Literature

अश्विन शुद्ध तृतीया

ब्रह्मादिलोकामध्ये म्हणजेच ब्रह्मलोकांत, सत्यलोकांत जे सुख मिळते ते अल्पच असते. हे सुख मिळून
देखील सुखाची इच्छा पूर्ण न झाल्याने ती पूर्ण करण्याकरिता पुनर्जन्म घेणे टळू शकत नाही.

' मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते | ' मला प्राप्त करून घेतल्यानंतर मात्र पुन्हा जन्म नाही. असे श्री
भगवंतांचे म्हणणे आहे असे कां ? वरचेवर जन्म घ्यावा लागतो तो सुखाच्या इच्छेने, सुखाच्या वासनेने,
अतृप्त वासना तृप्त करण्यासाठी म्हणजेच सुख प्राप्त करून घेण्यासाठीच होय. जन्माला येऊन जे सुख
अनुभवावयाचे असते ते अल्प असल्याने तृप्ती, समाधान प्राप्त होत नाही. या सुखाशिवाय दुसरे एखादे सुख
आहे ही कल्पनाच नसल्यामुळे, त्या वेगळ्या सुखासाठी प्रयत्न करण्याचा संभव नसल्याने हेच सुख आहे असे
वाटते व त्यामुळे ' पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम् | ' अशाप्रकारची जन्ममरणाची
परंपरा ' नको ' म्हटली तरी सुटु शकत नाही.

कार्यरूपी सुखासाठी प्रयत्न करून त्या कार्याच्या फलाचा अनुभव घेऊन शांति मिळवावयाची असल्यास
ती असाध्य अशीच गोष्ट आहे. ' माझी प्राप्ती करून घेतल्यानंतर अल्पसुखाची, जन्ममरणाची आशाच
नाहिशी होईल ' असे जे भगवंत सांगतात त्यात कोणता अर्थ आहे ? खरे सुख मिळाल्यानंतर आपणात ऐक्य
झाल्यानंतर तो आनंदरूपच होईल. त्याला जन्ममरण नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img