Literature

अथ सप्तमोऽध्यायः

सुखाच्या मालिका दाविती । एकाहूनि चढ एक रीती ।
श्रेष्ठ सुख न उमजति । बोधिती साधन ॥ १ ॥

मंत्र तंत्र वनस्पति । ध्यान धारणा योगस्थिती ।
साधनसिद्धि मिळविती । बोधिती लोकां ॥ २ ॥

विषयलोलुप जे नर । चाकाटती लहान थोर ।
सामर्थ्य देखोनि पामर । सदगुरू म्हणती ॥ ३ ॥

परी ते नव्हेत सद्गुरू । दृढ करिती हा संसारू ।
संसारसमुद्रीचें तारू । तो सद्गुरू वेगळा ॥ ४ ॥

जो सामर्थ्याचें पिसे लावी। देहाभिमान वाढवी ।
विषयजाळी आडकवी । तो हितशत्रु ॥ ५ ॥

हा तो अविद्येचा हस्तक । गोमुख व्याघ्रचि निःशंक ।
सद्गुरुवेषे भुलवीं लोक । गोवी संसारीं ॥ ६ ॥

मायीक सामर्थ्य केतुलें । तुच्छ देहा गौरवी चलें ।
नसतेंचि सुख ऊभवी वहिलें । दृश्य रूपे ।। ७ ।।

जो दृश्य सारूनि आघवें । मोडी अविद्येचे पुंडावे ।
जन्ममरण ज्याने दुरावें। तो सद्गुरु ।। ८ ।।

जेणें विषयवासना झडे । जेणें देहाभिमान उडे ।
जेणें मायेचें कौटाळ मोडे । तो सद्गुरु ।। ९ ।।

तारतम्य सुखे मिडकणें । साधनाभ्रमे भरंगळणें ।
भिन्न सुखाच्या भरी भरणें । चुकवी सद्गुरु ॥ १० ॥

परतें परतें सुख पाहें । पराधिक्ये दुःख लाहें ।
विषयसौख्य तृप्ति नोहें । इह परत्र ।। ११ ।।

अतिशय सुख शांति । मिळेल मानणे भ्रांति ।
जो मेळवी अनंतीं । तो सद्गुरू ॥ १२ ॥

जेणें ईशत्वहि तुच्छ वाटें । नाना लाघवीं माया आटे ।
सकळ दृश्य हें ओहट । तो सद्गुरू ॥ १३ ॥

जेणे भिन्नपण तें वाव । जेणें उरे स्वयमेव ।
सकळ कार्याचा जेणे अभाव । तो सद्गुरू ॥ १४ ॥

जो जीव उपाधि घालवी । जो ईश उपाधि मालवी ।
निजींच जो पूर्णत्व दावीं । तो सद्गुरु ॥ १५ ॥

सकळापूर्वी जे संचलें। कारण तें स्वतः पूर्व भलें ।
त्यावेगळे जे मानितलें । तें भ्रमरूप ॥ १६ ॥

स्वतः पूर्ण त्याकारणीं । अल्प कार्याची उभारणी ।
निष्प्रयोजक जो मानी । तो सद्गुरू ॥ १७ ॥

स्वयंवेद्य त्या कारणी । भिन्न कार्याची कहाणी ।
सांगणे ज्यासी मानहानी । तो सद्गुरू ॥ १८ ॥

मिश्र कार्याचा सुगावा । भिन्न सुखाचा हेलकावा ।
ज्यांन संस्कारचि याचा ठावा । तो सद्गुरु ॥ १९ ॥

जीवेश्वराचे वैभव | वंध्यासंततीची थोरीव ।
जो पुसूनि टाकी याचा ठाव । तो सद्गुरु ॥ २० ॥

एकपण जें संचलें । जेथें दुजें न काही झालें ।
तें दे ब्रह्मपद आपुलें । तो सद्गुरु ॥ २१ ॥

जो एकेक पडदा कोशाचा । सारूनि पटवी साचा ।
प्रकाशिता मी सर्वांचा । तो सद्गुरु ॥ २२ ॥

पिंड ब्रह्मांड देखणे । नासूनि निजात्मरंगी रमणें ।
ऐसें जयाचें हें करणें । तो सद्गुरु ॥ २३ ॥

मायानगरी ओस पाडिली। कामादिकांची होळी केली ।
ज्याने आत्मसुखाची गुढी उभविली । तो सद्गुरू ॥ २४ ॥

सकळ भिन्नवार्ता मालवूनि श्रेष्ठ । सुख जे सकळाहूनि ।
निजींच जो दावी उकलूनि । तो सद्गुरू ॥ २५ ॥

सारूनि जीवेश्वराचें भान । करूनि तत्वपदाचें शोधन ।
मी या अनुभवाची दावी खुण । तो सद्गुरू ॥ २६ ॥

ऐसा माझा सद्गुरू । जो समर्थपणें उदारू ।
जया कृपें पैलपारू । पावले अनेक ।। २७ ।।

चकवून सर्वाहि अनर्था । लावोनि मजला परमार्था ।
मेळविले ब्रह्मींच्या स्वार्था । मज या दयाघनें ॥ २८ ॥

मायेचा फेरा चुकवी । निजकृपे ब्रह्मीं मेळवी ।
तेणें ज्यां समर्थ पदवी । नमी त्यासी ॥ २९ ॥

‘अहं ब्रह्म’ याचें निरूपण । बृहदारण्यकाचें वचन ।
दाविलें स्पष्ट करून । सद्गुरुकृपें ॥ ३० ॥

अहं स्फूर्तिचें निजमूळ । जे का स्वयंप्रकाश केवळ ।
तें ब्रह्मचि एक निर्मळ । होऊनि रहावें ॥ ३१ ॥

दृश्य पाहणे मनासी । अखंड असे अभ्यास तरी ।
सारूनि सकळ उपाधिसी । उरवावे आपण ॥ ३२ ॥

सकळ दृश्यामाजि आपण । सकळ कल्पनामाजीहि जाण ।
अद्वितीय स्वप्रभ उरून । मनां पाहवावें ॥ ३३ ॥

सूर्याचे जेवीं किरण । तेवीं अहं याचेचि भान ।
सकळी ज्ञानमात्र उरवून । मन बोधावें ॥ ३४ ॥

सकळ घटजळीं दृश्य झालें । सूर्या प्रतिबिंब जैसे आपूले ।
सर्वी अहंरूपीं भले । चिद्रूप आपण ॥ ३५ ॥

घटामाजी मृत्तिका जेवीं । आपुली ऐक्यता दावी ।
निजनिर्विकारता दिसावी । तेवीं सर्वा ॥ ३६ ॥

सूर्याकडे आरसा धरितां । कवडासा न दिसे तत्वतां ।
निज चिद्रूपों अहं मिळतां । भास मावळें ॥ ३७ ॥

निज चिद्धनी अहंपण । उमसोचि न देतां जाण ।
मनाचें चुकवावें अनुसंधान । निर्विकल्पों ॥ ३८ ॥

आपणचि जै स्वभाव उरे । तै अन्याचा विचार विसरे ।
मग निर्विकल्पता स्थिरे । हळु हळु ॥ ३९ ॥

भानरहित निर्विकल्प । तेंचि आपुलें स्वरूप ।
ज्ञानमात्र न आरोप । कसल्याचाहि ॥ ४० ॥

इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधरस्वामी विरचित सप्ताध्यायी समाप्त

home-last-sec-img