगुरुचें ऐसे वचन ।
जाणे जे ते शिष्य आपण । परब्रह्म सद्गुरु ॥ २६ ॥

गुरुशिष्या एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।
परि या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २७ ॥

इति प्रथमोध्यायः

home-last-sec-img