Literature

अश्विन शुद्ध त्रयोदशी

परमात्म्याच्या चार पाऊलांचे अविद्यापाद, विद्यापाद, आनंदपाद व तूर्यपाद असे विवरण केलेले आहे. त्यातून आपणास साधावयाचे ते चवथे तूर्यपाद. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व नाश या तिन्ही कर्माच्या कार्याच्या स्फूर्तीकडे न पहाता स्फूर्तीज्ञान विवर्जित अशा शुध्द, बध्द परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. अनात्मरूपाच्या ठिकाणी आत्मरूपाची बुध्दी निर्माण करावयाची ! अशुचि असणाऱ्या देहास शुचित्वाची भावना निर्माण करावयाची ! दुःखरूपी असणाऱ्यांत सुखाची भावना निर्माण करावयाची आहे. अनात्म व अशुचि असणाऱ्या देहाचा ‘ संग ‘ अविद्येमुळेच निर्माण झाला आहे. अशा या अविद्येला सर्वप्रथम जिंकिले पाहिजे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती अशा तीन अवस्था आपल्याला असतात. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या जागृत, स्वप्न, सुषुप्ती अशा तीन देहाची कल्पना केली आहे. विराट हिरण्यगर्भ व अव्यक्त. विराट हा जागृती याचा अंशच ब्रह्मदेव. हिरण्यगर्भ हे स्वप्न, स्वप्नाची अधिदेवता, महत्त्वाची अधिदेवता. अभिमानी देवता. आपणांत असणारी *’ अहं ‘* मीपणाची स्फूर्ती या हिरण्यगर्भामुळेच तर नामरूपाची प्राप्ती विराटापासून होते. सुषुप्तीच अव्यक्त. याची अभिमानी देवता ईश्वर होय. जागृत, स्वप्न व सुषुप्ती प्रमाणेच विश्व, तेजस व प्राज्ञ अशा त्यांच्या अभिमानी देवतांची किंवा त्यांच्या अभिमान्यांची नांवे आहे. विराट अथवा वैश्वानर, हिरण्यगर्भ व ईश्वर अशी त्या परमात्म्यास या तीन उपाधींमुळे दिलेली नांवे होत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img