Literature

अश्विन वद्य षष्ठी

सामान्यजनासाठी सांगितलेला धर्म म्हणजे परस्त्रीला आपल्या मातेप्रमाणे मानणे. परस्त्रीला आपल्या आईप्रमाणे मानावे तर परद्रव्य मातीच्या ढेकळासारखे समजून निरिच्छ बनले पाहिजे. विधियुक्त लग्न करून आणलेली स्त्री चांगल्या उच्च कुलशीलातील व गुणवान असावी व तिचे रक्षण ‘ ती आपले अर्धांग आहे ‘ असे समजून करावे. कारण *’ अर्धो वा एक आत्मनोयत्पन्ती ‘* असे शास्त्र सांगते.

अहिंसा हा मुख्य आचार असून स्वतःप्रमाणेच इतरांनाही समजावे, जाणावे. शक्य होईल तितका परोपकार करावा. कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास देऊन दुःख देऊन हिंसा करू नये; दुसऱ्याला फसवून, दुःख देऊन, त्रास देऊन, पिळुन काढून मिळवू नये. अशाप्रकारे मिळविलेले द्रव्य टिकतही नाही. म्हणून या दृष्टिकोनातून अहिंसा अत्यंत महत्त्वाची आहे.

खरे बोलण्याचा शक्य तितका जास्त अभ्यास ठेवावा. पण एखाद्या कठीणप्रसंगी, उदाहरणार्थ, एखादा मनुष्य गोहत्या करण्यासाठी चालला असून त्याने ‘ बाबा रे ! आतां एवढ्यात गाय कोणत्या दिशेने पळली ? असे विचारले असता आपण जर खरें बोललो तर आपल्या हातूनच गोहत्या घडणार, अशाप्रसंगी सत्य मनात ठेवून प्राण्यांचे रक्षण होईल अशाप्रकारे आपण वागलो तर ते चुकीचे होणार नाही, असे शास्त्र सांगते. परंतु दुसऱ्याला फसवून अधर्माने जगण्यासाठी मात्र असत्याचा अवलंब करू नये.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img