Literature

अश्विन शुद्ध एकादशी

सर्वसामान्यजनांना विषयसुखाचा त्याग करणे हितावह आहे, योग्य आहे हे सोडल्याशिवाय महान सुखाची प्राप्ती होणार नाही. कारण त्यांना विषयसुखाची वासना आपल्याकडे सारखी ओढीत असते. यासाठी झोपेतून जागे झाल्यापासून पुन्हा झोप लागेपावेतोच्या मध्यंतरातील सर्व काळ कामादींच्यासाठी जाऊ न देतां, कामादींना जागृत न करता परमानंदरूपी परमात्म्याचेच ध्यान करा ! जागे असतांना थोडासुध्दा थारा देऊ नका. त्याचा प्रवेश होऊ देऊ नका असे श्रुतिमाता सांगते.

अशाप्रकारचे हे विषयसुख भयंकर विष, महान दुःख, महान संकट आणणारे व महान शत्रू आहे. ते आपल्या आकर्षणाने लोकांना फसवून, गोड गोड बोलून जीव घेणाऱ्या दुष्ट लोकांप्रमाणे वागून शेवटी नरकाचा रस्ता दाखविणारे, नरकामध्ये ढकलून देणारे आहे.

आत्मनाशास कारण असणारी, नरकाची काम, क्रोध व लोभ ही तीन प्रकारची दारे आहेत. म्हणून आपण नरकात जाऊ नये, आपला आत्मनाश होऊ नये असे ज्यांना वाटत असेल, ज्यांनी स्वहिताची दृष्टी बाळगिली असेल त्यांच्यासाठीच भगवंतांनी काम, क्रोध व लोभ यांचा त्याग करा, असे सांगितले आहे. काम क्रोधादींना सोडून, नरकाप्रत नेणारा हा मार्ग सोडून जे आत्मध्येयासाठी प्रयत्नशील असतात त्यांना श्रेयासाचा योग्य मार्ग सापडतो, प्राप्त होतो. पण काम, क्रोध, लोभादित बुडलेल्यांना तो मार्ग कधीही प्राप्त होत नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img