Literature

अश्विन वद्य चतुर्थी

वैराग्य ज्यावेळी पूर्णपणे प्राप्त होईल, त्याचवेळी तुला संन्यास घेण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होईल. तो काही कुणी द्यावयाचा नसतो. ती अवस्था जर तुला प्राप्त झाली नाही तर बिघडून जाण्यापेक्षा विधीपूर्वक गृहस्थ बनणे, गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणेच चांगले. या आश्रमात राहून, न बिघडता नियमांचे पालन करीत करीत गृहस्थाश्रमाचे पालन केल्यास मोक्षप्राप्ती होण्याची आशा असते पण बिघडून गेल्यास मात्र अवनतीच होईल. त्यापेक्षा गृहस्थाश्रमच चांगला. सर्वच्या सर्व नाश होत असतां अर्धे सोडून देऊन तो टाळणे हेच शहाणपणाचे लक्षण होय. त्याप्रमाणेच भ्रष्ट होऊन समाजकंटक होण्यापेक्षा निवृत्तीमार्गाच्या महान ध्येयाला सोडून त्यापेक्षा कमी दर्जाच्या, खालच्या पायरीच्या प्रवृत्ती मार्गाचेच अनुसरण करणे योग्य ठरेल, अशाप्रकारे हे प्रवृत्ती व निवृत्ती असे मार्ग आहेत. प्रवृत्ती हा परंपरेने चालत आलेला दूरचा मार्ग तर निवृत्ती हा साक्षात् त्या ध्येयाला पोहोचविणारी जवळची पाऊलवाट.

निवृत्ती ही महान पवित्र व मंगल आहे. तुला निवृत्ती साधता येत नसेल तर हे तरी कर, पण बिघडून जाऊ नकोस. निषिध्द अशा प्रवृत्तीने जगणे मात्र नको, अशाप्रकारे जगणे म्हणजे कुत्र्याचेच जिणे होय. संन्यास घेऊन भ्रष्ट झालेल्यांना *’ वान्त्याशन ‘* असे नांव आहे. वांती केलेले खाणारा प्राणी म्हणजे कुत्राच. हे कसले जिणे ! हे कुत्र्याचेच जिणे होय. त्यापेक्षा गृहस्थ होऊन त्यागबुध्दीचा अभ्यास कर !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img