Literature

अश्विन वद्य प्रतिपदा

‘ आनंदरूप अशा श्रीरामरायास सोडून तुच्छ, किळसवाणे, कंटाळवाणे, अपवित्र अशा विषयसुखाची इच्छा, ओढ, आसक्ती, ध्यान करणाऱ्या विषयासक्त मूढाला समाधान कसे मिळणार ? सुख कसे मिळणार ? असेच श्रीसमर्थांनी सांगितले आहे. असे असल्यामुळे हे मायाकार्य व त्यापासून निर्माण झालेला संसार, जग, संसारकल्पना, संसार आसक्ति, देहाभिमान इत्यादि सर्व काही सोडून देऊन आत्मस्वरूपाकडे वळणे हीच ‘ निवृत्ती ‘ अशा या निवृत्तीमार्गाचे महत्त्व फार मोठे आहे. ‘ तुम्हाला निवृत्ती हवी असेल तर विषयसुखाला विषाप्रमाणे दूर करा, सोडून द्या ‘ असे अष्टवक्राने म्हटले आहे. *’ जनी विष खाता पुढे सौख्य कैचें ‘* अरे बाबा, विष खाल्ल्यावर सुख उत्पन्न होईल काय ? असे श्रीसमर्थांनी म्हटले आहे. हा संसार व्यामोह अशाप्रकारे आत्मनाशास कारण असतो. म्हणून आपण जागृत होऊन निदान आता तरी त्या परमात्म्याचे ध्यान केले पाहिजे. परमात्म्याचे स्वरूप समजून घेतले पाहिजे.

*’ अध्यात्म ‘* म्हणजेच आत्म्यासंबंधीचे विचार, आत्मज्ञान हेच आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देते. अध्यात्मज्ञानाने अध्यात्मविद्येने आपण परमात्म्यास समजून घेतले पाहिजे. तर हे संसारबंधन तुटून जाईल, नाहीसे होईल. *’ ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशै: | ‘* त्या परमात्म्यास समजून घेतले तर, ओळखले तर, सर्वतऱ्हेचे पाश म्हणजेच विषयवासना निवृत्त होतात, नाहिशा होतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img