Literature

अपरोक्षज्ञान २

‘अस्ति ब्रह्मेति चेवेव परोक्षज्ञानमेव तत् । अहं ब्रह्मेति चेद्वेव अपरोक्षं तदुच्यते || ”

ज्या ठिकाणी कोणतेहि अनिष्ट नाही, जेथे सर्व दुःखांचा अत्यंत अभाव आहे, सर्व कार्यकारण संघातांच्या पूर्वीपासून जे आहे, जे केव्हांहि कोठेहि कधीहि विकार पावत नाही व सर्वांचे निज अधिष्ठानरूप असते असे जे अनंतानंत आनंदरूप तेच ब्रह्म होय. आपले मूळस्वरूप असणाऱ्या त्या ब्रह्मरूपात विलीन होऊन सर्व जीवमात्र कृतार्थ होतात. खरा आनंद प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास आपण आपले मूळस्वरूप प्राप्त करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून आपणही तेच प्राप्त करून घेतले पाहिजे. त्याकरताच जीवन जगले पाहिजे, असा अंतःकरणात भाव निर्माण होणे म्हणजेच ‘परोक्ष’. रज्जुसर्प न्यायामध्ये रज्नु हे अधिष्ठान असते त्याचप्रमाणे ह्या सृष्टीतील सर्व कार्यकारण संघातांना अधिष्ठान असलेले परमपवित्र आनंदरूप आपणच आहो हे निश्चितपणे समजावे. ते प्राप्त करून घेण्यातच शांति व तृप्ति आहे. त्यात इतर दुसरे कोणतेहि नसून केवळ एकमेव आनंदस्वरूप अशी जी जाणीव तेच ‘अपरोक्षज्ञान’ होय. जे ज्ञान बाह्य अशा कोणत्याहि नामरूपाने किंवा अंतःकरणातील कोणत्याही वृत्तीच्या जाणिवेस कारण न होता अंतर्बाह्य उत्थानरहित निर्वात दीपाप्रमाणे निश्चल असे प्रकाशरूप वृत्तीच्या पलीकडील असून त्यालाच ते ‘हढापरोक्षज्ञान’ असे म्हणतात.

‘अञ्चति प्रकाशते इति आत्मा ।’ कोणतेही आवरण व कोणतेही विक्षेप- चांचल्य नसलेला; सर्व ठिकाणी स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारा म्हणजेच निर्विकल्प असा एक आनंदरूपच असलेला ‘आत्मा’ होय. ‘आत्मा म्हणिजे तो आपण । आत्मा म्हणजे आपण स्वतःच जो स्वतःचा साक्षात्कार किंवा आपल्या स्वतःच्या रूपाचे ज्ञान तोच ‘आत्मसाक्षात्कार’. अशा प्रकारे स्वतः होणे ह्यासच ‘आत्मसाक्षात्कार’ म्हणतात. प्रत्येक जीवास श्रुतिमाता ‘तत्त्वमसि’ म्हणजे तूच तो आहेस असे समजवून सांगते. नेहमी एकरूप असणाऱ्या तुझ्यावर बांझेच्या पुत्राप्रमाणे लादलेल्या विक्षेपाने भासमान होणाऱ्या पिंड, ब्रह्मांड, जीवेश इत्यादि भ्रमरूप अशा कोणत्याहि भावनांना वश न होता म्हणजेच ह्यापैकी कशातहि मृगजलातील सूर्यप्रकाशाप्रमाणे न राहता, निर्विकारी अशा एकमेव सूर्यप्रकाशाप्रमाणे अद्वितीय असा एक आनंदघनरूप तूच आहेस ही सत्य गोष्ट आहे, असे ज्ञान होणे ह्यालाच ‘तत्त्वबोध व ‘तत्त्वनिदर्शन’ असे श्रुतिमाता म्हणते. योग्य स्वानुभवाने मुक्ति प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्या साधकांना वरीलप्रमाणेच त्याचे सद्गुरू उपदेश करीत असतात.

‘ईश प्रसादात सद्गुरोः प्रसादात् श्वेताश्वेतरोऽध विद्वान्’

ईश प्रसादाने व श्रीगुरू कृपेने श्वेताश्वेतर ऋषि आत्मतत्त्व समजू शकले असे श्वेताश्वेतरोथ उपनिषदाच्या शेवटी म्हटले आहे. ह्या वचनावरून आत्मज्ञान होण्यासाठी देव व गुरू ह्या दोघांची कृपा होणे आवश्यक आहे. हा सिद्धांत असला तरी ही ईश्वरकृपा मिळवून शेवटी मिळविण्यास योग्य असे आनंदरूप, स्वतःला स्वतः समजून घेणे हा विनोदच नाही काय ? स्वतःच स्वतःला प्राप्त करून घेणे हाच त्याचा अर्थ. आपण आनंदघनरूपी वृक्ष असताना, केव्हांहि नाश पावणारा दुर्गंधीयुक्त देहच मी आहे असे समजून, घृणा उत्पन्न करणारे घाणेरडे विषयजनित सुख हेच आत्मसुख समजून, निरनिराळ्या प्रकाराने त्याचा अनुभव घेऊन, त्याने शाश्वत सुखसमाधान प्राप्त होत नाही म्हणून त्यापासून परावृत्त होऊन खरे सुख प्राप्त करून घेण्यास प्रयत्नशील रहावे व उपासना आणि श्रीगुरुसेवा संपूर्णपणे करून देव श्रीगुरु ह्यांचा अनुग्रह मिळवून, आपण म्हणजे हा घाणेरडा देह नव्हे, हे सर्व आहे त्याच स्थितीत राहणारा व शेवटी एकमेव शिल्लक उरणारा (राहणारा) आत्माच होय हे पूर्णपणे जाणून, झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा अशा चुका होणार नाहीत अशी दक्षता बाळगून, स्वतःचे रक्षण स्वतःच करणे, हे आपले इतिकर्तव्य होय. आपण एका डोंगराच्या पलीकडे अडकून पडलो होतो. अनेक वर्षे काबाडकष्ट करून तो डोंगर भुईसपाट करून आपण आता कोणत्याहि डोंगराच्या आड नसून पूर्वीप्रमाणे होतो तसेच आहोत असे ज्ञान होताच आपल्या पूर्वीच्या अज्ञानाबद्दल आपणास हसू येईल कारण –

‘कालत्रये यथा सर्पो रखो नास्ति तथा मयि । अहंकारादि देहान्तं जगन्नास्त्यहमदयः ||’

आत्मप्रबोध उपनिषदाच्या शेवटी हे वचन आहे. रवत सर्प जसा त्रिकालांत असू शकत नाही त्याचप्रमाणे माझ्या अद्वय स्वरूपात अहंकारापासून देहापर्यंतचे सर्व जग अस्तित्वात नाही. व शिंपल्यात जशी चांदीची भावना होते तसेच मूर्ख मनुष्य देह म्हणजेच आत्मा असे समजतो. रज्जू हा सर्प नाही हे समजावून देणारा तोच आप्त व सद्गुरू समजावा व ते समजण्यासाठी आवश्यक असे जे ज्ञान तीच ‘परमात्मकृपा’ होय. सत्याचे ज्ञान होण्यासाठी ह्याची आवश्यकता आहे.

‘सर्पत्वेन यथा रञ्जु रजतत्वेन शुक्तिका । विनिर्णीता विमूढेन देहत्वेन तथाऽऽत्मता ।।’ हा योगशिखोपनिषदांतील श्लोक आहे. रज्जूत जशी सर्पभावना

आपण आहो म्हणजेच जग आहे अशी एक म्हण आपणास माहीत आहे. आपल्या अस्तित्वामुळेच तिन्ही लोकांचे अस्तित्व जाणवते. आपण नसलो म्हणजेच आपली जाणीव नसल्यास तिन्ही लोकांची जाणीवही रहात नाही. ‘आप गये पिछे डुब गयी दुनिया’ ही संत कबिरोक्ती विसरून चालणार नाही. जागृति व स्वप्न ह्यांत स्पष्टास्पष्ट असलेली मीपणाची जाणीव गाढ झोपेत असूच शकत नाही. त्याप्रमाणें जागृति-स्वप्न जिथे नाहीत तिथे तिन्ही लोकहि नाहीत हे उघड होते. हा अनुभव सर्वांनाच आहे.

खरे सुख हवे असेल तर इतर कशाचीहि जाणीव किंवा वृत्ति उद्भवू न देता निर्विकल्पपणे तूं ज्या आनंदरूपात आहेस त्यातच रहा, ‘तत्त्वमसि’ ह्या महावाक्याच्या उपदेशाचे आचरण कर. अन्यथा बहिर्मुख होऊन कांही तरी कल्पना करून घेऊन कोणत्या तरी स्त्री पुरुषांची आकृति किंवा पदार्थ ह्यासंबंधी सुखाची मृगजळवतू कल्पना करून घेऊन आपले स्वतःचे योग्य ते ज्ञान म्हणजेच केवळ आनंदस्वरूप अशा निर्विकल्प समाधीपासून वंचित होऊ नकोस. अद्वितीय अशा आत्मानंदात सुखी होणे हेच योग्य नव्हे काय ? जलद कार्य कर असे दुसरे कोणतेच साधन आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजेच स्वतःची ओळख किंवा साक्षात्कार स्वतःची ओळख किंवा साक्षात्कार स्वतःस होण्यास दुसरे कोणते साधन असणार ? स्वतःच स्वतःस समजून उमजून घेऊन आनंदरूपात लीन होण्यासाठी दुसरे कोणतेच साधन नाही. शून्यरूप असलेले आकाश कोणत्या जाणीवेने दृग्गोचर होते ? इंद्रिये व मन ह्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडे असलेली वृत्ती, आनंद हा दृग्गोचर होत नाही. त्याला नामरूपहि नाही. त्याचे वर्णन करणेहि असंभवच. गाढ निद्रेत जशी फक्त आनंदाची जाणीव असते त्याचप्रमाणे आपल्याच प्रकाशाने आपली जाणीव करून देणारा जो आनंद तोच ‘मी’ होय. एक कल्पना संपून दुसरी कल्पना सुचण्याच्या मध्यंतरात कोणतीच कल्पना नसून फक्त आनंदच असणारी जी स्थिती तीच ‘मी’, ही जाणीव सतत असणे व ती वारंवार लक्षात ठेवून ‘मी केवळ आनंदस्वरूपच आहे’ हे जाणून घेऊन निर्विकल्पतेने एकांतांत सातत्याने अभ्यास करणे हीच आत्मसाक्षात्काराची नसावा.

आवरणविक्षेप हीच समाधीची विघ्ने होत. आवरण नाहीये झाल्याशिवाय आत्मबुद्धी उत्पन्न होणार नाही. आत्मबुद्धीची जाणीव झाल्याशिवाय वैषयिक कल्पना म्हणजेच विक्षेप नाहीसा होणार नाही. मन वाटेल तिकडे धावत सुटते. स्वरूपाचे आवरणविक्षेपांनी युक्त असे विचार चित्तात असतात त्यामुळे आत्मरूपाची जाणीव म्हणजेच चितू किंवा ज्ञान ह्यांच्यामध्ये आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे जडरूप देहादि, नामरूपाचे आभास जलतरंगाप्रमाणे उत्पन्न होतात व ते अति चंचल असतात. चित्तात अशा रीतीने जड नामरूपे आणि त्यांची जाणीव करून देणारे जे चित् ह्या दोघांच्या संमिश्रणाला ‘चिज्जडग्रंथी’ असे म्हणतात. ‘चित्त’ शब्दाचे स्पष्टीकरण ‘चित् + त’ अशा प्रकारे होते. ‘चित्’ म्हणजे निश्चल सूर्यप्रकाशवत् आनंदरूप प्रकाशाने प्रकाशणाऱ्या आत्मरूपाची जाणीव व ‘त’ म्हणजे आरशात दिसणारा प्रतिबिंबरूपी आभास किंवा अनेक नामरूपांनी युक्त असा विषयांचा चंचलाभास. आरशात ज्यामुळे आभास उत्पन्न होतो त्या वस्तू काढून टाकल्यास निराभास म्हणजेच पूर्वीप्रमाणे निश्चळ असा फक्त आरसाच शिल्लक रहातो. तसेच चित् ह्यामध्ये जलतरंगाप्रमाणे नामरूपाचा जो चंचल आभास आहे त्याला उत्पन्न करणाऱ्या अनेक संस्कारांचा म्हणजे ‘त’ काराचा किंवा जगच्चित्राचा त्याग केल्यास निराभासपणे नेहमीच्या स्वरूपात निश्चळ असे एक ‘चितू’ म्हणजेच ज्ञानानंदस्वरूपी आत्मरूपच शिल्लक राहाते.

ओढयाच्या उगमापासून लहान प्रमाणात उत्पन्न होऊन पुढे पुढे सरकणाऱ्या, हळूहळू मोठा होत होत तरंगत जाणाऱ्या व शेवटी फुटून पाण्यातच एकरूप होणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे ह्या देहरूपी ओहोळाच्या उगमापासून म्हणजेच हृदयाच्या खालच्या बाजूस असलेल्या नाभिभागापासून लहान प्रमाणात वृत्तिरूप बुडबुडे उत्पन्न होऊन हळूहळू मोठे होऊन देहात असणारे ‘चित’ म्हणजेच ज्ञान काही काळ नामरूपरूपी प्रवाहात वहात जाऊन शेवटी फुटून निश्चळ अशा ज्ञानात विलीन होणारेच ते ‘चित्’ होय. पाणी व बुडबुडा यांत वेगळेपणा नसतो. त्याचप्रमाणे देहामधील चिदानंदरूपी आत्मा आणि चित्त हे काही वेगळे नाहीत. पाण्याहून वेगळा दिसणारा बुडबुडा पाण्याहून वेगळा नसतो. तो पाणीरूपच असतो. त्याप्रमाणें मुळापासून विचार केल्यास चित्त आणि चित् ही वेगळी रूपे दिसत असली तरी त्यांचे रूप म्हणजेच निश्चल ज्ञान होय.

वान्यामुळे समुद्रावर उद्भवणाऱ्या निरनिराळ्या आकाराच्या लाटा ह्या पाणीच असतात. त्याचप्रमाणे माया अथवा संसार ह्यामुळे ब्रह्मांडात उद्भवणारी निरनिराळी आकाररूपे ही एकाच निश्चल अशा आनंदरूप आत्म्याचे केवळ हगुस्वरूप होय. लाट ही पाण्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे असे समजून ती लाट काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्या लाटेचा आकार नाहीसा होऊन निव्वळ पाणीच आपल्या हातात येईल. त्याप्रमाणेच चित्तवृत्ती म्हणजेच कोठल्या तरी नामरूपाचा आभास वेगळा आहे असे समजून त्याचा पूर्ण विचार केल्यास तेथे फक्त चित्तच आहे असे आपणांस आढळून येईल आणि ते म्हणजेच निश्वळ, निर्गुण, निराकार आनंद म्हणजे आत्मा होय हे लक्षात येईल. जगातील आभास किंवा भ्रम नाहीसा केल्यावर आनंदमहोदधिरूपी केवळ संपूर्ण ज्ञानरूप शिल्लक रहाते. त्यास ‘जीवेश’ असे म्हणतात. तेथे फक्त जग, चित्त ही नावे शिल्लक न राहता केवळ ब्रह्मच शिल्लक राहते, त्यालाच ‘आत्मसाक्षात्कार’ असे म्हणतात. वान्यामुळे परिणामस्वरूप दिसणाऱ्या लाटा समुद्रावर न दिसल्यास जसे निव्वळ पाणीच दृग्गोचर होते त्याचप्रमाणे सर्व आभास नाहीसे झाल्यावर आपले मूळस्वरूप म्हणजेच निर्विकल्प निश्चल आनंदरूप अशी जी निष्ठा तिलाच ज्ञानी लोक दृढापरोक्ष आत्मसाक्षात्कार’ असे म्हणतात.

सर्वाना प्रकाश देऊन स्वतः चिन्मात्र आनंदघन आत्मस्वरूप असलेल्या जागृतीत सर्वांना साक्षीभूत असलेल्या आत्मरूपामुळे सर्वांना मीपणाची जाणीव होते. आपण स्वतःस पाहण्यासाठी आरशाचा उपयोग करतो. आरशामध्ये कान, डोळा, जीभ इत्यादी पंचज्ञानेंद्रिये दृष्टीस पडतात व त्याद्वाराच शरीरस्थ आत्म्याचे ज्ञान होते. इतर कशाचेंहि होत नाही. बाह्य त्वचा ही जड आहे. त्यामुळे तिला जाणीव नाही. आकाशात ढग आल्याने सूर्य आच्छादला जाऊन त्याचा प्रकाश कमी वाटतो किंवा कमी दिसतो. त्याचप्रमाणे वृत्तीचे अति घन आवरण आल्यास ती आत्मस्मृतीस झाकू शकते. ते आवरण नाहीसे झाल्यासच स्वतःचे ज्ञान होऊ शकते. आत्मस्मृतीची स्फूर्ति पूर्णपणे विकसित झाल्यास पूर्ण जागृति प्राप्त होते. आत्मस्मृती ज्या आवरणामुळे झाकली जाते तीच ‘अविद्या’ होय. अविद्यारूपी आवरण नाहीसे करून बाहेर आलेली आत्मस्मृती म्हणजेच ‘अहं’ चे स्फुरण होय. अशी आत्मस्मृती झालेल्यांना स्वप्नभासाप्रमाणेच जग हे मिथ्याभास वाटते. अशा वेळेस ह्या जागृतीत होणारे सर्व व्यवहार कोणत्याहि प्रकाराने होत असले तरी ते इतस्ततः पळणाऱ्या मानवी चित्राप्रमाणे म्हणजेच सिनेमाप्रमाणे निश्चलच होत. चित्रसृष्टी व स्वप्नसृष्टीप्रमाणे जागृत सृष्टीतील कोणताहि व्यवहार आभासयुक्त असून त्याची केवळ जाणीव मात्र सत्य स्वरूपात भासते. अभ्र ज्याप्रमाणे सूर्यास आवरण घालते त्याप्रमाणे मायेने ब्रह्म झांकले जाते आणि त्या मायेमुळेच जगसृष्टीचा भास होतो. I

महतोऽहंकारः अव्यक्तान्महत् । अहंकारात्पंचतन्मात्राणि । पंचतन्मात्रेभ्यो पंचमहाभूतानि । पंचमहाभूतेभ्योऽखिलं जगत् । ह्याप्रमाणेच ही मालिका आहे. ह्यावरून विचार केल्यास अव्यक्तापासून क्रमाने उत्पन्न होणारे विक्षेपसंकल्परूपी ‘महतू’ नावाचे स्वप्न, त्यापासून पूर्ण विकसित अशी जागृती व तिच्यापासून ब्रह्मांड व्यक्त होते. हे सर्व परमेश्वराशी संबंधित आहेत. ईश व जीव ह्यामध्ये हा सर्व आभासच होय. ह्यांत आनंद व भावना व्यक्त होत असून केवलानंदच मात्र झाकला जातो. पिंडब्रह्माडांचा अभिमानी असा जो जीवेश्वर तो केवळ आनंदघनब्रह्मस्वरूप असतानाहि मीपणाची जाणीव, स्फटिकांत जसे निरनिराळे रंग दृग्गोचर होतात त्याप्रमाणे निरनिराळ्या उपाधींनी विक्षेप पावून त्यातून जीवेश्वराचे सृष्टिवैचित्र्य भासमान होते.

‘आधारमानन्दमखण्डबोथं यस्मिन् लयं याति पुरत्रयं च ।’ दिसणारे पिंडब्रह्मांड व त्याचा अभिमान बाळगणारे जीवेश ह्यांना जागृतादि अवस्थांमुळे आणि माया अविद्येच्या उपाधीमुळे घडणाऱ्या कार्याच्या आभासाला, चित्रांना ज्याप्रमाणे पडदा किंवा भिंत आधार असते त्याप्रमाणे त्यांच्या पाठीशी असणारे आनंदघन ब्रह्मच आधार असते. तेच जीवेशपिंडब्रह्मांडाचे यथार्थ रूप होय. आवरण विक्षेपामुळे घडणान्या दृश्याभासात आनंद स्वरूपांतच सर्व विलीन झाल्यास तेथे वस्तूंचे अस्तित्व व आभास ह एक निश्चल असें केवळ आनंदरूपच आभासविरहित अपरोक्षज्ञान शिल्लक राहिल्यास त्यासच निर्विकल्प आनंदरूप ‘आत्मसाक्षात्कार’ म्हणतात.

प्रकाशच जगाचे जीवन होय. सर्व दृश्य पदार्थ नष्ट झाल्यावर केवळ प्रकाशच शिल्लक राहतो; त्याप्रमाणे नामरूपात्मक जग नष्ट झाल्यावर तेथे केवळ प्रकाशच शिल्लक असतो. हे जग प्रकाशित करणाऱ्या सूर्यचंद्रांना प्रकाश देणारा जो आनंदरूप प्रकाश म्हणजेच आनंदाची जाणीव शिल्लक राहते.

सर्व मुमुक्षु साधकांना अशा प्रकारचा आनंदरूप दृढापरोक्ष आत्मसाक्षात्कार होवो !!

हरिः ॐ तत्सत्!

home-last-sec-img