Literature

अश्विन वद्य अष्टमी

देहामध्ये काय आहे ? देहसुखासाठी मोहित होणे म्हणजे केवळ मूर्खपणाच होय. मुक्तिकोपनिषदांत श्रीरामरायांनी श्रीमारूतीरायास उपदेश करतांना म्हणाले,’ अरे बाबा, सृष्टी निर्माण झाली ती वैराग्यासाठीच, आत्मप्राप्ती करून घेतां यावी म्हणूनच. आपला देहही दुर्गंधीने भरलेला, अपवित्र निर्माण केला तेही वैराग्यासाठीच. संपूर्ण जीव, सर्व धातू यांची निर्मिती सर्व काही वैराग्य निर्माण होण्यासाठीच ! अशाप्रकारे हे सर्व काही निर्माण केले आहे ते वैराग्य निर्माण होण्याकरिताच होय. आपल्या देहातील दुर्गंधीने ज्याला वैराग्य निर्माण होत नसेल तयाला अशी कोणती उदाहरणे दाखवावयास हवीत ? वैराग्य निर्माण होण्याचे हेच प्रमुख कारण आहे. डोळे उघडून पाहिल्यास आपला अनुभव समोर ठेवून विचार केला तर या सर्वांमध्ये सुख नाही हेच स्पष्ट होते आणि हे इतके स्पष्ट असून सुध्दा चालतांना डोळे मिटून घेऊन दिवसा उजेडी आपण खड्ड्यात पडलो तर त्याला काय करावयाचे ? हे असे असल्याने आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. आपल्या हातून आपण आपला नाश करून घेऊ नये. यासाठी स्वतःस स्वतःचा भाऊ व्हावयाचे असेल तर आपले मन जिंकल्यास तोच आपला भाऊ होईल, हीतप्रद होईल. पण देहच मी असे समजून त्यावर आसक्त झाल्यास आपण आपलेच शत्रु होतो, असे भगवंतांनी म्हटले आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img