Literature

अपरिहार्य ईशसृष्टि

ईशसंकल्पाप्रमाणे प्रत्येक प्राणीपदार्थांना एकेका स्वरूपाची झाली आहे. त्याला त्याला एक व्यावहारिक सत्यत्व आलें आहे. या सत्यत्वाच्या आधारें जगाचा व्यवहार चालला आहे. निर्वाह होत आहे. मनोमय म्हणून आपल्या इच्छेनें या ईशसृष्टीला वाटेल तें वेगळे रूप देणें कोणालाहि शक्य नाहीं. असें झालें असतें तर आतांपर्यंत ही सृष्टि राहतीच ना! जग उत्पन्न कर त्यांत प्रवेश करणें, त्याचें पालनपोषण करणें, नियमन करणे, त्याच्या कालावसा आपल्यांत त्याचा लय करून घेणें, त्यांच्या त्यांच्या कर्माचें तें तें फळ त्यांना

त्या त्या वेळी बिनचूक देणें, इत्यादि ईशकार्यात ढवळाढवळ करतां येत नाहीं व कोणालाहि हा अधिकार संपादितां येत नाहीं. एकाच वेळी सर्वस्वतंत्र असे दोन ईश्वर असूं शकत नाहींत. सर्वश्रेष्ठत्व एकालाच असू शकते. सर्वांनाच तो अधिकार मिळाला व तें सामर्थ्य आलें तर व्यक्ति तितक्या प्रकृति होऊन प्रत्येक जण आपापली सृष्टि नवीन नवीन निर्माण करील व कोणी कुणाच्या सृष्टींत राहाणारच नाहीं. निर्माण केलेल्या सृष्टीतहि प्रतिव्यक्ति पुनः पुनः सृष्टि उत्पन्न करीत राहील आणि एकाहि सृष्टीला नियमबद्वता आणि स्थायित्व राहाणार नाही, एकसूत्रीपणा राहाणार नाही. त्या सृष्टीची व्यवस्थाहि असू शकणार नाहीं. एकसूत्रीपणा राहावयास सर्व सत्ता एकाच्याच हातीं असावी लागते, एकचालका नुवर्तित्व असावें लागते. नाहीतर एकाला सृष्टि उत्पन्न करावी वाटते न वाटते तोच दुसऱ्याला ती नष्ट करावी असे वाटेल. एकाहि सृष्टीला व सृष्टीच्या एका पदार्थालाहि स्थिरस्थायित्व लाभणार नाही. उत्पत्ति व लय अशा परस्परविरुद्ध घटना एकापाठीमागून एक त्वरेनें होऊं लागतील. समबलामुळे कुणालाहि आपली सृष्टि दुसऱ्याच्या आघाताविरुद्ध आणि इच्छेविरुद्ध कायम ठेवतां यावयाची नाहीं. एकहि सृष्टि टिकाव धरून राहणार नाही. तशी ती राहावयाची झाल्यास दुसऱ्याच्या स्वतंत्रतेला आळा घालणारा आणि दुसऱ्याच्या आघात इच्छेविरुद्ध आपली सृष्टि अबाधितपणें यथास्थित राखू शकणारा, सर्वतोपर सर्वाधिक शक्तीचा असा कोणी तरी एक असावा लागतो; व यामुळेच सृष्टि चालते. असें झालें कीं ‘ एकेश्वर’सिद्धि होते. अखिल विश्वाला ‘ कर्तुमकर्त मन्यथा कर्तुं समर्थ असा एकच एक परमेश्वर आहे असें मानावें लागतें व त्याच्या सत्तेत इतरांना वागावे लागतें व अपरिहार्यशील ईशसृष्टि होते. स एष एक एक वृदेक एव । (अथर्व. १३-५-७)–ईश्वर हा एक खरोखरच एक आहे. एक एव नमस्यो विश्वीऽयः । (अथर्व. २।२।१ ) – सर्व प्रजेत एक परमेश्वरच सर्वतोपरि वंद्य व स्तुत्य आहे. न तु तद्वितीयमस्ति। त्याला प्रति स्पर्धी नाहीं. त्याचे अबाधित नियम पाळावयालाच पाहिजेत. आकाश, वायु, अग्नि, जल व भूमि अशा या पंचभूतांची ही सृष्टि अन्यथा कोण करूं शकेल? य ईशेऽस्य द्विपदश्चतुष्पदः । अखिल द्विपाद, चतुष्पादादि सृष्टीवर त्याचेंच एक प्रभुत्व चालतें. दोन आणि दोन चार असेंच म्हटले पाहिजे; मनोमय म्हणून सहा म्हणतां येणार नाहीं; व सहा धरून व्यवहार सुरळीत चालणार नाही. ईशसृष्टीचे नियम उल्लंधिण्यास कोणीहि समर्थ नाहीं. हें एक पंचभूतांच्या गुणधर्मावरूनहि दिसून येण्यासारखे आहे. पेरलेलें बी उगवून, वृक्षरूपानें फोफावतें. त्याला गोड फळे लागतात. नऊ महिने गर्भात वाढ होऊन कर चरणादि अवयवांनी युक्त होऊन प्राणी जन्माला येतो. श्रवण, नयन, कर, चरणादि अवयवांनीं जगत्-व्यवहार चालवितो. त्याचा देह अनेक कार्य क्षेत्रांत वावरण्यास कार्यक्षम होतो. मनुष्यांत विवेकशक्ति उत्पन्न होते. हे सर्व परमात्म्याच्या सृष्टीचे आश्चर्यकारक नियम आहेत. ईशप्रणीत कायदे मानावे लागतात. कायदे म्हणून असावेच लागतात. त्याविषयींच्या नियमावलीचा एक ग्रंथहि असावाच लागतो. श्रुतिशास्त्रवचन हितकर असतें. त्यांत सांगितलेल्या ग्राह्याग्राह्य विचाराचेच अवलंबन केले पाहिजे. श्रुतिस्मृति या परमेश्वराच्या आज्ञा आहेत; ते शासनग्रंथ आहेत.

home-last-sec-img