Literature

अविद्वानास पुनर्जन्म

अनन्दा नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । तास्ते प्रेत्याभिगच्छन्त्यविद्वांसोऽबुधा जनाः ॥ (बृ.अ. ४ प्रा. ४.११.)

– आत्मज्ञान नसलेला अविद्वान, अनात्मसुखाची म्हणजे इंद्रियजन्य विषयसुखाची इच्छा असणारा अज्ञ मात्र इथे असतांना व मरणोत्तरहि खऱ्या सुखास मुकतो. देहांतानंतर विषयोपभोगयुक्त अशा आत्मस्वरूपाच्या अज्ञानांध कारानें व्याप्त असलेल्या आनंदशून्य, अनित्य व दुःखमय मर्त्यलोकास तो प्राप्त होतो, तेथे जन्म घेतो. ईशावास्य उपनिषदांत देखील अशाच तऱ्हेचा एक मंत्र आहे.

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽवृताः । ता स्ते प्रत्याभिगच्छन्ति येके चात्महनो जनाः ॥( इशा. ३)

या मंत्राचा विचार चालला असतां ” ज्ञानेंविण प्राणियांसी । जन्म मृत्य लक्ष्य चौन्यांशी । तितक्या आत्महत्या त्यासी । म्हणोनि आत्महत्यारा ॥ ” ८ । ७ । २८ ॥ ही समर्थांची ओवी आठवते.

आत्मज्ञानशून्य हेच आत्मघाती म्हणवून घेतात. असे जन मरणोत्तर अन्धतमानें व्याप्त असणाऱ्या असुर्या नामक लोकांना जातात असा मंत्रार्थ झाला. ईशावास्यांत “ असुर्या नाम ते लोकाः ” असे आहे व बृहदारण्यांत ” अनंदा नाम ते लोका: ” असे आहे. यावरून असुर्या व अनंदा हे दोन्ही शब्द एकार्यबोधक आहेत हे कळून येते. निर्विषय आत्मज्ञानानें निरवधि आत्म सुखाची प्राप्ति न करून घेतां विषयलोलुपतेनें पुन्हां जन्म घेणाऱ्या जीवाला अबुध, अविद्वान व आत्मघातकी म्हणून म्हटले आहे. इथें भागवतांतील—

नृवेमाचं खुलं सुदुर्लभं एवं सुकल्पं गुरुकर्णधारम् । मयानुकूलेन नमस्वतेरितं पुमान्मवाधि न तरेत्स आत्महा ॥( भागवत स्कं. ११)

या श्लोकाची आठवण होते.

–मुमुक्षुतेनें व भगवद्भक्तीनें सुलभ व विषयेच्छेनें दुर्लभ होणारा, अत्यंत महत्त्वाचा हा नरदेह म्हणजे भवसमुद्राचें एक सुदृढ तारूच होय. इथला नाविक म्हणजे सद्गुरु यांत सुकृतानें ठाव मिळून सद्गुरुनावाड्याचा लाभ होऊनहि व त्यांतूनहि माझ्या ईश्वरी कृपेच्या अनुकूल वाऱ्याचा लाभ होऊनह जो हा भवसिंधू पार जात नाहीं तो आत्मघाती होय हा या श्लोकाचा अर्थ.

home-last-sec-img