Literature

अमृतवाणी

भाग 1

बाळांनो! पहा आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुमुखाने तत्वज्ञान जाणून घ्यावयाचा एक महान मंगलमय दिवस. हे पहा, सर्व प्रकारच्या संख्यांचे प्रथम मूळरूप एक हेच ना? ती एक ही संख्या सर्व संख्यांमधून व्यापून आहे. एक हेच सर्व संख्यांचे यथार्थरूप. असेच या अनेकविध जगात सर्वप्रथम एकमेव आनंदरूप परमात्माच होता. तो एक परमात्माच अनेक होण्याच्या आपल्या संकल्पाद्वारे विविधरूप झाला. त्या अनेक रूपामधून हे मंगलमय परमत्मतत्त्वच एकमेव भरून राहिले आहे. ते एकच सर्व आहे. तेच सर्वांचे स्वरूप. हाच एक आनंदरूप परमात्मा. त्यामुळे आपण सगळेहि एक परमत्त्वतत्त्वच. अशा ह्या एकमेव असणाऱ्या आनंदरूपात दुःख कोठले ? त्यांत इतर दुसरे काहीहि नाही. म्हणून आपण सर्व त्या एका आनंदस्वरूपाचे ओतीव पुतळेच. आमच्या सर्वांच्या स्वरूपात असे हे एक परम तत्त्वच. हेच तत्त्वज्ञान !

भाग 2

बाळांनो ! प्रत्येकाचे भवितव्य त्याच्या अनुष्ठानांत असलेल्या सर्वोत्कृष्ट समाधानावरच अवलंबून आहे. ‘आधी कष्ट मग फळ । कष्टचि नाही ते निर्फळ ।’ साधनाचे कष्ट सोसूनच सिद्ध होते. ‘चणे खावे लोखंडाचे। तेंव्हा ब्रह्मपदी नाचे।’ ‘जो संसार दुःखे दुखावला । त्रिविधतापे पोळला। तोचि अधिकारी झाला । परमार्थासी।.’ असा विरक्त असतो तोच मात्र परमार्थाचा अधिकारी होतो. त्यातून निवृत्तिमार्गाचा अवलंब करणे म्हणजे कांही सामान्य नव्हे. ‘कश्चित् धीरः ।’ असे श्रुति सांगते. कोणी एखादाच असा शूर असतो. जेवढा व्हावयास पाहिजे एवढा प्रयत्न हळू पडला म्हणजे सर्वच बिनसते इकडे लक्ष पोहोचावयास हवे !

भाग 3

अखंड आत्मस्थिति हेच श्री गुरुचरणांशी ऐक्य असे म्हटले जाते. गुरूचरणी तादात्म्यता पावणेच गुरूभक्तीचा श्रोत होय. जशी तरंग शांत झाल्यावर नदी शांत निश्चल होते व तेथें एकमेव पाणीच अखंड राहते त्याच प्रमाणे नाना प्रकारच्या छिन्न-भिन्न भावनांना नष्ट करून केवळ चेतनस्वरूप असणारे आत्मतत्त्वच शिल्लक राहते. त्याच्या ठिकाणीं शून्य, अज्ञान इत्यादींची कल्पनाच राहू शकत नाही. शून्य, अज्ञान इत्यादी शब्दांच्या उपयोगाचा तेथे अभावच प्रकट होतो. अहंस्फुर्तीचा लय झाल्यावर स्फूर्तिरहित केवळ आपणच शिल्लक राहातो. मग तेथें शून्यता किंवा अज्ञान यांच्या कल्पनेचा संभवच राहात नाहीं. स्वरूपाचे वर्णन इतके स्पष्ट असल्यावर शून्य, अज्ञान आदि शब्दांचा अर्थच निरर्थक ठरतो. एकमेव ब्रम्हाभिन्न आत्मस्वरूपच अनुभवगम्य हे स्वतः सिद्धच आहे.

भाग 4

तुमच्या अंतस्फूर्तीने मला तुमच्या शुद्ध सच्चिदानंद- रूपाने बघा ! तिथेच मी आहे. तुमच्या त्या शुद्धस्वरूपाने अखंड मला पाहणे म्हणजेच माझें ध्यान, तेच माझे तात्विक रूप आहे; इकडे तुम्ही लक्ष्य घ म्हणजे ‘अखंड तुम्ही आम्ही एके स्थळी’ ह्या श्री समर्थांच्या उपदेशाचे रहस्य उमगेल आणि मग मला तुम्ही वेगळे पाहणार नाही. हीच स्थिती प्राणिमात्राला कृतकृत्य करते. एक तात्त्विक शांती देते. अशाच स्थितींत अखंड, अचल रहाणे मनुष्यमात्राचे इतिकर्तव्य ! आपण तरुन सर्वतोपरी आपल्या आचरणाने दुसऱ्यालाही तारक ठरणे म्हणजेच आपला उद्धार करून घेणे होय. शेवटी एका आनंदस्वरूपाहून इतर कांहीच नाही, हा अनुभव कायम होतो. ‘निरातिशयानन्दावाप्राप्त मोक्ष्यस्य लक्षणम्

भाग 5

सद्गुरु हे आपले केवळ एकमेव शुद्ध आनंदस्वरूपच होत अशी धारणा ठेवून तदाकारतेने कसलीही वृत्ती उठू न देतां निर्विकल्पतेचा अभ्यास करावा. त्याने आपणांस समाधान बाणते. ध्यानाची ठराविक एक वेळ असावी. काही दिवसांच्या संवयीने ही वेळ आली की वृत्ती आपोआप आंत ओढली जाऊन निर्विकल्पस्थिती होऊ लागेल. मस्तकमध्यांत असणाऱ्या ब्रह्मरंध्र नावाच्या गुरुस्थानी श्रीगुरु सहस्त्र दलकमलांत बसलेले असून सभोवार चंद्रप्रकाशासारखा आनंदस्वरूपाचा चिन्मात्रप्रकाश पसरला आहे; वराभयकरानी ते आपल्यावर अनुग्रह करीत आहेत, त्यांच्या मुखावर वात्सल्याचे स्मितहास्य शोभत आहे; असे ध्यान करावे.

भाग 6

तुम्हा सर्वावर गुरुदेवांचे किती प्रेम आहे, किती हितदृष्टी आहे त्यास कोणतीच सीमा नाही. ज्याप्रमाणे मांडीवर असलेले लहान बालक आपल्या मातेच्या प्रेमाचे मूल्यमापन करण्यास असमर्थ असते त्याप्रमाणेच गुरूंच्या हृदयांत आपल्याबद्दल किती वात्सल्य व हितदृष्टी आहे हे समजण्यास शिष्यही असमर्थ असतात. गुरुदेवानी अत्यंत कठोरपणे केलेली तपस्या पूर्णपणे ते आपल्या शिष्याप्रित्यर्थ समर्पण करतात आणि शिष्यांना इहलोक व परलोक दोन्हीही पूर्ण करण्यासाठीच, तसेच नेहमी आनंदरूपी बनवून ठेवण्यासाठी बलिदान करतात. तुम्ही सर्व बालबुद्धीचे असल्यामुळे गुरुहृदयाचे मर्म तुम्हाला कोठून समजणार ? श्री गुरुदेव तुम्हा सर्वांचे मंगलमय स्वरूप आहेत. गुरुदेव आपल्या शिष्यासाठी आपले सर्व सुख सोडून देतात.

भाग 7

श्री गुरुरायांना क्रोधादि स्पर्शहि करूं शकत नाहींत. कोणत्याही प्राणीमात्रावर कमी-अधिक प्रेम किंवा उदासीनता इत्यादि नष्ट करण्यासाठींच ते बोलत असतात. आपल्याबाबत श्रीगुरुदेव उदासीन दिसले तरी त्यांची उदासीनता आपले दुर्गुण नाहीसे करण्यासाठीच असते. सोनार सोन्यातील भेसळ बाजूस काढून सोने शुद्ध करतो तसेंच गुरुदेव जीवांच्या अंतर्गत असणारी सारी भेसळ नाहीशी करून, बाजूला काढून, जीवाला जीवभावातून बाजूस काढून ब्रह्मरूप बनवितात. साधकाने आपले गुरुदेव रुष्ट आहेत, रागावले आहेत, उदासीन आहेत किंवा आपल्यावर राग करतात अशी क्षुद्र भावना कधीच करू नये. साधकाचे नित्य निर्विकार परमशांतिरूप सच्चिदानंदघन मंगलमय आत्मरूपच सद्गुरु होत.

भाग 8

गुरु हे सच्चिदानंद घनस्वरूप होत. ते शिष्यावर सच्चिदानंद परमपदाची दया करतात. गुरुदेवांना कोणत्याही प्रकारच्या सहाय्याची आवश्यकताच नसते. गुरुंचा यथार्थ महिमा जाणून घेऊन, ‘गुरु केवळ ब्रह्माचीच मूर्ति आहे. ‘ईश्वरी गुरुरात्मेति’ अशा प्रकारच्या भावनेने गुरुआराधना करणे श्रेष्ठ होय. निरंतर निजस्वरूपस्थितीत राहणे हेच एकमात्र गुरूंचे सान्निध्य होय व निजस्वरूपस्थितीपासून च्युत होणे दुःख-शोक, जन्ममरणादींचे कारण होय. ज्याला स्वरूपस्थितीची निश्चलता प्राप्त झाली आहे त्याला व्यवहारात अडचणी उत्पन्न होत नाहीत अथवा विरोधी शक्तींची बाधाही होत नाही. हृदयाने गंभीर, व्यवहारात दक्ष, गुणवान आणि साधनसंपन्न, उच्च आदर्श जीवनाचे दिग्दर्शन समाजात दिसून आल्यानेंच समाजाची उन्नती होऊ शकते. निरंतर आपले मन स्वरूपापासून विचलित होऊ न देणे हाच आत्म अभ्यास आहे.

भाग 9

श्री गुरुकृपा अखंड व कायम टिकणारी असते. तिच्यामुळे देहावरील ममत्व सोडण्याची इच्छा होईल, मान व अपमान सारखेच वाटतील, क्षमा, शांती, संयम, निःस्वार्थबुद्धी या गोष्टी कायमची वस्ती करतील, सर्व प्रकारच्या सद्गुणांनी युक्त होऊन तो सर्वांना हवासा वाटेल, श्रीगुरुंचा आश्रय मिळाल्याबद्दल अखंड समाधान वाटेल, वाणीत माधुर्य येईल, स्व-पर मनुष्यामध्ये समभाष, समदृष्टी उत्पन्न होईल. स्वतःप्रमाणेच इतरांच्या भावनांची कल्पना दृढ होऊन जनसामान्यांच्या कष्टांत, दुःखांत समरस होईल, ब्रह्मरूपप्राप्ती करून घेण्याचा सतत ध्यास लागेल. विषयव्यामोहातून मुक्त व्हावे वाटेल, काम-क्रोधादि षड्रिपूंना जिंकावेसे वाटेल, ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून जीवनमुक्त होणं ही श्रीगुरुकृपाच ! !

भाग 10

‘श्रीधराश्रम ‘ हें सर्वांचे संकट निरसून सर्वांना ‘ आनंद प्राप्ती करून देऊन इहपर शांति, सौख्य देणारे एक परम पवित्र स्थळ आहे. ‘ श्रीधराश्रम, वरदपूर ‘ हा दिव्य कर्मांना स्फूर्ति देणारा व माझी स्मृति ठेवणारा माझा जणु प्रतिनिधीच आहे. आश्रम पवित्र ठेवणें व त्याची भरभराट करणे हे सर्व तुम्हा सर्वांच्या वागण्यावर अवलंबून आहे.

काहीँ लोक आश्रमाबद्दल वाईट भावना ठेवून प्रचार करीत असले तरी तुम्ही अचल विश्वास ठेवून आपलें कार्य अविरत करीत रहा ! !

धर्माचे स्फूर्तिकेंद्र म्हणजेच ‘वरदपूर’ असा संदेशच वरदगिरी शिखरावरील ‘धर्मध्वज’ सर्वांना देत आहे तिकडे सर्वांचेच लक्ष्य जावू द्या ! !

सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।”

भाग 11

‘नमः शान्ताय’ ह्या मंत्राचा जप करून श्रीगुरूंच्या चित्रास प्रदक्षिणा नमस्कार घालावेत. सायंकाळी भजन करून प्रार्थना करावी. तुमच्या भक्तीने श्रीगुरू संतुष्ट होऊन तुमची इच्छा पूर्ण करतील. उपासना करावी.
श्रीगुरुकृपेचा फायदा घेऊन आपले आचार-विचार स्व पर उन्नतीकारक परिणामी ठरतील असे रहावे व असाच आपला प्रतिक्षण जीवनक्रम असावा. उन्नती ही आपणच जाणून बुजून करावयाची असते. आपल्याला आपले मनच साक्ष असते.

भाग 12

‘सेवाधर्मो परमगहनो योगिनामप्यगम्यः ।’

गुरुंच्या सेवेमुळे गुरुकृपा व ब्रह्मविद्या प्राप्त होते. सद्गुरूंच्या तोंडून निस्वार्थी संतृप्त मनाने सहजगत्या स्फुरण पावलेले शब्द म्हणजेच आशीर्वाद, शक्ती, भक्ती व श्रद्धा त्यांनी संतुष्ट झालेल्या गुरुंचा एक आशीर्वाद असला की पुरे !
निष्कपटीपणाने मनापासून गुरुसेवा केल्यास तीच संरक्षण करते. सेवा धर्म हा अत्यंत श्रेष्ठ धर्म होय.
गुरु आराधनेंने आत्मलाभ होतो. मोक्षापेक्षेने आराधना करावी हे उत्तमच. ‘गुरु आराधनेने ऐहिक जीवन सुखसमृद्ध होते व परब्रह्माची प्राप्ती होऊन मोक्षाचाहि लाभ होतो.’ असे गुरुगीतेत म्हटले आहे.

भाग 13

जगाच्या हितासाठी म्हणजेच सुखासाठी, जगाच्या उद्धारासाठी सर्वांस आत्मसुख मिळावे म्हणून संत, महंत, प्रयत्नशील असतात. यजमान किंवा कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबियासाठी प्रयत्न करीत असतो त्याचप्रमाणे विश्वकुटुंबासाठी जगदोद्धारासाठी संत, महंत प्रयत्नशील असतात. परहितासाठी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवीत असतात.
‘मना, चंदनाचे परि त्वां झिजावे ।’ असे श्रीसमर्थानी म्हटले आहे. ‘हे मना ! तूं धर्मपालनासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी चंदनाप्रमाणे देह झिजव ! ! असा याचा भावार्थ आहे व हाच श्रीसमर्थ चरित्राचा मुख्य आदर्श आहे.

भाग 14

संत परमात्मस्वरूपच असतात त्याहून वेगळे स्थान त्यांना नाही. याचे कारण असे की, देवाजवळ भक्तांना देण्यासारखे दुसरे कोणतेही स्थान नाही. हे सर्व मायाकृत आहे. मायेंत दुःखच आहे. आत्मविस्मृती आहे. जन्ममरणाची साधने या मायेंत भरून आहेत; सुख म्हणून दुःखच भरलेले आहे. कार्य हे मायेचे; तेव्हा त्यांत आपले शुद्ध स्वरूप दिसून येत नाही. त्यामुळे मायेतील कोणतीहि वस्तु भक्तांना द्यावी म्हणून त्याला ते बरे वाटत नाही. आपल्या भक्तांचे कल्याण केले असें त्यामुळे होत नाही, अशी त्या परमात्म्याची कल्पना आहे. म्हणून आपलीच प्राप्ती तो त्याला करून देतो. एवढेच नव्हें तर आपल्यांत एकरूप करतो.

भाग 15

आग लागतांच ती विझविण्याचा जसा आपण ताबडतोब प्रयत्न करतो त्याचप्रमाणे मनांत वाईट वृत्ती निर्माण होताच तिचे निर्मूलन केले पाहिजे. यांत थोडाहि विलंब उपयोगाचा नाहीं. वाढलेली आग जशी सर्वच भस्मसात करते त्याप्रमाणे वृद्धिंगत झालेली मनाची दुष्ट वृत्ती जीवनाचा नाश करते. सद्गुरु उपदेशित मंत्राचा अविरत जप व माझे अखंड ध्यान केलेस तर अशा वाईट वृत्ती निर्माण होणार नाहींत.
कोणत्याहि कठीण प्रसंगी ‘नमः शान्ताय’ या मंत्राचा श्रद्धेने जप कर. मी मदतीस धावून येईन. संकटे दूर पळतील; यशस्वी होशील अत्यंत चिकाटीने साधना चालू ठेव. निर्भय रहा ! सद्गुरुवचनांवर पूर्ण विश्वास ठेव ! !

भाग 16

सर्व जण एकमतानें वागा. आपलाच हेका न चालवितां सर्वांच्यामते जे युक्त असेल तसे दुराभिमान सोडून वागण्याची धीरोदत्त संवय तुमच्या आंगवळणी पडूं द्या. खेळीमेळीने सर्वही कामें व्हावीत, निस्पृहांचे जीवन जगत्कल्याणाकरतां असते. तो विश्वसुखमूर्ति असतो, निस्पृहानें आपले ब्रह्मानंदात्मक जीवन जगहिताचे आहे असें मानावें.
पुढच्या सुखस्वप्नांचा उत्साह आणणाऱ्या आनंददायी कल्पना करीत होईल तितके विवेक विचाराने सेवेचे काम सुव्यवस्थितपणे पार पाडा. संघटित कार्यात शांति, समाधान लाभून कोणी एकावरच कामाचे ओझे पडत नाही. ‘योगिनः कर्म कुर्वन्ति सङगं त्यक्त्वाऽऽत्मशुद्धयें ।’ आपल्या प्रत्येक कामांतून आत्मसमाधान वाढत गेले पाहिजे.

भाग 17

कोणतेही काम एकदम घाईने करूं नयें. घाईने केलेल्या कामाने अनर्थ होतात. प्रत्येक वेळी खोलवर विचार केला पाहिजे. प्रत्यक्ष डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली असली तरी तिची सत्यता पारखून बघावी. तसेच एकदम दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपले मन चळू देऊ नये.
तारुण्यात बराच विचारीपणा असावयास हवा. कर्तव्य अकर्तव्याच्या बुद्धीलाच ‘विवेक’ समजावे. धर्म, देश, कुळ हे तरुणांच्याकडे मोठ्या आशेने पहात असतात. या सर्वांबाबत चांगल्या रितीने सर्वदृष्टीने जीवन मानवजातीस आदर्श असेच व्हावे. देवाला आवडेल असेच आचरण असावे.

भाग 18

ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण, धर्मपालन, सज्जनपोषण, दुष्टनिर्दालन द्वारा सत्साधन व सदाचाराचा प्रभावकारी जय विश्वविज्ञात होतो तोच ‘खरा क्रोथ’ होय कालाकडे लक्ष्य देऊन, क्रोधाने शासन करून, युक्तीने कोणत्याही प्रकारे दुष्ट लोकांपासून स्वतःचे व अन्य सज्जनांचे संरक्षण करणें हें सदाचरण होय.
तमोगुणी (आततायी) मनुष्यास योग्य शासन केल्याशिवाय तो ताळ्यावर येत नसतो. आपणांस जर त्यांच्या आपत्तीपासून संरक्षण मिळवावयाचे असेल तर आपणांस प्रथम ‘क्रोधच’ संरक्षक ठरेल. अशा वेळी क्रोधामुळे आपले व इतरांचेही संरक्षण ताबडतोब होत असते.

भाग 20

सज्जन असो वा दुर्जन असो, आपल्या संगतीत असणाऱ्यांना आपल्या प्रमाणेच करण्याचे त्यांचे प्रयत्न | असतात. चांगल्यापेक्षा वाईटाचा परिणाम लौकर होतो. चांगले करण्याकरतां जास्त श्रम करावे लागतात. त्याला कालही पाहिजे. वाईट करण्यास श्रमाची जरूरी व कालाचीहि अपेक्षा नसते. एखादा ग्रंथ लिहिण्यास एक वर्ष श्रम केले असले तरी तो जाळण्यास पांच मिनिटेंहि नकोत. अग्नीत टाकण्यास कोणत्या श्रमाची आवश्यकता असते? एखादा उत्कृष्ट ग्रंथ लिहीण्यास कितीहि विद्वत्ता असली तरी ती अपुरीच पडते. तोच ग्रंथ जाळून टाकण्यास अक्षरशत्रु असला तरी चालतो. रासायनिक औषध सेवनाने सावकाश लाभत असलेल्या आरोग्याप्रमाणे सत्संग उशीरा फलदायी होतो तर कुसंग संक्रामक रोगाप्रमाणे केवळ सहवासानेहि ताबडतोब आपला प्रभाव दाखवीत असतो.

भाग 21

आपणास डोळे आहेत आणि आंधळ्यास डोळे नाहीत असे आपण म्हणत असतो. पण खरोखर पाहिले तर आपणच दृष्टिविहीनाहून अतिशय आंधळे आहोत. आंधळा वस्तू पाहू शकत नाही. परंतु आम्ही तर स्वतःलाच बघू शकत नाहीं. आंधळ्याला जे दिसत नाही ते तुम्हास बघता येते म्हणून स्वतःला मोठे कां समजता ? नाश पावणाऱ्या या सृष्टीमधील प्रत्येक वस्तूंत असलेल्या अविनाशी परमात्म्याचे स्वरूप ओळखणाराच खरा डोळस. आणि तेंव्हाच त्याच्या दृष्टीची सार्थकता !!

भाग 22

आपणात आळस नसावा. वेळेचे महत्व फार मोठे आहे. ज्यावेळचे काम त्यावेळी झाले नाही की फार नुकसान होते. पांच मिनिटांच्या दिरंगाईने नेपोलियनास हार खावी लागली. एका सरदाराच्या मूर्खपणामुळे नेपोलियनला किती भोगावे लागले बरे! कोणतेहि काम दक्षतेने वेळेवर होण्याविषयीचे हे एक ऐतिहासिक उदाहरण प्रत्येकास धडा देणारे आहे.
हातपाय दणकट व घट्ट असले तरच काही कार्य होत असते. गबाळेपणा थोडासुद्धाहि असू नये. ‘सावध, साक्षेपी आणि दक्ष’ हेच श्री समर्थांना मान्य आहे.
कोणचेच कार्य शिस्तीशिवाय यशस्वी होत नाही.

भाग 23

खरे बोल, नीतिन्यायाने शुद्ध आचरण ठेव, मद्य पिवूं नये, मांस खाऊं नये, परस्त्रीची अभिलाषा धरू नये, कोणालाहि दुखवू नये, असा साधा उपदेश तरी मान ! ! परदारा-द्रव्य-भूमी अभिलाषू नकोस. निर्व्यसनी असे पवित्र जीवन चालव, परोपकारी पावन असे चारित्र्य राख सत्कर्माने पवित्र आयुष्य घालव. परस्त्री मातेसमान मान, परद्रव्य विषाप्रमाणे समज, परहिंसा म्हणजेच स्वनाश हे ओळख. देव, गुरु, वेद, गाय, देवप्रतिमा यांची सच्चिदानंद परमात्म्याच्या भावनेने पूजा कर. धर्ममार्गाने वागून संपादिलेल्या द्रव्याचा विनियोग स्वकुटुंबभरण, परिजनपोषण, दीनजनरक्षण, देव गुरु सेवा यांत कर व देवमाणूस होऊनच जग !

भाग 24

सर्वगुणसंपन्न कोणीही नसतो. ‘कोठे काही कोठे कांही ! एक आहे दुसरे नाही !’ त्यामुळे कार्याच्या सर्वांगिण उन्नतीला निरनिराळ्या मनुष्यांची आवश्यकता असते. म्हणूनच समाज, संप्रदाय, संघ वगैरे स्थापून कार्य करावे लागते. एका ध्येयाची मंडळी एकत्र जुळून एक मनाने आपल्याला हे कार्य उत्कृष्ट रितीने कसे पार पाडता येईल? याचा एकत्रिक विचार करून निस्वार्थीपणाने काया, वाङमनेकरून झटू लागली म्हणजे थोड्या वेळांत सुंदर कार्य होते. ‘संघे शक्तिः’ म्हणून ‘संगच्छध्वं संवदध्वं संबो मनासि जानताम्।’ असे श्रुतिमातेचे म्हणणे आहे. ‘एकमेकां साह्य करूं। अवधे धरू सुपंथ’ अशी उदात्त धारणा ठेवावी.
एकमेकांच्या सहाय्याशिवाय कांहीच बनत नाही म्हणून एकमेकानी निष्कपट राहून हार्दिक प्रेमाने वागावे.

भाग 25

समय हा आपणास आपल्या मर्जीनुरूप वापरता येतो. त्याचप्रमाणे बालमतही सहज बदलू शकते. संस्कार हे ओल्या मातीप्रमाणे मुदु आहेत. विद्यार्थी जीवनांतच संस्कार सहजपणे घडविता येतात. विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे. भविष्यांत ‘भद्रता’ मिळवून देणारी ‘ब्रह्मचर्य’ ही मुख्य गोष्ट आहे. विद्यार्थ्याने परिशुद्ध असे जीवन जगले पाहिजे.
विद्यार्थी ज्या प्रमाणांत आपले गुरु व वडील माणसें यांच्या ठिकाणी आदराने व भक्तिभावाने वागतील त्याच प्रमाणात त्यांचे भविष्य उज्वल होईल.

भाग 26

एखाद्या बुद्धिमान अशा व्यवहारकुशल मनुष्यास योग्य, अनुरूप असेच काम दिले पाहिजे. वादकुशल मनुष्यास वकीलीचे काम दिले पाहिजे, तर एखाद्या जड, निर्बुद्ध मनुष्यास जनावरें सांभाळण्याचेच काम योग्य ठरेल. गोठा साफ करण्यासाठी स्वच्छ कपडे अयोग्य ठरतील, पण कोर्ट, ऑफिसमध्ये जाणारास स्वच्छ कपड्यांचीच आवश्यकता असते. भक्तिमार्गातील मनुष्यास स्नान, संध्या, पूजा यांत समाधान वाटेल तर देहाभिमानी मनुष्यास आपल्या शेतीभातीत समाधान वाटेल. एकाच कुटुंबात असणाऱ्या निरनिराळ्या चौघा भावांना त्यांचे त्यांचे अधिकार व गुण यांना अनुसरून भिन्न भिन्न कामे देणेच योग्य ठरेल. आपण आपापसांतील फरक लक्षांत न आणतां समान विश्वासाने आपापली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. तो श्रेष्ठ का व हा कनिष्ठ का? असा भेदाभेद असणे ही सामुदायिक जीवनांतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट होय.

भाग 27

कोणत्याहि कार्याला वेळकाळ असा ठरलेला असतो. ते ईश्वरसूत्राप्रमाणेच होत असते. गडबडीने कांहीहि कार्य होत नाही. आंबा पिकत घालण्याआधी तो पाडाला यावा लागतो. आणि पाडाला येऊन आढीत घातल्यावर झटकन काम होत नाही. तो चांगला पिकेपर्यंत शांतपणे दम काढावा लागतो. ठराविक कार्य ठराविक काळातच होत असते. ईश संकल्पच्या विरुद्ध कोण जाऊ शकेल ? यशाचा मार्ग संकटाच्या खाईतूनच गेलेला असतो. ‘श्रेयांसि बहुविघ्नानि’ चांगल्या कार्याला फारच विघ्ने येतात. ‘जो लोककल्याण। साधावया जाण। घेई करी प्राण । त्या सौख्य कैचे ॥

विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः । प्रारब्धमुत्तमजनाः न परित्यजन्ति ||

धीरांना विघ्ने ही यशोमंदिराच्या पायऱ्याच आहेत. जो जितक्या अधिक विघ्नांना तोंड देऊन पुढे गेला असेल तितका तो अधिक समर्थ होतो.

भाग 28

हे मानवा! मी देह असे मानून कामकोवादीचे विकारी जीवन कंठीत रागद्वेषांनी जळफळत परद्रव्य, परकांता यांची अभिलाषा करणे, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला पिळून काढणे अथवा त्याला नाहिसा करण्याची हाव धरणे ही तुझी किती अधोगती, याचा तूच विचार कर! नराचा नारायण व्हायचे टाकून नरकभागी होणे किती अधोगतीचे आहे? जगात कशाला रणें माजावीत ? कशाला न्यायालये असावीत ? कशाला अनीतीने वागावे ? कशाला दुसऱ्यास दुःख द्यावें? कशाला दुसऱ्याच्या स्वत्वाचें हरण करावे ? कशाला दुसऱ्याच्या नाशाची इच्छा बाळगावी ? बा ! नराचा नारायण होऊ पहाणाऱ्या तुला अॅटमबॉम्ब, हैड्रोजनबॉम्ब, अग्निबाणादि संहारक क्षेपणास्त्रांसारखे शोध कशाला पाहिजेत ? दैवीकृपेचे आनंदसाम्राज्य सोडून तूं दुःखमय जीवन कंठून का दीन होतोस ? आनंदमात्र स्थिती हीच सहजावस्था आहे हे कधीही विसरू नकोस ! !

भाग 29

मनुष्यात तेजस्विता निर्माण होण्यास व ती वृद्धिंगत होण्यास त्याची योग्यताच कारणीभूत असते. देहसौंदर्याने किंवा वेशभूषणांनी मनुष्य विद्वान ठरत नाही; विद्याविहीन मनुष्य सौंदर्यदृष्ट्या कितीहि आकर्षक असला तरी तो विद्यावंताच्या तेजस्वितेची बरोबरी करू शकत नाही. प्रपंचात विद्याविहीनांचे आकर्षण जन्म सार्थकतेस सहाय्यभूत होऊच शकत नाही. तेथे विद्येचीच आवश्यकता आहे. एखादा कुरूप मनुष्य विद्यावंत असल्यास तो विधेच्या प्रभावाने आकर्षण मिळवू शकतो. आपण पूजनीय व्हावे असे वाटत असल्यास, आपणास सर्व जगांत मान्यता मिळवावयाची असल्यास खरी विद्या संपादन करण्यासाठी कष्टच केले पाहिजेत. अशा मनुष्याची विद्या किंवा अधिकार स्तुतीस पात्र ठरते व तो जगासहि मार्गदर्शक ठरतो.

भाग 30

प्रथम मुलाचे उपनयन, मग लग्न, मग मुलींची लग्ने, नंतर नातवंडांची उपनयने, लग्ने व हे संपल्यानंतर सर्वसंगपरित्याग करूं, असे मानव मनांत ठरवितो. मुलामुलींची लग्ने होतात, मग नातवंडे होतात व हे सर्व होऊन कांही वर्षे लोटून गेली तरी त्यांचे पुढील संस्कार पहावेत ही आशा कायमच असते. या प्रकारे विषयी जनांची आशा दिवसेंदिवस वाढत असते. आशारूपी अग्नि सर्वभक्षक आहे. संसारात सर्वकाही ठाकठीक करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्ण होत नाही.. शेवटी आयुष्य संपून अपेक्षा नसतांनाही यमराजाचे पाहुणे व्हावे लागते. पण वासना शिल्लक राहिल्याने त्याचे ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम्’ चालूच राहाते.

भाग 31

धष्ट पुष्ट असणारा जलद चालू शकत असला तरी मुलांम्हातान्यांबरोबर यात्रेसाठी निघाले असता त्यांची शक्ति, वेग, प्रकृती इत्यादि लक्षात घेऊनच जावे लागते. मुलांसाठी घरांतील सर्वांना पथ्य करण्यासारखेच. जनसामान्यास आपले आचरण तारक ठरेल अशा तऱ्हेने समाजात वावरणाऱ्या महात्म्यांना रहावे लागते, वागावे लागते.. ‘यद्यपि शुद्ध लोकविरुद्ध ना करणीय नाचरणीयम्’ असे आचार्यानी सांगितल्याप्रमाणे त्यांना बागावे लागते. ‘प्लववदाचरणम्’ भवसागरात ज्ञानी मनुष्याने नावाड्या प्रमाणे बनून आपल्या चारित्र्याची होडी बनवून तिच्याद्वारे लोकांना भवपार करविला पाहिजे, असा वेदशास्त्रांचा उपदेश आहे.

भाग 32

अशुद्ध मनावर संस्कार करून तें शुद्ध करण्यासाठी नानाप्रकारचे प्रयत्न करावे लागतात. मानवी जन्माची सार्थकता ओळखून मनाचे समाधान करणे आवश्यक आहे. मन एकदा समाधानी झालें व त्याने विषयाची आशा सोडली की त्यास आत्मानुभवाची गोडी वाटू लागते. आत्मतृप्तीतच सुख आहे. विषयसुखोपभोगांत तृप्ती नाहीण, म्हणजेच सुख नाही, अशी खात्री झाल्यावरच मन विषयसुखाकडे फिरकणारही नाही. त्यावेळी जीवनधारणावश्यक अशी प्रापंचिक साधनें प्राप्त झाली तरी तेवढ्याने मन समाधानस्थितींत येऊ शकेल..

भाग 33

नीतिमत्ता वाढविण्याकरिता कायदे असतात. ते करतांना मानवी जीवन सर्वतोपरी नर्दुष्ट कसे होईल याचा विचार करणे अत्यावश्यक असते समाजातील निकृष्ट, निषिद्ध दुष्टप्रवृत्ती नष्ट होऊन कष्ट वाचविण्याकरतां सुष्ट प्रवृत्तीची उत्कृष्ट वाढ व्हावी, दंडाच्या भीतीपेक्षां हृदयाचेच परिवर्तन होऊन सन्मार्गप्रवृत्ति प्रत्येकाच्या ठिकाणी उत्पन्न होणे हे व्यक्ति व समाजाच्या इहपर कल्याणास अत्यावश्यक आहे. आमचे ऐहिक जीवन सत्याच्या बळकट पायावर कसे उभे करता येईल याचा विचार करणे जरूर असते आमचे जीवन शाश्वत सुखाचे कसे होईल याचा विचार करून तदनुरोधाने वागण्याच्या नियमांची आखणी झाली पाहिजे.

भाग 34

कोणत्याहि कर्माची किंमत त्याच्या मूळ उद्देशावरून होत असते. चांगल्या उदात्त विचारांच्या माणसालाहि लोकांचे बरेच सहन करावे लागते, प्राणावरच्या संकटातूनहि मार्ग काढावा लागतो, कष्ट अनुभवावयास लागतात म्हणून काय झाले ? शेवटी ‘सत्यमेव जयते नानृतम’ हे लक्षात ठेवावे.
कर्म केल्याशिवाय रहाणे शक्य नसल्याने ज्या कर्माने स्व-पर आत्यंतिक हित साधते असे सशास्त्र उत्कृष्ट कर्म करून असत्कर्मप्रवृत्ति टाळणे हेच ‘जीवन रहस्य’ बनते, याहून दिव्यजीवनाचा अन्य कोणताहि उपाय नाही. उच्च ध्येयाने केलेली उदात्त कर्मे आत्मतृप्त अशा निःसंग ज्ञान्याला कर्तृत्वभोक्तृत्वादि अहंकार नसल्यामुळे बाधक होत नाहीत.

भाग 35

देहाभिमान, व्यामोह, राग-द्वेष, काम-क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, असूया, तिरस्कार, दंभ, दर्प, इत्यादिकांच्या बळकट तंतूनी विणलेले संसाररूपी जाळे आमच्या जीवभूमीवर पसरून कराल काल आम्हांला आत्मसात करण्याकरितां सारखा टपून बसला आहे. जन्माला आलेले सर्वच मृत्यूच्या या जाळ्यांत अडकलेलेच असतात. एका जाळ्यात सांपडलेल्या पक्ष्यांच्या प्रमाणेच अखिल मानवांची स्थिती आहे. एकाचें दुःख तेच सर्वांचे दुःख. अखिल मानवजातीनेच ह्या कालपाशाच्या निवृत्तीचा विचार एकोप्याने व एकध्येयाने केला पाहिजे. एकमेकांना एकमेकांचे सहाय्य असले पाहिजे.

भाग 36

कांही प्रसंगी एकट्यालाच विचार करावा लागतो व कांही वेळी समुदायानिशी विचार करावयाचा असतो. गौप्य असलेले दुसऱ्याला कळविता कामा नये. चार जणांचे मत घेऊन ठरवावयाच्या वेळी व कोणतेही कार्य करण्याच्या प्रसंगी आपण एकट्यानेच आपल्या मनाप्रमाणे तें ठरवू नये व करूहि नय, असे झाले असतां कदाचित आपल्या कोत्या विचारांनी संकुचित वर्तनाने जनांचे नुकसान होण्याचा संभव असतो. स्वीय गुणदोषांचा, गृहछिद्राचा व अशाच गुप्तगोष्टीचा आणि मसलतीचा विचार आपण एकट्यानेच करावा लागतो. षट्कर्णी झालेले कार्य व मसलत नासते.

भाग 37

दुसऱ्याचे दोष शोधण्यासाठी आपण जितकी बुद्धी खर्च करतो, तेवढी बुद्धी आपण आपले स्वतःचे दोष शोधण्यात खर्च केल्यास आपण दुःख-दौर्बल्यापासून मुक्त होऊ, असे उपनिषदांनी म्हटले आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत. पण दुसऱ्याचे दोष मात्र अचूकपणे शोधले जातात. आपले दोष जाणणाराच “विवेकी’ होय. आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यास ते नाहीसे करण्याची शक्यता असते. पण उलटपक्षी ते तसेच राहून जातात. चोरांना घरांत कोंडून ठेवण्यासारखेच हे आहे.

भाग 38

कर्म करून संपते व त्याचे फळही भोगून संपते म्हणजेच कर्मजन्यसुख अनित्य आहे. अनित्यसुखाने कोणचीहि तृप्ती होत नाही. इहलोकीचे किंवा परलोकीचे सर्व सुख कर्माने प्राप्त होते. कर्माने प्राप्त झालेले सुख अनित्य असतें व अशा सुखाने समाधान होत नाही. नित्यसुख कर्मजन्य नसतें, कर्मापासून तें मिळत नाही म्हणून ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणाऱ्याने कर्मजन्य सुख देणान्या इहपरलोकाचा त्याग करावा. वासना वाढल्याप्रमाणे भोगहि वाढतो व भोगाच्या वाढीने वासना पुन्हा पूर्वपक्षाहि वाढते. अननुभूत विषय ऐकल्याने, पाहिल्याने किंवा पूर्वजन्माच्या संस्काराने इतका बळकट मोह निर्माण करतात तर त्यांच्या अनुभवाने पुन्हा किती शक्तिशाली बनून त्या काढून टाकण्यास अशक्य होतील? याचा विवेक्याने विचार करावा.

भाग 39

दुष्टांना क्षमा करणे हा क्षमेचा अतिरेक व दुरुपयोगच होय. भारतातील सोमनाथादि मंदिरांचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. दुष्टांच्या बाबतीत शांति दाखविल्याने त्यांचा स्वभाव तर बदलणार नाहीच, पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच जास्त प्रतिकार केल्याने त्यांच्या स्वभावात सुधारणा होणार नसली तरी त्यामुळे सज्जनांचे संरक्षण होईलच होईल. या उलट आपण त्यांच्या बद्दल शांति व प्रेम दाखवीत राहिलो तर त्यांची वृत्ती न सुधारता, त्यांच्या अविवेकी वृत्तीस पायबंद न बसता ती वाढत जाऊन आपले प्रयत्न विफल होऊन हानीही होईल.

भाग 40

आपण जर सत्कर्माने, उपासनेनें, ज्ञानवैराग्यादि साधनांनी मुक्त झालो व मुक्तीकरितां हेच एक साधन आहे, तर ते जगांत सुस्थिर व्हावे म्हणून आपल्या आचरणाने त्याला जिवंत ठेवून ते वाढवणे आवश्यकच आहे. आपण जर त्या दयाधन श्रीगुरूंच्या उपकारानें पावन झालो तर तसेच उपदेशामृत दानाचे काम सद्गुरूची सेवा म्हणून, अंशतः तरी त्यांच्या उपकाराची फेड व्हावी म्हणून, देह असेपर्यंत कोणी निदा कोणी वेदा आमचा स्वहिताचा हा धंदा।’ ह्या उच्च भावनेने को चालू ठेवू नये? आपल्याकरितां श्रीसद्गुरूंनी कष्ट घेतले नसते तर आपले कसें झाले असते? दुसऱ्याच्या बाबतीतहि तसेच मानून त्यांच्याकरितां आपण कां कष्ट घेऊ नयेत? ‘जितुके काही आपणास ठावें। तितुके हळुहळु शिकवावें। शहाणे करून सोडावे सकळजन ॥ (दासबोध)

भाग 41

दुसऱ्याचे दोष दोषदृष्टीने पाहू लागलो तर आपलीच दृष्टी दोषी बनते हैं ध्यानांत ठेवले पाहिजे. दुसऱ्याची निदा केल्याने आपलीच जीम मलीन होते. आपल्या दुःखाचा भार दुसऱ्यावर लादला गेला तर त्याने दुसरे कधीहि प्रसन्न राहणार नाहीत तर ते आपले द्वेषीच बनतात. यासाठी कोणत्याही कारणाने दुसऱ्याला दुःख देण्याचा स्वप्नांतहि विचार करूं नका. परमेश्वर सर्वत्र, सर्व प्राणिमात्रांत व्यापलेला आहे. तुमच्यामुळे दुसऱ्यास समाधान, संतोष वाटला तर त्याच्या शरीरांतील परमेश्वरी अंशहि संतुष्ट होईल, असे समजावे. हृदयाची विशालताच कोणालाहि महान बनविते. दुसऱ्याच्या हितासाठी प्रयत्नशील असणारा मनुष्यच खरा मनुष्य होय. आपण दुसऱ्याशी जसे वागतो त्यासारखेच दुसरेहि आपणाबरोबर वागत असतात.

भाग 42

मागासलेल्या लोकांची दया येऊन त्यांच्यात मिळून-मिसळून आपणहि त्यांच्या पंक्तींत बसण्यापेक्षा त्यांना त्या स्थितीतून वर काढण्याकरता आपल्या अबाधित दिव्य आचरणाचे धडे त्यांना शिकवीत शिकवीत त्यांच्या प्रगतिपर जीवनाकरतां सर्वथैव झटणे हेच त्याच्या अधिक हिताचे ठरेल. एकाच प्रवाहात सापडून दोघांनीही प्राण देण्यात काय अर्थ आहे ? सांसर्गिक स्पर्शजन्य रोग्याची प्रकृती आपल्याला तो रोग न लागू देतांच सुधारली पाहिजे, हे वैद्याने विसरता कामा नये. सूर्य जसा डबक्यातील पाणी शोषून घेवून पवित्र पाण्याचा पाऊस पाडतो. त्याचप्रमाणे पवित्र माणसांनी मागासलेल्यांचे दुर्गुण घालवून आपल्या दिव्य, पवित्र आचरणाचे भरपूर धडे त्यांना द्यावेत.

भाग 43

चढत्याचे पाय खाली ओढू नयेत प्रगतिच्या शिखरावर पोहोचण्याकरतां मानवाची मोठी यात्राच निघाली आहे. काहींनी ते स्थळ गांठलेले असते तर कांही चढून थोडे वर आलेले असतात. काहींनी चढण्यास सुरवात केलेली असते तर कांही अजून त्या विचारात असतात. पुढे आलेल्यांनी मागे राहिलेल्यांच्या बरोबरच राहिले पाहिजे असा आग्रह धरणें, तशी त्यांच्यावर बळजबरी करणें मात्र अनुचित आहे. तसे करणे श्रेयस्कर ठरणार नाही. श्रेष्ठांनी मागासलेल्यांना पुढे सरसावण्यास प्रोत्साहन देणे सहाय्य करणे योग्यच होय. पुढे गेलेल्यांचा आदर्श मागे राहिलेल्यांसाठी असावा.

भाग 44

शीलम्रष्ट किंवा हीन जातीच्या माणसाला अधिकारपद दिले असतां तो सज्जनांचे व उच्चवर्णियाचे आचार-विचार, निति नियम मुद्दाम बिघडवितो त्याची मर्जी संपादण्याकरता कांही मुद्दामच त्याच्या प्रमाणे वाग लागतात. म्हणून जो त्याला विरोध करतो त्याचा तो डावच धरतो. अधिकाराचा दुरुपयोग करून बळजबरीने त्याला बिघडविल्याशिवाय तो राहात नाही. असेच अधिक प्रमाणात होऊ लागले म्हणजे क्रमशः उच्च आदर्श उच्च वर्ण व सज्जनांचे अनुकरणीय दिव्य आचरण राष्ट्रांतून नष्ट होण्याच्या मार्गाला लागतात. समाजातील नीतीचाच नाश होऊं लागल्यामुळे त्या राष्ट्राला सर्वतोपरी उतरती कळा लागते. उच्च संस्कारांच्या श्रेष्ठ माणसांना आपल्या सारखेच सर्वांनी व्हावे म्हणून जसे वाटते, तसेच हीन संस्काराच्या कनिष्ठ माणसांनाहि पण आपल्यासारखेच सर्वांनी व्हावे असे वाटत असते.

भाग 45

निषिद्ध कर्माच्या अनुष्ठानामुळे वासना वाढू लागतात. निषिद्ध कामोपभोगाची वावटळच उठून परमार्थमार्गाची दिशाच दिसत नाही. ‘बुडत्याचा पाय अधिक खोलात’ या म्हणीप्रमाणे तो अधिकाधिक निषिद्ध कर्मे आचरू लागतो. नीतिभ्रष्ट पहिल्याने पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मोठ्या आवेशाने वाटेल त्याच्या अंगावर जाऊन मार खातो. त्यानंतर हळू हळू बलहीन होऊन महारोगी माणसाप्रमाणे तो सर्वत्र तिरस्कृत होतो. कृतकर्माची फळे अनुभविण्यास लावण्यासाठी त्याच्या देहात अनेक रोगांनी ठाण दिलेले असते. तळमळून तळमळून अशा नाना तऱ्हेच्या अनेक नरकयातना इथे भोगून मरणानंतर यमधर्माच्या शासनाने घोर नरकांत त्याचा वास होतो व तिथे तो नीतिभ्रष्ठ अनंत दुःखे भोगतो.

भाग 46

मनुष्याचे जीवन ऐहिक-पारलौकिकरूपी दोन उत्कृष्ट साधनांच्या अनुष्ठानानींच उत्तम रितीने चालते. ऐहिक (लौकिक) व पारमार्थिक यापैकी एक जरी नसेल तर ते चालणार नाही. ऐहिक व पारमार्थिक (पारलौकिक) = ही दोन्ही साधने प्रजेच्या ठिकाणी असतील तरच राज्यचालकांना राज्यशासन सुरळीत चालविता येते. प्रजा, तिची ऐहिक व पारलौकिक प्रगति व्यवस्थित शासनपद्धती हे असेल तरच राजाला किंवा मंत्र्याला राष्ट्र चालविणे सुलभ होते. नीति आणि धर्म यांचा जसा अभेद्य संबंध आहे त्याचप्रमाणे धर्म आणि उत्कृष्ट राज्यपद्धती यांचा परस्पर संबंध आहे. सचोटीचा व्यवहार, उर्जितावस्थेची सारखीच कळकळ, परस्पर प्रेम, आज्ञाधारकत्व, बुद्धि एकोपा, धर्म, नीति आणि आस्थिक बुद्धी ज्या कुटुंबाच्या किंवा राज्याच्या व्यक्तीतून दिसून येते ते कुटुंब व राज्य कधीच नष्ट होत नाही.

भाग 47

आपण जसे आहोत तसे समजून घेणारे लोक क्वचितच. जो तो काहीतरी खोटे-नाटे सांगून आपला मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. ही कृति म्हणजे मांजराने डोळे झांकून दूध पिण्यासारखेच. जगाला डोळे नाहीत काय ? आपण आपल्या चुका झांकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या इतरांच्या नजरेस आल्यावाचून राहात नाहीत. आपण कितीही झांकण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गशक्तीही तुमच्या यथार्थ योग्यतेचे मूल्यमापन करून त्याप्रमाणे फल देते. कदाचित लोक तोंडाने बोलत नसले तरी आपल्या वागणुकीने ते उघड होत असते त्यामुळे पुण्यक्षय होतो आणि दांभिकपणा, खोटेनाटे हे सर्व उघडकीस येते. तपःशक्ति तेज असल्यास तेही नष्ट होते. म्हणूनच मन ताळ्यावर आणण्यासाठी आपले दोष आपण जाणून घेऊन दुसऱ्या सांगणे ही मोठीच साधना होय.

भाग 48

जीवनाची दृष्टी ठेवून देहाथी भिन्न भिन्न कार्य इंडियांची भिन्न भिन्न कार्य एकमताने सुरळीत चालल्याप्रमाणे ऐहिक जीवनाचे व पारलौकीक मोक्षाचे ध्येय ठेवून जगातील अथवा राष्ट्रातील भिन्न-भिन्न जातीधर्माची भिन्न-भन्न कार्ये एकमताने सुरळीत चालण्यास कोणतीच हरकत नाही. निसर्गाने भाग पाडलेल्या भिन्न भिन्न पेहेरावामुळे, आहारामुळे, भिन्न-भिन्न उपाधीच्या कार्यामुळे राष्ट्राराष्ट्रातून मानवजातीच्या इहपर कल्याणाच्या दृष्टीने प्रेमसंबंध चालण्यास जशी कोणतीही अडचण असत नाही त्याचप्रमाणे वर्णाश्रमाच्या भिन्न-भिन्न वेषभूषामूळे, जेवणखाण्यामुळे, आचारविचारामुळे, सामुदायिक योगक्षेमाच्या दृष्टीने मोक्षाच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ शकत नाही.

भाग 49

‘राजा बोले दळ हाले !’ ‘नेत्या प्रमाणेच अनुयायी’ ! ‘जसे घर तसे वासे’ ! ‘बाप तैसा बेटा, कुंभार तसा लोटा’ ! ‘घराची कळा अंगण दाखविते’ ! “गुरू तसा चेला’ या सर्व म्हणी ध्यानांत घेण्यासारख्या आहेत. प्रजा केव्हाहि राजा, मंत्री, महंत, पुढारी यांचे अनुकरण करते. हे स्वाभाविक आहे. आपले आचरण समाजाला अनुकरणीय होऊन आपले विचार त्यास प्रमाणभूत होतात हे तत्त्व न विसरतां कोणत्याहि तऱ्हेने आपल्या आचार-विचारांनी समाजाच्या इहपर उन्नतीस कोणताच अपाय होणार नाही असा खोलवर विचार करून दीर्घदृष्टीने व वेदशास्त्रांच्या योग्य पर्यालोचनाने राजाने किंवा मंत्र्यानी राज्यकारभार चालविला पाहिजे व तदनुषंगानें शासन नियम आखले पाहिजेत.

भाग 51

समत्वाकरतां विषम साधनांमध्ये, शांतीकरतां खून, दरोडे, मारामाच्या करण्यामध्ये, धर्म म्हणून धर्मतत्वाचा त्याग करण्यामध्ये हे आधुनिक जग अट्टाहासाने गढून गेले आहे. जगांत समाधानाकरतां असमाधानकारक साधनांचा अवलंब होत आहे. उच्चनीच भावनांचा नाश करण्यासाठी त्याच भावना आचारविचाराद्वारे दृढ केल्या जात आहेत. शांतीसाठी क्षोभच वाढविला जात आहे; हाच अधर्म विश्वाचे धारण वा रक्षण करणारा सनातन विश्वधर्म त्याज्य ठरला. त्याचा त्याग केला तर ह्या जगाची काय स्थिती होते ? जगांत काय दिसते ? हेच आज सर्वत्र दिसून येत आहे.

भाग 52

कुटुंबमे तथा राष्ट्रमें धर्मभावना, नीति, आरोग्य, बल, विद्या, वैभव, वर्चस्व यह सब प्रधान व्यक्ति के ही कारण रहते है। प्रमुख नेताही एक कुटुंब तथा राष्ट्रका जीवन तथा राष्ट्रके, अभ्युदय निःश्रेयसका कारण होता है। उन्हीके ऊपर सब निर्भर रहते है। कुटुंबकी तथा राष्ट्रकी भवितव्यता प्रमुख व्यक्तिके प्रौढ तथा बालिश आचार, विचार, उच्चारोंका परिणाम रहता है। एक दशग्रीव रावणके दुर्गतीसे सब राक्षस कुल ही नष्ट हो गया इसलिए कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रधान पुरुषों को ठीक सोच विचार कर, परिणामके उपर दृष्टि देकर, देश तथा धर्मक सार्वदृष्टिक उन्नति के लिए योग्य पथपर चलना और अपने अनुयायीओंको चलाना अत्यंत आवश्यक है।

भाग 53

सरकारी नोकरीत सदाचारास वाव कमीच. अशा लोकांचे आचार, विचार, वेष, भाषा हे बदलून जातात. मनोवृत्ती बिघडते, धर्मकर्मामध्ये अनादर उत्पन्न होतो. स्वतःच्या संस्कृतीस क्षीणता प्राप्त होते. जीवनकलहासाठी कालक्षेप करावा लागणाऱ्या या लोकांना अध्यात्मिक विचारासाठी व धार्मिक आचारासाठी वेळच मिळत नाही. अशा लोकांच्या संपर्क अनुकरणामुळे बाकीचे लोक तसेच वागू लागतात. त्यामुळे एकंदर संपूर्ण समाजाचे रूपच विकृत झाले आहे. हा कोणत्या वर्णाचा आहे, हे त्याच्या वेषावरून कळणे कठीण झाले आहे. तसेच आहार विहारांतहि बिघाड झाला आहे. आपले आचरण बदला, सदाचाराला प्रवृत्त व्हा ! दुराचारी मार्गाला विसरा. धर्मकर्मात आसक्त होऊन निषिद्ध कर्मे करू नका. एकामागून एक असा निषिद्ध कर्माचा त्याग करा. दुःखनिवृत्तीसाठी हीच महौषधी आहे तर सुखप्राप्तीसाठी हेंच अमृत होय.

भाग 54

लांचलुचपतीचा प्रतिबंधक कायदा करणारे व ती चालू नये म्हणून त्यास नेमले जाणारेच लांच खाणारे झालें, धर्म शिकवणारेच अथर्मी बनले व नीतीचे धडे गिरवावयास लावणारेच अनीतीने वागू लागले म्हणजे सर्व कारभारच आटोपला. समाज सुधारण्याची जोखीम घेऊन वागणाऱ्या मंडळींचेच गलिच्छ आचरण झाल्यानंतर समाज सुधारण्याची आशाच नको. असे न होईल अशी पूर्वीपासूनच काळजी घेत आले पाहिजे. योग्य न्याय व तोहि त्वरीत मिळण्याची व्यवस्था राज्यांतूनच सर्वत्र असावी. अर्ज केलेल्या मनुष्याच्या अर्जाचा निकाल त्याच्या निधनानंतर मिळाल्यास त्याचा काय उपयोग ?

भाग 55

हे जगा! तू भौतिक शोध कितीहि लावलेस आणि घरबसल्या दूरदूरचे ऐकलेस व पाहिलेस, स्वल्पकालांत • दूरची मजल गाठलीस यंत्रांच्या सहाय्याने अल्पावधीत विपुल ऐहिक सुखसाधने तूं कितीहि अपार निर्माण केलीस, आकाशांत उडालास आणि यथेष्ट तेथे फिरलास तरी तुला नितांत शांतीचा क्षण लाभणे दुर्लभ, शाश्वत सुखाचा लाभ होणे दुरापास्त, अचल समाधान लाभ अगदीच अशक्य हे निर्मळ सत्य आहे. उलट तुझ्या राक्षसी कृत्यांना त्यामुळे ऊत येत राहील, कामक्रोधादि विकार बेफाम वाढतील आणि आपल्या अपस्वार्थासाठी देशचे देश उध्वस्त करण्याची स्व-परघातुक प्रवृत्ती वणव्यासारखी तुझ्या अंतःकरणात सदैव पेटत राहील. खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांतांकडे बघ, ते तुला शाश्वत सुखाचा लाभ करून देऊन तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये तुला नित्यतृप्तीने नांदवील.

भाग 56

औषध सेवनाने रोगाची निवृत्ति खचितच होते. पण केवळ औषध आणून ठेवल्याने रोगनिवृत्ति होणार नाही. कितीतरी रोगी आपणांस कोणी पहात नाही असे पाहून संधी साधून औषध ओतून देऊन कोणालाहि कळणार नाही अशा प्रकारे अपव्य करून शेवटी गुण न आल्याने औषघालाच नांवे ठेवीत असतात. अगदी अशाच प्रकारे भारतीय धार्मिक जीवन बनलेले आहे. आपला धर्म श्रेष्ठ असला तरी त्यानुसार आचरण केले नाही तर परधर्माला या देशांत जागा मिळणार नाही असे होईल काय ? आपल्या देशांत वैदिकधर्म तर अत्यंत हीनस्थितीस पोहोचला आहे. दक्षिणेबरोबर वैदिक धर्माचा संपूर्ण अधिकार पुरोहितांना देऊन स्वतः ऑफिस किंवा कचेरीत जाणारे ऑफिसरच जास्त झाले आहेत. वैदिकधर्माबद्दल आपणांस असणारी श्रद्धा ही अशा प्रकारची आहे.

भाग 57

आपण आर्याचे वंशज आहोत हे न विसरता तदुचित, तत्कथित रीती, नीती, धर्म-कर्म सांभाळून वितंडवाद न करतां उच्च नागरिकतेचा आदर्श पाळून मोक्षसाधनांनी विभूषित व्हावे; धन्य होऊन दिव्य जीवनाचे उदाहरण स्वयं होऊन रहावे, हेच भारतात जन्मल्याचे सार्थक होय. पूर्वीच्या अनेक परकीय राज्यकर्त्यांनी अनेक विरोधी कल्पना निर्माण करून परस्परांत द्वेष वाढविला व ‘विभाजन व शासन’ (Divide & Rule) हे तत्व अमलांत आणले, वाटेल त्या मार्गाने राज्य केले. परंतु आता स्वराज्य प्राप्त झाले असल्याने या सर्वहि भेदभावना आणि कुटिल राज्यपद्धती टाकून, देशबंधुत्वाच्या व धर्मबंधुत्वाच्या हार्दिक प्रेमाने परस्परांशी वागत पवित्र आर्यसंस्कृतीचा उच्च ध्वज जगांत मिरवित मोक्षमार्गानुवर्ती होणे हे किती सुखावह व केवढे भूषणावह आहे! असे हे सौभाग्य आजच्या भारताला परमेश्वरकृपेने लवकरच लामो व त्यामुळे अखिल विश्वाचेच कल्याण होवो ! !

भाग 58

लोकसत्ताक राज्यपद्धतीत ‘सर्वांगिण उन्नती’ हाच मुख्य उद्देश असतो. न्याय विधानसभेत प्रजेचे सामाजिक, नैतिक, बौद्धिक व अध्यात्मिक अशा सर्व उन्नतींना प्राधान्य दिले जाते. प्रजेच्या उन्नत जीवनासाठी ही गोष्ट आवश्यक आहे; यांत संदेह नाही. या सर्व गोष्टींमुळे शक्तिमान झालेली प्रजा मानवांत श्रेष्ठ अशीच गणली जाते. कायद्याद्वारेच सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी अनुरूप व योग्य आचारविचार घडविले जातात. विधानसभेत ही सर्व तत्त्वे जाणणाऱ्या व्यवहार चतुर अशा लोकांचीच आवश्यकता असते. ‘त्यागी सत्त्वसमाविष्टो मेघावी छिन्न संशयः ।’ ही सर्व लक्षणें विधानसभेत जाणाऱ्या सदस्यांत असणे आवश्यक आहे. सदस्यांची निवड करण्याच्यावेळी प्रजेने आपल्या विभिन्न प्रकारच्या हिताच्या दृष्टीनेच या निवडणुकींकडे पाहिले पाहिजे, अशी माझी कळकळींची सूचना आहे. जनतेने या गोष्टींचा विचार करून निवडणुकीमध्ये योग्य मनुष्यास यशस्वी करावे.

भाग 59

धर्मनिरपेक्षतेने व्यक्तीप्रमाणेच समाजाचाहि निर्वाह होणे शक्य नाही. धर्मनिरपेक्षतेने एक कुटुंब चालविता येणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे राज्य चालविणेहि शक्य नाही. कुटुंबातल्याप्रमाणेच प्रत्येक राज्यातहि आज्ञाकारी’ व ‘आज्ञाधारी’ असावे लागतात. प्रजेने राजा अथवा मंत्री यांच्या आज्ञांचे परिपालन करणे हा ‘राज्य प्रजाधर्म’ होय. धर्माची अपेक्षाच नाही असे झाल्यास राज्य प्रजाधर्माचीहि अपेक्षा नाही असा अर्थ होऊन कोणाच्याही आज्ञा कोणीहि न पाळता बेबंदशाही माजेल, शासन बंद पडेल. ज्या कुटुंबात अथवा राज्यांत प्रत्येकजण नेता होतो. प्रत्येकाला आपल्या महत्वाची दृष्टी असते, ‘मी शहाणा’ म्हणून वाटते ते कुटुंब अथवा राज्य लौकरच नष्ट होते धर्मनिरपेक्षतेने ना वैयक्तिक, ना कौटुंबिक ना सामाजिक ना राजकीय, ना पारमार्थिक कोणतीच व्यवस्था सुरळीत चालणार नाही.

भाग 60

समतेसाठी लढणाऱ्या सैन्यात सेनापती, हाताखालचे निरनिराळे अधिकारी, चतुरंगसेना इत्यादी भेद परस्पर अधिकारतारतम्यामुळे असतातच. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार आज्ञाकारी-आज्ञाधारी हे भेद नाहिसे केल्यास कोणतेच राष्ट्र टिकणार नाही. कोणत्याहि खात्यात न्यायालयांत उच्चनीच भेद, अधिकार-तारतम्य कमीअधिक कार्यक्षमता असतेच. सर्व भेदांचे निर्मूलन करण्यासाठी भरलेल्या समेतहि, स्थापिलेल्या समाजांतहि समतेचा उदो उदो करणाऱ्या राष्ट्रांतहि अध्यक्ष, उपाध्यक्षादि भेद आहेतच. ज्याचा त्याचा अधिकारभेद व आज्ञाकारी आज्ञाधारी इत्यादि संबंधामुळे उच्चनीच भावना असतातच. सहभोजनादि उथळ साधनांनी समता व ऐक्य निर्माण होणार नाही. सहभोजन, अस्पृश्यता निवारण आदि गोष्टींनी अंतस्थ प्रेम वाढून विषमता नाहीशी झाली असती तर बाल्यावस्थेपासून एकाच ठिकाणी वाढलेली मातापित्यांची मुलें एकमेकांशी का भांडली असती ? एकाच

भाग 61

आता ब्राह्मणांच्या मुलांची मुंजच पंधरा सोळा वर्षांवर होऊ लागली असून पोटाच्या प्रश्नाने वेदविद्या शिकावयाची सुटून गेली आहे. पावित्र्य राहिले नाही. पहावयासही नीति दुर्मिळ झाली. आचार आता उरला नाही. इंग्रजांचे राज्य गेले तरी त्यांच्या अवनत आचरणाच्या वैषयिक समाजाचेच अनुकरण अजून होत आहे. पाश्चात्य संस्कृतीलाच मस्तकी धारण केलेले चिन्ह देशातून अजूनही कांहीच कमी झाले नाही. वेश्येच्या नादी लागलेला घरी येऊन आपल्या कुलवंत साध्वीपुढे वेश्येची बढाई करून, तिचा नट्टापट्टा शिकवून त्याप्रमाणेच करण्याचे मनांत आणल्या सारखे आधुनिक राज्यकर्ते आंग्लविद्या आणि आंग्लसंस्कृतीने भारावून आपल्या देशालाहि तीच दीक्षा देण्याचे मनांत आणीत आहेत.

भाग 62

सेवेने मन शांत होते. सेवार्थ घडणाऱ्या कार्यात स्वार्थ नसल्यामुळे ती कर्मे बाधक होत नाहीत. सेवेने विनय अंगी बाणतो. ममत्कार उरत नाही. आपल्या आवडी-निवडींकडे लक्ष पुरवावयास होत नसल्यामुळे मनोजय साधतो, देहाभिमान नष्ट होतो व परमात्म्याचे ध्यान अखंड घडते. ‘ऐशी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीति ।। सर्व प्राणिमात्रांतून आत्मप्रेमाचें मंगल दर्शन, कार्य करतांना पावलोपावली समाजात व्हावयास पाहिजे. समाजात कार्य करतांना आपली शांती, समाधान इत्यादी साधनाने मिळविलेल्या सद्गुणांची कसोटी लागते. आपला अधिकार समजून येतो. शाळेत शिकल्याप्रमाणे समाजात कार्य करतांनाहि हे शिक्षण पुष्कळच मिळते. स्व-पर उद्धाराचे उदात्त आणि पवित्र अध्यात्मिक जीवन म्हणजेच परमार्थ !!

भाग 63

प्रपंचामध्ये घनास जरी प्राधान्य असले तरी ते पुरून ठेवण्यासाठी खासच नाही. विनियोगाकरतांच ते आहे. दान, भोग व नाश अशा धनाच्या तीन गती आहेत. जो दुसऱ्याला देतहि नाही, स्वतःकरताहि खर्च करीत नाही त्याच्या संपत्तीची तिसरी गती म्हणजेच कोणत्याही प्रकारे त्या संपत्तीचा नाश होतो.. ज्याला जेवावे कसे हे माहित आहे त्याला रोग होत नाहीत. ज्याला बोलावे कसे हे समजते त्याच्याशी कुणाचेही भांडण होत नाही. जेवण्याकरतांच जगणाऱ्या ‘ माणसाचे आरोग्याकडे, मनस्वास्थाकडे व पापपुण्याकडे अर्थातच लक्ष नसते. ज्याच्या योगाने मन शांत राहील, आरोग्य नष्ट होणार नाही, ज्याच्या योगाने चित्त प्रसन्न राहील, जो आपल्या ध्यानादिक क्रियांना पोषक होईल असा आत्मसंमत आहार, या सर्व अनुकूलतेसाठी जणु औषधच आहे या पवित्र विचाराने घ्यावा.

भाग 64

देहाला षड्विकारभाव आहेत. जन्मतो तो बाढू लागतो, मोठा होतो, क्षीण होऊ लागतो व असा कांही दिवस राहून शेवटी नष्ट होतो. नवयौवनाचे सौंदर्य वृद्धपणी नसते. केस पांढरे होतात. शरीराला सुरकुत्या पडतात. कातडी लोंबू लागते. डोळ्यात चिपडें दाटतात. नाकांत मेकडे भरतात. लाळ गळू लागते. बघवत नाही. इतके होते की स्मरणशक्तीही असत नाही, या म्हातारपणाच्या आंतच मुक्तीचे कांही साधन झाले तर झाले. अशा म्हातारपणी काय होणे शक्य आहे ? यासाठी तारुण्यातच कांही प्रयत्न करावा. तारुण्यदशेत शहाण्याने ऐहिक अशा या कोणत्याही भोग सुखात मन न गुंतविता राहावे. आपल्याबरोबर येणारे यांत कोणतेही नाही.

भाग 65

आहाराच्या पवित्र वा अपवित्रतेमुळे मनहि पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार, विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिति बनली जाते. शुद्ध आहार, शुद्ध मनुष्याकडून झालेली शुद्ध पाकसिद्धी, भोजनाच्या पंक्तीतहि आपल्या नुसत्या दर्शनाने सद्भाव उत्पन्न करू शकणाऱ्या उच्चकोटीतील आदर्श व्यक्ति असून आपले मनही परमात्म्याच्या उच्च पवित्र विचारयुक्त असेल तर त्या खाल्लेल्या अन्नाद्वारें मन शुद्ध, पवित्र व निर्मळ राहून सत्कर्मास प्रेरणा देईल व परमात्म साधनेस अनुकूल राहील.

भाग 66

आत्मसाक्षात्कार होऊन केवळ एकमेव स्थिति प्राप्त होईपर्यंत मानवी जीवनांत व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही गोष्टींचे मिश्रण झालेले असते.. आपणा सर्वांना असत् पासून सत् वस्तूंकडे, तमसकडून स्वप्रकाशाकडे, मृत्यूपासून अमृतत्त्वाकडे, विषमतेकडून समतेकडे, द्वैतातून अद्वैताकडे, अनेकत्वातून एकत्वाकडे, औपाधिक दृष्टीपासून निरूपाधिक आनंदाकडे जावयाचे आहे. धष्टपुष्ट असणारा लवकर जाऊं शकत असला तरी इतर मुला-म्हाताऱ्याबरोबर यात्रेसाठी निघाले असता त्यांची शक्ति, वेग प्रकृति इत्यादि लक्षात घेऊनच जावे लागते. इतकेच नव्हे तर मुलांसाठी घरातील सर्वांना पथ्य करण्यासारखे जनसामान्यास आपले आचरण तारक ठरेल अशा तऱ्हेने समाजांत असणाऱ्या महात्म्यांना राहावे लागते.

भाग 67

साधकाने आसनें, थोडा प्राणायाम करून सूर्य नमस्कार घातले तर शरीरही काटक, सडपातळ व शक्ति उत्साहयुक्त राहाते. थंडीही बाधत नाही व आरोग्यासहि तें चांगले असते. मनाची प्रसन्नता जास्त होऊन जास्त वेळ एकाग्रता करणारे आसनच महत्त्वाचे आसन होय. आसनांत लाभप्रद आसनें म्हणजे सिद्धासन, पद्मासन व स्वस्तिकासन. प्राणायामुळे आळस जाऊन आरोग्य, उत्साह व स्फूर्ती प्राप्त होते. प्राणायाम करतांना प्रथम मात्रा न वाढविता अनायासाने करणे लाभकर होय. मात्रा वाढविणे असल्यास किंचितहि कष्ट वाटणार नाही अशी सावकाश वाढवावी. भस्त्रिकाही चांगली असून ती एकदांच केली तरी कुंडलिनी शक्ती जागृत होते. .

भाग 68

अन्न हे पवित्र घरचे, पवित्र भावनेने केलेले, पवित्र धान्याचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते, जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात व तेच पुढे आपल्या प्रकृतीतहि रुजू लागतात. आपणास इतर कांही साध्य नच झाले तर जेवावयास बसण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून नामस्मरण करीत, वायफळ न बोलता, वाईटसाईट न ऐकतां ध्यानांतच मन ठेवून अथवा पवित्र अध्यात्मविचार करीत जेवणे काही अशक्य नाही. जेवतांना पवित्र भावना असावी म्हणूनच उत्तम उत्तम श्लोक म्हणण्याची प्रथा पूर्वजांनी घालून दिल आहे. श्री समर्थांनी श्रीहरी पावण्याचा एक सुगम उपाय सांगितला आहे.

जनी भोजनी नाम वाचे वदावे । अती आदरे गद्य घोषे म्हणावे ।।
हरी चिंतने अन्न जेवीत जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥

भाग 69

आम्हास आनंद पाहिजे आहे. तो शाश्वत असणारा हवा. शाश्वत म्हणजे नष्ट न होणारा, न नासणारा. जगांत तुम्ही कोठेहि जा, कांहीहि मिळवा किंवा अनुभव घ्या पण तो शाश्वत असू शकतच नाही. जे सुख विजेसारखे निमिषमात्र प्रकाश देऊन नष्ट होणारे असते ते स्वल्प व अल्प सुख होय. जे अल्प असते ते नाशवंत आहे. उत्पत्ति व नाश हा जगांतील सर्व वस्तूंचा धर्म होय. अशा पदार्थापासून मिळणारे सुखही नाशिवंतच असते, ते अविनाशी सुख नाही हे समजून घेण्यास ‘गुरू’च आवश्यक होत. गुरूकडूनच ते समजवून घ्यावे लागते. शाश्वत सुख प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर ते गुरूशिवाय मिळणार नाही.

भाग 70

अभिलाषा हेच भक्ति-ज्ञान-वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात, आनंदरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंदानुभवाशिवाय कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे. आनंदमात्रस्थिति हीच खरोखर आत्मस्थिती होय. या भावरूप आनंदाशिवाय इतर कोणाचेहि अस्तित्व असू शकत नाही, हेच प्राचीन असे मंगलमय सत्यरूप होय. अशा निश्चल, निर्विकल्प आनंदरूपाद्वारे तुम्ही सर्व तृप्त व कृतकृत्य होऊन आपले जीवन सफल करा!

भाग 71

मानवजन्म हा उत्तम जन्म आहे. नुसत्या इच्छेने किंवा मोबदल्यात मिळणारा असा हा जन्म नव्हे. कर्मप्रवाहांत तरंगत जन्ममृत्यूच्या चक्रातून जात असतां, कोणत्या तरी पुण्यफलामुळे तो प्राप्त होतो स्वर्ग-नरक, बंध मोक्ष ह्यांना जाण्याचे मार्ग मानव जन्मामधूनच आहेत. ह्या जन्मामध्ये काय करावयाचे हे ठरवून मृत्यूनंतर सुद्धा अनंतकाल अस्तित्वांत असलेल्यास काय अभिप्रेत आहे याचा विचार करणे हे एक उच्च कर्तव्य होय. परम सुखरूपी आत्म्याचे ज्ञान म्हणजेच ‘परमात्मपद हे समजून घेऊन परमात्म्याचे ध्यान करून त्यातच जीवन साफल्य प्राप्त करून घेणे हे मानवाचे मूख्य कर्तव्य होय. .

भाग 72

द्धा विभौ पुरुषों व्याघा सूर्यमण्डल भेदिनी ।
परिवाद्योगयुक्तश्च रणे योनिमुखोवृतः ।

जगांत योगयुक्त असलेले संन्यासी व रणामध्ये पाठ न दाखविता शत्रूच्या समोर शौर्याने लढत लढत स्वत बलिदान देणारे हेच खरे देशभक्त होत. पुरुषश्रेष्ठ असलेले हे दोघहि सूर्यमंडळ भेदून ब्रहमलोकात गमन करतात. सैन्यात गेलेल्या लोकांचा त्याग अतिमहान व कौतुकास्पद आहे. देशाच्या अभिमानाने देहाभिमानाचा त्याग करून, देहसुखाची पर्वा न करता संपत्ती, घर, पत्नी व मुले या सर्वांचा त्याग करून ते सैन्यात भरती होतात. भगवंताची कृपा त्यांच्यावर असते.

भाग 73

देहसुखासाठी योग्य अशी साधने प्राप्त करण्याकरितां आयुष्य वाया घालविणे हे मनुष्य जन्माचे साध्य नव्हे. इंद्रिय, विषय, देह, पदार्थ यांपासून मिळणाच्या सुखापेक्षाही महत्वाचे असे खरे सुख प्राप्त करून घेणे हे मनुष्याचे मुख्य ध्येय होय व त्या ध्येयासाठी प्रयत्न करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य होय. मानवजन्म हा उत्तम जन्म आहे. नुसत्या इच्छेने किंवा मोबदल्यात मिळणारा असा हा जन्म नाही. कर्मप्रवाहांत तरंगत जन्म-मृत्यूच्या चक्रांतून जात असतां कोणत्यातरी पुण्यफलामुळे तो प्राप्त होत असतो. स्वर्ग, नरक, बंध, मोक्ष यांना जाण्याचे मार्ग मानवजन्मामधूनच आहेत. ह्या जन्मामध्ये काय करावयाचे हे ठरवून मृत्यूनंतरहि अनंतकाल अस्तित्वात असलेल्यास काय अभिप्रेत आहे यांचा विचार करणे हे एक उच्च कर्तव्य होय.

भाग 74

श्रीदत्त, श्रीराम, श्री सीता, श्री मारुती, श्री समर्थ आणि मी, तूं सगळेच आनंदघन ब्रह्म आहेत, असा निश्चय करावा. असे केल्याने कोणाच्याही बाबत भेदभाव होणार नाही व श्रीदत्त चांगले की श्रीराम चांगले हा विचार येणार नाही. जप करतांना श्रीराम, श्रीदत्त, श्रीमारुती, श्रीसीतामाई, श्रीसमर्थ किंवा मी ह्यापैकी कोणाचेही ध्यान सहजरित्या दृष्टीसमोर आपोआप आल्यास त्यात भेदभाव न करता सर्वत्र आपल्या ब्रह्मरूपाचे दर्शन समजूनच ध्यान करीत जप करावा. कोणतीहि मूर्ती दृष्टीसमोर न आल्यास आनंदरूपाच्या जाणिवेने स्वरूपाचे ध्यान करावे व तेहि पुसुन गेले तर निर्विकल्प समाधीत राहावे.

भाग 75

ध्यानाचे बरेच प्रकार आहेत. ध्यानाने दृष्टीसाधन पडून तेजाचा साक्षात्कार होतो व आत्मा सर्वप्रकाशक आणि स्वतज्ञ स्वयंप्रकाशक आहे ही जाणीव उत्पन्न होऊन क्रमेण ‘आत्मसाक्षात्कार’ होतो. उपासनेचे सगुण ध्यान सावयव, साकार असते तर निर्गुण ध्यान आनंरूपाच्या केवळ जाणिवेचे असते. चरणांगुष्टापासून ध्यान करीत करीत संपूर्ण मूर्तीचे ध्यान दृढ करावे व नंतर उपासनेच्या कृपापूर्ण हास्यांत प्रगट झालेल्या स्वरूपानंदाच्या जाणिवेचे ध्यानच एकमेव उरवावे. असा हा सगुणातून निर्गुणात जाण्याचा क्रम आहे.

भाग 76

अखिल प्राणिमात्र सुखासाठीच प्रयत्नशील असतात. पण त्यांना प्राप्त होते ते दुःखच दुःख प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा ह्या त्रिलोकातहि शोधून सांपडणार नाही. पण परिणाम मात्र त्याच्या अगदी उलटच अनुभवास येतात. आज सारे जग दुःखाने व्यापलेले आहे. मग असा प्रश्न पुढे येतो की, सर्वांना नको असलेले दुःख येते तरी कोठून ? त्यावर असे सांगावे लागेल की, ‘हे सर्व लोक एका वस्तूच्या नावानें दुसऱ्या वस्तूचीच इच्छा करतात व त्यामुळे ती त्यांना मिळते त्यांची इच्छित वस्तू खरे सुख ही कधीच नसून केवळ ‘सुखाभास’ ही होय. सुखामास मूर्तिमंत दुःख असल्याने त्याच्या योगे ते दुःख व कष्ट यांपासून सुटू शकत नाहीत. खऱ्या सुखाला नीट ओळखून, समजून त्याचीच इच्छा केली गेली तर मानव दुःखसागरातून तरून जाऊ शकतो व हयाच ज्ञानाला ‘विवेक’ म्हणतात.

भाग 77

पाऊस पडतांना जसा भेदाभेद न करतां सगळीकडे सर्वावर पडतो व त्या जलसिंचनानें पृथ्वीवर, विश्व यच्चयावत जीव-जीवाणूं उत्पन्न होतात, जगतात, वाढतात, अस्तित्वांत राहतात त्याप्रमाणे श्रीगुरु सर्वावर कोणताहि भेद न करतां कृपेने वर्षाव करतात. ते कृपारूपी ‘जीवन’ तुमचे जीवन अवश्यमेव पूर्णतेने कृतार्थ करील. अज्ञानाला ग्रासून टाकून शिष्याला प्रकाशमान जीवन देईल व त्याला आपल्याप्रमाणेच स्वयंप्रकाशी बनवील. श्रीगुरुंनी कितीहि मार्गदर्शन केले तरी शिष्याची मोक्षाची इच्छा जेवढी तीव्र असेल, जितक्या आतुरतेने कोठेहि किंचितसुद्धा न चुकतां शिष्य साधना करतील, अहंकार, स्वप्रतिष्ठा आदि दुर्गुण जितक्या लवकर सोडतील, श्रीगुरूंनी केलेला उपदेश जितक्या लवकरांत लवकर आचरणांत आणून ज्ञानवैराग्यसंपन्न होतील तितक्या आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊं शकेल. लवकर त्यांना

भाग 78

सूर्योदयकालीन व सूर्यास्तकालचे अवर्णनीय चमत्कृतचे दृश्य पाहून लोक आनंदीत होतात, हर्ष पावतात. पण ही जीवितक्षयाची एक सूचना आहे असे मानीत नाहीत, आयुष्याचा एक दिवस गेला म्हणून आपल्या जीवितक्षयाचा विचार मात्र करीत नाहीत. मोठ्या हर्षाने जीवनाच्या उद्योगाला लागतात. सूर्योदय झाल्याबरोबर चैतन्ययुक्त डोळे बांधलेल्या घाण्याच्या बैलाप्रमाणे – विवेकदृष्टी नसलेले हे दिवसभर राबतात. सूर्यास्त झाल्याबरोबर त्या मूर्खाच्या मुखावर कामोपभोगाच्या कल्पनेचे हास्य विलसू लागते. पण सछिद्र घटांतून पाणी झिरपून गेल्याप्रमाणे हे जीवित नाश पावत आहे ही जाणीव मात्र त्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही. ऋतूंच्या परिवर्तनाने नवीन नवीन परिवर्तन झालेल्या दृश्यांना पाहूनहि ते रमतात, आनंद मानतात पण जीवितक्षयाचा विचार मात्र करीत नाहीत.

भाग 79

भावी परमोत्कर्षाचा मार्ग बिकट संकटाच्या खाईतूनच गेलेला आहे. परमात्मभक्तीचे कोवळे रोप चांगले वाढीस लागावयास ‘संसारातील जाच’ हे एक उत्तम प्रतीचे खत आहे. संसारातील कष्ट हे टाकीचे घाव असून त्याद्वारेच परमेश्वराची सुंदर मूर्ती बाहेर पडते. संकटे ही परमेश्वराच्या अत्युन्नतपदाला पोहोचविणाऱ्या सुखमय पायऱ्या असून त्या पायऱ्यावर चोर थोर महात्म्यांच्या पवित्र चरणांचे सुंदर उसे मनमुराद पहायला मिळतात. यातील प्रत्येक पायरी आपल्या मृदु-मंजुळ ध्वनीने साधकांच्या अंतःकरणांत असलेली खिन्नता घालवून जिकडे तिकडे भावी परमोत्कर्षाच्या आशेचे गोड किरण पसरवीत असते. साधकाला भासणारी ‘संकटे’ अपकारक नसून उपकारकच असतात.

भाग 80

श्रुतीने सांगितलेले प्रवृत्ति व निवृत्ति हे दोन मार्ग • सोडून पशुजीवन जगून अधोगति प्राप्त करून घेणें मानवी जीवनांतच शक्य आहे, हे सांगण्याचे प्रयोजनच नाही. दिन प्रतिदिन आपले राज्यशासनसुद्धा वणव्यास वाऱ्याप्रमाणे या पशुजीवनास अनुकूल होत आहे. तसेच इंद्रियांचे दास होऊन पशुप्रमाणें अनीति, दुष्टआहार-विहार अनुभवून शेवटी एक दिवस मृत्युवश होऊन कर्मभोगास योग्य असा हीन जन्म मिळवून दुःखाच्या गर्तेत पडणे, अशा रितीनें ह्या मानवजन्माचा शेवट होऊं शकतो किंवा स्या मानवजन्मांतच सदुपासना, सत्कार्य, सद्गुरुचा आश्रय यामुळे पाण्यात पाणी मिसळल्याप्रमाणें परमात्मा स्वरूपांत एकरूप होऊन निर्विषय सुखरूप असे दिव्य जीवन प्राप्त करून घेणेहि शक्य आहे. ह्या दोहीपैकी आपल्याला कोणता मार्ग आवडतो ?

भाग 81

ज्याने जिव्हा जिंकली तोच काम जिंकण्यास अधिकारी ठरतो. ज्याचे मन पुष्पा-फळांकडे खेचले जात नाही, जो गायनाने मुग्ध होत नाही, सुरस पक्वान्ने, सुबक अलंकार, सुंदर वस्त्रे, विपुल धन हे सर्व पहात असतांनाहि ज्याचे मन पाघळत नाही, जो भर तारुण्यांतहि देहाच्या अभिमानाने मुग्ध होत नाही, चुकूनसुद्धा सौंदर्यादि कोणत्याही कल्पनांच्या जाळ्यांत सांपडून कामादिकांची शिकार बनत नाही, कसल्याही बिकट परिस्थितीत ज्याचे धैर्य थोडेहि खचत नाहीं. मनुष्येच काय पण ब्रह्मादि देव देखील भ्रष्टविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतांनाही जो एक क्षणभरह ढळत नाही, जो कसल्याहि दुष्ट शक्तीच्या आहारी पडत नाही असा सर्व सर्वतोपरी बलिष्ठच खरा तेजस्वी. हाच एक निवृत्तिमार्गाचा अधिकारी.

भाग 82

मनुष्यास योग्यता प्राप्त करून घ्यावयाची असल्यास ‘विद्या’ हे एकच साधन आहे. परा व अपरा या दोन मुख्य विद्या होत. विद्या संपादनाव्यतिरिक्त त्यासाठी साधना ही मुख्य गोष्ट आहे. कोणती विद्या उत्कृष्ट आहे ? या प्रश्नास ‘ज्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय किंवा जीवनाची सार्थकता प्राप्त होते तीच विद्या हेच उत्तर होय. जी शिकल्यानें पारमार्थिक यश प्राप्त होईल, जी मानवी आदर्शत्वाला कारणीभूत होवून जीवोन्नति प्राप्त करून देईल व जीवन सुखासाठी जी कारणीभूत होईल तिलाच ‘विद्या’ म्हणता येईल. लोकपूज्यता, लोकहित, जीवनसार्थकता, परमात्मकृपा ह्या जिच्यामुळे प्राप्त होतात तिला ‘विद्या’ म्हणतात. विद्वानांच्या चरणकमलांत सम्राटाचे तेज असते.

भाग 83

आपला उद्धार म्हणजेच विषयवासनेचा त्याग. यासाठी दोन आश्रमांचा उपयोग होतो. पहिला गृहस्थाश्रम व दुसरा संन्यासाश्रम. सूक्ष्म निरीक्षणांनी व विचारांनी भोगांचा अनुभव घेऊन ते दुःखमय व निरुपयोगी आहेत असे समजून उमजून परमात्म्याकडे वळणे व त्याची प्राप्ती करून घेणे यासाठीच गृहस्थाश्रम आहे. शुद्ध विवेकाने विषयांत सुख नाही हे समजून घेऊन त्याचा संपर्कहि होणार नाही अशी काळजी घेऊन परमात्मसुखस्वरूप ओळखून घेणे हे संन्यासाश्रमाचें कर्तव्य होय. अशा रितीने भोगाने व त्याने परमात्मप्राप्ती शक्य आहे. दृश्य पण नष्ट होणारे, अपरिमित दुःखदायी अशा विषयसुखाचा संबंध सोडून मन परमात्म्याकडे वळविणे हीच जीवनाची धन्यता होय. जीविताचे सार-सर्वस्व होय. आणि तेच आपल्या जीविताचे ध्येय होय. तसेच ते साधल्यानेच आपली कर्तव्यकर्मे संपुष्टात येतात.

भाग 84

शाश्वत वस्तूच्या शोधार्थ निघालेल्या जीवाल स्वरूपाची ओळख पटून आनंदघन स्वरूपाच्या अनुभवात तो विरून असावा याच उद्देशाने श्रीगुरु शिष्यावर अनुग्रह करतो.
‘साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली | सुगम पथे नेऊन घाली । जेथील तेथे ||’
नित्यनेमाच्या जप ध्यान पारायणाने साधकाची भूमिका वाढत जाते. श्रीगुरु म्हणजे या चराचर विश्वाचे कोरीव सत्य आनंदरूप. यालाच ‘जगत्कारण अद्वय ब्रह्म’ असे म्हणतात. तेथे दुसरे कांही नाही. असे आपले निष्प्रपंच आनंदरूप म्हणजे ‘श्रीगुरु’ अशी निष्ठा बाळगून त्या आनंदात समरसून रहाण्याचा पर्यायच त्याच्या जपध्यानादिकांत आहे असे मानावे.

भाग 85

‘वासनात्मकं मनः । सङ्कल्पात्मकं मनः।’ अशा मनाच्या व्याख्या पूर्वाचार्यानी केल्या आहेत. पण ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाला सांगावयाचे झाल्यास ‘मननात् मनः।’ स्वरूपानंदाच्या जाणिवनेंच केवळ सुस्थिर राहणारा तत्त्वज्ञानाचा अथवा आत्मज्ञानाचा निश्चय म्हणजेच ‘मन’ म्हणून ज्ञानध्यानाभ्यासी साधकाने मानावे. जो आनंद स्वसंवेद्य आणि स्वमात्र राहणारा आहे त्यालाच ‘आत्मा’ म्हणजे ‘मी’ या भानाचे लक्ष्य मानून तदाकारस्थितीत इतर कसलेहि भान न उमटू देता अधिकाधिक वेळ राहण्याचा अभ्यासच ‘समाधीचा अभ्यास’ म्हणवून घेतो.

भाग 86

देहाचे अस्वास्थ्य आणि मनाचे अस्वास्थ्य ही दोन्ही आत्मस्थितीत दोष उत्पन्न करतात. महाभयानक अशा जन्ममृत्युरूपी संसारातून मुक्त होण्यासाठी ‘तूच आनंदरूप महत् तत्त्व आहेस’ असा मी जो उपदेश केला. होता, त्यावर निष्ठा ठेवून तत् परायण रहा. त्याने सर्व प्रकारचे दुःख, शोक, दौर्बल्य इत्यादींची निवृत्ति होईल आणि तू आनंदरूपाने चकाकशील. हा रोग, तो रोग इतकेंच नव्हे तर संपूर्णपणे तुझा भवरोगच नष्ट होईल. तू आनंदघन ब्रह्मरूपाने राहा. विचार करून पहा दैव, प्रारब्ध या सर्व अज्ञानाच्या कल्पनाच आहेत. ज्ञानदृष्टीने द्वैताची कल्पनाहि न होता तूं आपले अविकारी अंतर्बाहय एकाकार आपलेच स्वरूप असून या शिवाय इतर काहीहि होणार नाहीस.

भाग 87

जेवण करीत असतां जेवणांत लक्ष्य नसेल तर रुचकर अन्नानें पोट भरल्याचे समाधानहि मिळणार नाही, हे लक्षात घे! उपासना करीत असता त्या उपासनेच्या ठिकाणी श्रद्धा, प्रेम, आवड ही असावी लागते. इतकेच नव्हें, तर भटकणाऱ्या मनाला आंतच स्थिर करण्याचा प्रयत्नहि करावयास हवा! केवळ परमार्थाचे नाटक करून परमार्थप्राप्ति घडत नाही हे लक्षात ठेव! ‘वेशभूषण तें दूषण। अंतरी भूषण तें भूषण।’ असें समर्थांचे म्हणणे आहे. साधकाने सतत अंतर्मुख वृत्ती ठेवून समाधानाचा शोध घेणे हीच खरी ‘उपासना’ आहे. दृश्यमान व भासमान होणाऱ्या सर्वांचा संग सोडून अंतरंगात स्वतःचा शोध घेणे हा भगवत्प्राप्तीचा सुलभ उपाय आहे बरं ! !

भाग 88

आपला अभ्यास व आपले राहते ठिकाण याशिवाय अत्यंत जरूरीच्या कामाशिवाय इतर कुठेहि जाऊ नये. वाटल्यास ज्ञान प्रधान ग्रंथ थोडा वेळ वाचावेत. त्यातूनहि आपल्या अभ्यासाला अनुकूल असेल तोच विषय निवडून वाचावा. कशाचेहि चिंतन न करता, कसलीहि गोष्ट न आठवतां, कोणतीहि व्यक्ति अंतश्चक्षूंपुढे उभी राहूं न देतां, कशाचीहि आठवण न होऊं देता, व्यक्तिशून्य, निर्विकल्प राहण्याचा अभ्यास एकांतात राहून अहर्निश करावा. शंका, कुशंका, आशंका या सर्व वावग्या कल्पना आहेत. आपले केवळ ज्ञानमात्र स्वतःसिद्ध आनंदरूप सदाच निर्विकल्प, निर्वृत्तिक आहे म्हणून कसलीच वृत्ती उठू न देतां तो आपल्यांत मुरवून सदैव अद्वितीय, निष्प्रपंच, निर्विकल्प स्वयंप्रकाश एक आनंदरूप होऊन समाधीत राहावे.

भाग 89

विरक्ताने जीभ आवरावी. ‘सर्व जितं जिते रसे’ ज्यांना गोड गोड अथवा मसाल्याचे चमचमीत चटकदार पदार्थ त्यांतहि विशेष तळलेले, करपलेले, खुशखुशीत पदार्थ खाण्याची प्रीति असते, असे संसार सोडून प्रथम विरक्त दिसले तरी शेवटी त्यांचे ब्रह्मचर्य नष्ट झालेले असे कितीतरी ऐकले आहेत व पाहिलेहि पण बरेच ! जिव्हा व उपस्थ या दोन इंद्रियांचा कांहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आंतून आहे. विष पिऊनहि सुखाने असणारे ‘शंकर’ कोणी असतील तर असोत. नियमाला अपवाद असतो तरी पण प्रायः असेच दिसून येते. निस्पृहाने जिभलीचे चोचले पुरवीत बसू नये.

भाग 90

इंद्रियनिग्रहाची पकड शिथिल झाली की, अनिबंध ओढाळ इंद्रिये मन मानेल त्याप्रमाणे देहाला वश करून विषयाकडे ओढीत शेवटी शोचनिय अशा दुःखाच्या खट्ट्यात पाडतात. अविधि विषयोपभोग आरोग्याचा नाश करतो. मनाची शांती नष्ट करतो. समाधान अजिबात नाहीसे करतो. आचारलेले कृत्य तृषग्निप्रमाणे आंतल्या आंतच पापकर्त्याला भाजून काढीत असते. त्याचे जीवित निस्तेज होते. निराशा आणि दुःख यांच्या आचरणाने तो संपूर्ण झाकला जातो.
मनुष्याची परीक्षा चारित्र्यावरून होते हा कुलीन वा अकुलीन, वीर की भ्याड, पवित्र किंवा गलिच्छ हे त्याच्या आचरणावरून स्पष्ट होते.

भाग 91

मानवी जीवनासाठी शुभ आणि अशुभ असे दोन मार्ग आहेत. मळ्याकडे जाणारे पाणी मध्येच पाट फुटून दुसरीकडे जात असले तर आपण ते जसे मळ्याकडेंच फिरवतो त्याप्रमाणेच आपले मन अशुभ वासनेकडे जात असेल तर त्या मनास शुभ वासनेकडेंच फिरवावे. लहान मूल खडीसाखर म्हणून सोमल विषाचा खडा हातात घेऊन खाण्यास उद्युक्त झाले असता त्याची आई मोठ्या युक्तीने ते त्याच्या हातून काढून घेऊन जसा खरोखर खडीसाखरेचा खडा त्याच्या हातावर ठेवते त्याप्रमाणे मन जर विषयाचे ध्यान, चिंतन करीत असेल तर त्यास युक्तीने त्यामधून सोडवावे.

भाग 92

विषयोपभोगांचा त्याग करणे वाटते तितके सोपे नाही. परात्पर वस्तु, परमात्मस्वरूपाची आराधना व साधना हे सर्वांना साध्य होण्यासारखे नाही. वाटेल त्याला संन्यास ग्रहण करता येणार नाहीं व ते तितके सोपेडि नाही. ज्यांची विषयसुखाची आशा अद्याप शिल्लक आहे. अशांना संन्यासाश्रमाचा अधिकार नाही. अशांनी गृहस्थाश्रमी होऊन भगवद् आराधना केली पाहिजे. परमार्थात विघ्ने फार त्यांना जो तोंड देतो तोच विश्ववंद्य होतो. भगवंताच्या चरणी लीन झाल्यावर तेजस्वी मनुष्य उत्कट परमार्थात सर्व गुणांनी, सौंदर्याने, कर्तृत्वाने, अविष्कारानें उजळून निघतो.

भाग 93

विज्ञान शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत कोणत्याही विषयाचे संशोधन करीत असतां, एकाग्रचित्त होऊन जीवाची पर्वा न करतां सारखे प्रयत्न करीत राहतात. सर्वसामान्य भौतिक विषयासाठी जर इतक्या प्रयत्नांची आवश्यकता असते तर परमात्मतत्त्व जाणण्यासाठी सर्वसामान्य प्रयत्न पुरे पडतील काय? म्हणजेच परमात्मतत्त्वाचा विचार करण्यासाठी सर्व आयुष्यभर लक्ष लावून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
सन्मार्गसाधनेमध्यें प्रापंचिक व्यवहारच बाधक ठरतात. संसार सोडून परमार्थसाधनेसाठी प्रवृत्त होण्यास त्याचे पूर्वसुकृतच उपयोगी पडते.

भाग 94

मानवी जीवनाची सार्थकता सिद्ध करणाऱ्याच्या कार्यात मनालाही महत्वाचे स्थान आहे. मानवी जन्म प्राप्तीसाठी मन ही एक अनमोल चीज आहे. जगव्यवहारात हे एक साधन आहे. मानवास प्राप्त होणाऱ्या अनेक शक्तींचे उगमस्थान मनच होय. कोणत्याही कार्यसिद्धीसाठी मन अत्यंत खंबीर असावे लागते मन ज्या विषयांचे चिंतन करते तोच आपणास प्राप्त होतो मन ज्याचे ध्यान करील तत्स्वरुपी आपण बनतो. विषयात आसक्ती ठेवून त्यांचेच चिंतन केले तर मनहि त्यातच मग्न होऊन जडमूड बनेल. विषयातील क्षणभंगूरता, दुःख असे दोष आपल्यात आहेत असा भास होऊन त्यायोगे मानव आपला स्वतःचा खरा अधिकार गमावून बसेल.

भाग 95

मनाला एक क्षणहि रिकामे ठेवू नये, म्हणून श्रीसमर्थांनी ‘विरंग जावू नेदी क्षण’ असे म्हटले आहे. मन धारकी न धरता मोकळे सोडले की ते विषयाकडे गेलेच म्हणून समजावे. हे तत्त्वज्ञान व त्याची धारणा हे कठीण काम आहे असे वाटले तर देव अथवा श्रीसद्गुरु यांच्या सेवेत अहर्निश राबावे, मुखाने अखंड नामस्मरण चालू ठेवावे. एकंदरीत मनाला घाणेरड्या कल्पना करावयास वेळच मिळू नये असे करावे. ही सर्व साधने मन निर्विषय करून आत्मलाभ करण्यासाठी आहेत हे ध्यानांत ठेवावे. विषय भावनांनी युक्त असणारे मन बंधनकारक तर निर्विषयी मन मोक्षकारक जाणावे.

भाग 96

एका देहात सर्व इंद्रिये जशी आपापली कामे करतात त्याप्रमाणे एका सद्गुरुच्या संप्रदायात असलेल्या मंडळींनी आपापली कामे करावीत. कामे वाटली गेली म्हणजे कोणावरहि ओझे पडत नाही. कांही एकांतात व काही लोकांतात सर्वांचा काळ सुखासमाधानाने जाऊन सर्वांनाच स्व-परहित साधता येते. उपासनेची कार्येही व्यवस्थितपणे पार पडतात. अनंत आनंदमात्र असणारे आपले दिव्यस्वरूप कधीहि दुःखी होत नाही. शोक-मोहाची अडचण कसली ती त्याला कधीच होऊ शकत नाही. या नित्य सच्चिदानंदात्मक स्वरुपदृष्टीने आपापली कामे व्यवस्थितपणे करावीत. शांतता, गांभीर्य, औदार्य, सर्वसमत्व, आत्मियतृप्ति प्रत्येक कार्यातून दिसत असावी.

भाग 97

श्रीसमर्थांनी देश-धर्माच्या उद्धाराकरिता दिव्य तप आचरलेले ठिकाण म्हणजेच हा टाकळी मठ. ‘विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेवमृगेन्द्रता’ ह्या दृष्टीने श्रीसमर्थ मारुतीरायाचे अवतार असल्यामुळे त्यांना तपाची आवश्यकता नव्हती. ते स्वतः जन्मसिद्ध होते. ‘आधी केले मग सांगितले’ या त्यांच्या ब्रीदवाक्याला हे अनुसरून झाले. ‘मनी धरावे ते होते। विघ्न अवघेचि नासोनि जाते। कृपा केलीया रघुनाथे। प्रचीत येते।’ हे व त्याचे सत्वहि स्वधर्म व स्वराज्याच्या स्थापनेने निदशर्नास आणून दिले.
टाकळी मठाच्या जीर्णोद्धाराची तुमची मनीषा पाहून मला गगनांत मावणार नाही असा आनंद झाला आहे. कार्यात तुम्हाला संपूर्ण यश लाभो.

भाग 98

दासबोधाची पारायणे आणि श्रीतारकमंत्राचा जप जास्तीत जास्त जितका करता येईल तितका मनोभावाने करावा. साधनात वरचेवर उत्साह वाटावा. मनांत चांगलेच समाधान असावे. हृदयांत आनंदाचा पूर वाहावा. नियमबद्धता हेच तप. त्याने आरोग्यही उत्तम राहाते. शक्य तितक्या लवकर उठून स्नानानंतर भिक्षेपर्यंतचा काळ एकांतात जावा. स्याकाळांत ध्यान, जप याव्यतिरिक्त काही नसावे. सेवा अंगावर पडली तर त्यांत विघ्न मानू नये. ध्यान-जपाइतकेच त्याचे महत्व आहे. आहाराचा नियम आरोग्यानुरूप सात्त्विक असा आपल्या नियमाला बाध न येईल याप्रमाणे ठेवावा. प्रसंगोपात समयसूचकताही ठेवावी.

भाग 99

उणीव, अडचण, दुःख, शोक काळजी यांनीच संसार भरलेला आहे. कोठेतरी खूपशा उन्हाळी पावसांतल्या उन्हाप्रमाणे विषयी पामराला प्रथम प्रथम कोठे थोडावेळ विषयसुखाचे दिवस प्रांतदशेमुळे गोड वाटतात न वाटतात तोच पुढे वाढून ठेवलेल्या उणीवा, चिंता आदि आपल्या भीषण स्वरूपाने दृग्गोचर होवू लागतात. संसारात पडण्यापूर्वीच्या संसारसुखाच्या चित्ताकर्षक, हवेतल्या कल्पना संसारात पडल्यानंतर फार दिवस राहात नाहीत. ‘दुरून डोंगर साजरे’ म्हणतात ना, तसलीच परिस्थिती येथे आहे. जितकी संसाराची चिंता करावी तितका संसार बिघडत जातो. विषयासक्ती जितकी जास्त तितके दुःख होत.

भाग 100

विषयापेक्षा विषयाचे चिंतनच बाधक असते, चिंतनानेच विषयाची आसक्ति निर्माण होते. हे चिंतन विषयोपभोगाचे कारण होते. विषय-चिंतनानेच मन विषयाकार होवून निर्माण झालेल्या आसक्तीने त्या विषयाचा उपभोग होतो. बालकांत भोगवासना नसल्यामुळे देह-धनादि विषयाचे साहचर्य त्याला क्षुब्ध करीत नाही. भोग्यवस्तूंच्या ठिकाणची भोगवासना दोषदृष्टीने अन्य कोणत्याही योग, भक्ती, आत्मज्ञान या उपायांनी नष्ट झाल्यास केवळ भोग्यवस्तूचे साहचर्य चित्त क्षोभवूं शकत नाही. अशा योग्याचे चित्त नुकत्याच उत्पन्न झालेल्या शिशुप्रमाणे असते.

भाग 101

‘मनी धरावे ते होते। विघ्न अवघेचि नासोनि जाते। कृपा केलीया रघुनाथे। प्रचीत येते।’ श्री समर्थांनी सांगितले आहे. मनातील गोष्टी संपूर्णपणे सफल होतात, विघ्ने तात्काळ नाहीशी होतात, हे सर्व रघुनाथाच्या कृपेमुळेच शक्य आहे. साधनेशिवाय कृपा प्राप्त होऊ शकत नाही. मालकसुद्धा नोकरांकडून संपूर्णपणे काम करून घेतल्याशिवाय संपूर्ण पगार देत नाही. त्याचप्रमाणे पूर्णपणे भक्ती झाल्याशिवाय देवाची कृपाहि होत नाही. रघुनाथाच्या अनुग्रहानेच सर्वस्व प्राप्त होणें शक्य आहे. संपूर्ण महिना भरण्यापूर्वीच मागणी करणाऱ्या नोकराच्या पदरी निराशा येते. तशीच भक्ती पूर्णपणे न करता रघुनाथाकडे वर मागणाऱ्याचीही गत होते.

भाग 102

विजयामुळेच सर्वत्र विजय मिळतो. शहाण्या मनुष्यास भांडण करण्याची पाळीच येत नाही. आपले बोलणे सत्य, मधुर, हितकर व मित असावे. मारण्यापेक्षा बोलण्याने मनुष्य जास्त घायाळ होतो व त्यामुळे होणारी जखम कधीही भरून येत नाही. काया-वाचा-मनाने कोणाचेहि अहित चिंतू नये. धनार्जन न्यायाने करावे. आपण लोकांशी जसे वागू त्याप्रमाणेच लोकही आपल्याशी वागतात. परद्रव्य व परस्त्री याबाबतीत मन अत्यंत शुद्ध असले पाहिजे. तसे नसल्यास ते दुर्गतीस कारणीभूत होते. सदाचारी मनुष्यास तो जेथे जाईल तेथे यश व मान्यता मिळते. प्राण गेला तरी श्रीगुरुआज्ञा उल्लंघू नये. श्रीगुरुसेवेत आपल्या सर्व वैभवाचा उपयोग करावा !

भाग 103

भक्तीतच परमात्मपद प्रविष्ट असल्याने परमात्मा भक्ताधीन आहे. म्हणूनच परमात्म प्राप्तीसाठी भक्ती शिवाय इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. भगवद् चिंतन करणे हे मनाचे कार्य असून मनाची ती शक्ती वाढविण्याचे काम मानवाचे आहे. आपले मन निष्ठेने भक्तिमार्गाकडे वळविले पाहिजे. ‘नाशिवंत व अतीदुःखास कारणीभूत होणाऱ्या ह्या संसारातील वस्तूंवर विश्वास ठेवू नको. अविनाशी सुखस्वरूप, स्वयंसिद्ध अशा परमात्म्याचे चिंतन करून सुखी हो’ असा मनाला उपदेश करुन त्याला भक्तीमार्गाकडे खेचून नेले पाहिजे; प्रेमाने प्रेम मिळविले पाहिजे किंवा वाढविले पाहिजे. जे भक्त परमात्म्यास प्रेमाने वश करून घेतात अशांचाच परमात्मा दास होतो.

भाग 104

अहंस्फूर्तीच्या पुढे माया अविद्येचे क्षेत्र आहे. महान नटी असलेल्या मायेकडे जीवाचा जेव्हा दृष्टीपात होतो तेंव्हा पूर्वस्थितीची विस्मृति होऊन बहिर्मुखतेस प्रारंभ होऊन हळूहळू गोते खात खात सरळ संसारसमुद्रात तो खोलवर जाऊन पोहोंचतो व त्याला स्वस्वरूपाची अजिबात विस्मृति होऊन हृदयांत मनाच्या अनेक प्रकारच्या विक्षेपक शक्ती फैलावतात. तसेच त्याच चंचलता, आशा तृष्णा आदींच्या रूपांत परिणामित होतात. या वृत्ती विषरूप विषयाचे सेवन करून, जीवभाव द्वारा बद्ध होऊन जन्म मृत्युरूपी संसारचक्रांत फिरत राहतात. मग जेंव्हा श्रीगुरुंची पूर्ण कृपा होते तेंव्हाच जीवाला तत्त्वांचा साक्षात्कार होऊन मोक्षप्राप्ती होते. आपल्या हृदयातील विक्षेपवृत्तीच्या अधिकतेस आत्मस्वरूपाचा प्रसादच समजले पाहिजे. बंधन व मुक्ति हे दोन्ही अज्ञानाचा व ज्ञानाचा विलासच होय.

भाग 105

दारेषणा, पुत्रेषणां, वित्तेषणा ह्या इच्छा, लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना हे सर्व सोडून जो स्वस्वरूपच आत्मानंद आहे; खरा आनंद आहे असे समजून त्यांतच रममाण होतो तोच खरा संन्यासी होय. स्वरूपांत असलेल्या अनंतानंदावर आरोपित केलेले पिंड, ब्रह्मांड, जीवेशादि तसेच पुरुषभावनादींना सोडून जो स्वस्वरुपाच्या आनंदरूपानेच केवळ निर्विकल्प असतो तोच ‘यति’ होय. संन्याशांना प्रणवाशिवाय मंत्र नाही, सर्वात्मदृष्टीशिवाय जीवन नाही आणि अद्वितीय आनंदाशिवाय त्यांना कोणतेही अस्तित्व नाही.

भाग 106

क्षणोक्षणी होणाऱ्या वाढत्या उपाधींच्या कष्टाने मन मंडावून जाऊ देऊ नये, चढती वाढती अध्यात्मिक उन्नति बूटु देऊ नये. प्रत्येक पायरीप्रमाणे जीवनाचा प्रत्येक क्षण उन्नतीकारक व्हावा, दिवसेंदिवस दैवी संपत्तीचे तेज वाढत जावे. उपासनेच्या प्रेमाने उदंड उपासनेची कामे होत असतांहि मन अंतरंगात गढून असावे. प्रत्येकाचे जीवन हे स्वपरहिताकरता आहे ही खूणगाठ प्रत्येकानेच आपल्या पदराला बांधून ठेवावी, मनाच्या ठिकाणी कोणच्याहि प्रकारची संकुचित भावना असू नये.

भाग 107

प्रीतीनेच प्रीति वाढते असा मानवी मनोधर्म आहे. हीच गोष्ट देवलोकासही उपयोगी पडणारी असून परमात्म्याच्या बाबतीतही तीच गोष्ट योग्य ठरते. परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यभाव प्रीति, प्रेम ठेवणे हीच भक्ती होय. निरनिराळ्या योगसाधनांनी सर्व काही साध्य होत नाही. देहदंडण, मनोनिग्रह इत्यादि उग्र कर्मे त्यात सांगितली आहेत. पण भक्तीमार्ग तसा नाही. भक्तीचे मुख्य लक्षण अनन्य शरणागतीच होय. ‘हे दयाघन परमात्मा ! तूंच माझा उद्धार कर. मी इतर कोणासहि शरण जाणे शक्य नाही.’ अशी एकमेव दृढ . भावना असली की भक्तिमार्ग सुलभतेने साधता येतो.

भाग 108

जागे झाल्यानंतर स्वप्नातील दृष्य जसे मिथ्या ठरते तसाच जगांतील सर्व व्यवहार मिथ्या आहे, इतकेच नव्हे तर उपासना-उपासक, गुरु-शिष्य, बंध-मोक्ष इत्यादि सर्व कांही स्वप्नातील दृष्यासारखेच होय, येथपर्यंत या मिथ्यत्वाची मर्यादा आहे. नित्य सच्चित्सुखस्वरूपाची ज्ञानमय ज्योत हृदयांत प्रज्वलित असावी. कांही लोकांना ज्ञानप्राप्ती झाली तरी उपासना व गुरुसेवा यांची वासना त्यांच्यात शिल्लक असतेच. उपास्य व गुरु हे आपल्या आत्म्याहून अभिन्न आहेत असा दृढनिश्यच झाल्यानंतर तो बाधक होत नाही. परमार्थियांचे जीवन सर्वतोपरी आनंदरूप तसेच परमार्थमहत्वदर्शक व शिक्षणप्रद असले पाहिजे.

भाग 109

परमात्म्याच्या सत्यस्वरूपास न जाणणे हेच अज्ञान होय, मृत्यु होय व हीच विस्मृति होय. हे अज्ञान ऐहिक व्यवहाराचे मूळ कारण असून त्याचे फळहि अज्ञानच. परमात्म्याबद्दलचे अज्ञान म्हणजे त्याला न ओळखणे, न समजणे व तेच जन्ममृत्यूचे कारण. अंती हे जीवनसुद्धा अज्ञानमयच. परमात्म्यास विसरून जाऊन अज्ञानी आपली हानि करून घेतो व संसारांत दुःख भोगीत राहतो. हे दुःखच मृत्युदुःख उत्पन्न करते. या विस्मृतिरोगाचे एकमेव औषध ‘विवेक’ हेच होय. परमात्म्याचे विस्मृतिरहीत स्मरणच ‘विवेक’ होय.

भाग 110

केवळ आनंदरूप असणाऱ्या परमात्म्याचे अस्तित्व ठरवून “श्वास घेतां ‘सो’ टाकिता हूं” असा होत असलेला स्वरूपानुभवच श्वासानेहि प्रगटतो म्हणून नासिकाग्रदृष्टीने श्वासाकडे लक्ष्य ठेवावे व ‘सोऽहं’ चे असे चिंतन ध्यानाच्यावेळी करीत जावे. केवळ श्वासावर लक्ष ठेवल्यानेहि चित्तैकाग्रय होते. परमात्मा सर्वज्ञ आहे. ‘माझे साहे परी माझ्या भक्ताचे न साहे’ म्हणून उद्घोष करणारा परमात्मा भक्तांचे कधीतरी अनहित करील काय आपल्या भक्तांचे पाऊल क्षणोक्षणी पुढे पुढेच उन्नतिमार्गाकडे पडत असलेले पाहून भगवान संतुष्ट होतात.

भाग 111

आनंदस्वरूपी अशा परमात्म्याचे होणारे अभेद दर्शनच ‘ज्ञान’, निर्विषय मन होणेच ‘ध्यान’, कामादिविकारांचा मळ जाऊन मन शुद्ध होणे हेच ‘स्नान’, आणि इंद्रियांचा निग्रह हेच ‘पावित्र्य’ असे तुला वेदांचे सांगणे आहे इकडे तूं लक्ष्य देशील कां ? तुझे असे सुशांत, परमपवित्र नि मंगलमय आनंदरूपी जीवन ज्या दिवशी होईल तोच सुदिन ! त्यासाठी तुला प्रयत्न करणे नको कां ? तुला निवृत्तिमार्गाचा म्हणजे संन्यासाचा गगनभेदी परमोच्च मार्ग पेलत नसेल तर यथोक्त गृहस्थाश्रमाच्या प्रवृत्तीचा धोपटमार्ग तरी सोडू नकोस ! !

भाग 112

आत्मस्वरूप नित्य, शुद्ध, सच्चिदानंदघन आहे. तूं त्या शुद्ध प्रकाशमय आत्म्यास देहामध्ये सामावून घे. देह अत्यंत तुच्छ व अपवित्र आहे. आत्मबुद्धीचे निराकारण करून स्वस्वरूपांतच स्थित राहिले पाहीजे. श्रीगुरुदेवही तुमच्या आत्मस्वरूपांमध्येच आहेत. श्रीसद्गुरुचरणाविंदामध्येच ऐक्य मिळवायचे असल्यास देहेंद्रियांची उपाधी बाजूस सारल्यास ते शक्य आहे. आपल्याच आत्मस्वरूपी सद्गुरूंना गौरवपूर्वक राहूं द्यावयाचे असल्यास श्रीगुरुंच्या शुद्धतेचा व पवित्रतेचा महिमा समजून घेऊनच उपासना केली पाहिजे. पवित्र अशा आत्मभावाशिवाय श्रीगुरुदेवांना आपल्या अपवित्र देहाने स्पर्श करूं नये. देहदृष्टीही अत्यंत खालच्या पातळीची गोष्ट होय.

भाग 113

मनुष्याची जगण्याची तऱ्हा काही औरच आहे. आपला जीवनस्तर रोजच्या रोज ज्यामुळे उंचावला जाईल याचा तो प्रयत्न करीत असतो व हेच मानवी जीवनाचे वैशिष्ट्य होय. हीन स्थितींतून उन्नत स्थितीकडे जाणे व उन्नतावस्थेतच वाढत वाढत जाणे हीच सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ असलेल्या मानवाची दृष्टी असते. इतर प्राण्यांपेक्षा मानवांत वैशिष्ठ्य असल्यामुळे उन्नत स्थिती प्राप्त करून घेण्यास तो जन्मापासूनच प्रयत्नशील असतो. मानवी देहाचे वैशिष्ट्य केवळ देह जगविणे म्हणजेच व्यावहारीक जीवन जगण्यासाठी नाही. त्यापेक्षा कांहीतरी जास्त मिळविण्यासाठीच त्याची निर्मिती केली आहे. इंद्रिय, विषय, देह, पदार्थ यांपासून मिळणाऱ्या सुखापेक्षाही महत्वाचे आत्मसुख प्राप्त करणे हे मनुष्याचे मुख्य ध्येय असून त्यासाठी प्रयत्न करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य होय.

भाग 114

कोणत्याही व्यक्तीला पहात असतां दिसणाऱ्याच्या नामरूपाला न पाहतां त्याला आधारभूत असलेले शुद्ध चैतन्यस्वरूपालाच पहावे. त्यामुळे मन विकारी न बनता निर्विकारी होते, अशा तऱ्हेने नेहमीच सर्वत्र भरून असलेल्या अखंड अशा केवल चिद्रूपातच कायम रहावे. यशस्वीपणे जीवन जगावयाचे असेल तर ते केवळ सदाचारामुळेच होय. सदाचारात फार सामर्थ्य आहे. सदाचाराच्या प्रभावाने कालाचाही निग्रह करता येईल. केल्यानेच सर्व काही होते केले नाही तर कांहीही होणार नाही. सदाचारी मनुष्यावर परमेश्वराची कृपा असतेच.

भाग 115

माथेच्या संपर्कामुळे मन कलुषित होते व त्यामुळे मनाला सत्य जाणून घेण्याची शक्ती राहत नाही. इतकेच नव्हे तर जे खरे नाही ते खरे भासू लागते व जे खरे आहे त्याचे विस्मरण होते. मनाच्या कलुषितपणामुळेच दुःखदायी विषयामध्ये सुखाचा आभास होतो. शाश्वत सुखाचे साधन त्यास सापडत नाहीं, अशा प्रकारचा विपर्यस्त भाव होत असल्यामुळे मन पाप कर्माकडेच प्रवृत्त होते. ह्या गोष्टीला बंधन घालण्यासाठी धर्ममार्गप्रवृत्तीच सहाय्यभूत होईल. धर्मप्रवृत्तीच विषयव्यामोहाला चुकवूं शकेल. विवेकदृष्टी प्राप्त करून, परमात्म शक्तीवर विश्वास ठेवून, तिची आराधना करून, जन्माचे सार्थक प्राप्त करून पुढे कष्टप्रद तापत्रय प्राप्त होणार नाहीत असे करून घेणेच मानवजन्माचे मुख्य ध्येय होय.

भाग 116

परमेश्वर हा आपला प्राण आहे. त्याच्यापासून अलग होण्याची इच्छा सुद्धा न करणे हे उत्कट प्रेमाचे लक्षण आहे. परमेश्वरास आपला मित्र, माता-पिता, नातलग, विद्या, लक्ष्मी, धन सर्व कांही मानावे. अशाप्रमाणे परमेश्वरावर मैत्री करा, विवेक धरा व परमात्म्यावरील ममतेचा कधीही त्याग करूं नका. पण ह्या वचनावर आमचा विश्वास असला पाहिजे. तसेच विवेकही हवा. विवेकाचा त्याग करून विस्मृतीच्या कह्यांत जाणारास कधीहि शाश्वत मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून सर्वांनी विवेकाने परमात्म्यास शरण जाऊन, विस्मृतीवर मात करुन, विजय मिळवून नित्यानंदात निमग्न व्हावे.

भाग 117

खरोखरच सुख म्हणजे परमात्मप्राप्ती. परमात्मा हा एकमेव सत्य आहे हे ज्ञान जेव्हा होते तेव्हाच त्याची प्राप्ती होते. जगातील उपभोगांनी चित्तशांती लाभ नाही. जगांतील पदार्थात सुख असते तर त्याच्या प्राप्तीनंतर का बरे सुख मिळत नाही ? त्यावरून त्याच्यात सुख नाही ही गोष्ट निश्चित होते. मानवी जीवनाचे परमलक्ष्य असलेल्या शाश्वत सुखरूप परमात्म प्राप्तीचा मार्ग म्हणजेच धर्माचे शासन, कारभार, तो मार्ग सोडून वेगळा मार्ग धरल्यास ‘आपण वाट चुकलो’ हे, समजेल तेव्हा आपण किती दूर गेलो असू तितके मागे परत यावे लागेल.

भाग 118

जे अनंत, अविनाशी व सर्वाधिक आहे ते सुख म्हणून समजावे, असे श्रुति म्हणते हे कोणीही समजू शकतो. ज्याला नाश आहे ते अल्पकालीन असल्यामुळे ‘अल्प’ असतें व अल्पामध्ये सुख नसते म्हणजेच सुख नसून दुःखच असते हे स्पष्ट होतें ‘अल्पविद्यो महागर्वी’ म्हणतात ना! त्याप्रमाणेच हे अल्पसुखहि महागर्विष्ट, याला मस्तीहि फार मोठ्यांचा अपमान करून आपली शेखी मिरविण्याची दांडगी हांवहि अल्पांत असते. तसेच महान सुख झांकून त्याचा प्रचार होऊं न देतां त्याच्यावर दोषारोप करून, हें अल्प असणारे वैषयिक सुख प्रपंचात आपलीच शेखी मिरवत सुटले आहे. वाटमाऱ्याचा याचा धंदा, तर ‘यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषं इव!’ असे याचे लक्षण !

भाग 119

धर्माचे कांटेकोर रितीने पालन करीत असतां चुकून मृत्यु आला तरी तो मुक्ति देतो. धर्माचे रक्षण करणाऱ्याचे धर्मही रक्षण करतोच. कामाने, भयाने, लोमाने, किंबहुना जगण्याच्या हेतूनेही क्वचितसुद्धा धर्माचा त्याग करूं नये. ऐहिक सुख क्षणभंगुर असून नरकाचे साधन आहे. मला विचारले तर, ‘धर्माकरितां प्राण द्या, पण अधर्माकडे वळून देखील बघू नका’ असेच मी सांगेन आणि तसेच स्वतः वागेनहि, धर्माकरता प्राण दिल्यास पुढे तरी सुख आहे. अधर्माने कुठेच आणि कधीच सुख म्हणून मिळत नाही.

भाग 120

विजयादशमी हा मोठा आनंदाचा दिवस. हिलाच ‘विद्यादशमी’ हि म्हणतात. कोणत्याही मंगल कार्यास प्रारंभ करण्यास व ते निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास हा एक सुयोग्य सुमुहूर्त आहे.
वैदिक धर्म परंपरेस अनुसरून आलेला हा विजयादशमीचा दिवस परमार्थासाठी उपयोगात आणून बाल्यावस्थेपासून स्वतःवर झालेल्या संस्कारामुळे आपल्या व दुसऱ्याच्या उद्धारासाठी ब्रम्हचर्याश्रमात असताना शुभ अशा ह्या विजयादशमीच्या दिवशीच मी तपश्चर्येसाठी पुण्याहून सज्जनगडी जाण्यास निघालो. ‘तपसा कि न सिध्यते ?” तपाने काय सिद्ध होत नाही ह्या म्हणण्याप्रमाणे आनंदित होऊन तूर्याश्रमस्वीकारासाठीही मी हाच दिवस निश्चित केला. म्हणूनच विजयादशमीचा हा शुभ दिवस माझा तपोदेहरूपी वर्धापनदिन आहे.

home-last-sec-img