Literature

अश्विन शुद्ध दशमी

‘ विजयादशमी ‘ हा मोठा आनंदाचा दिवस. या दिवशी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजन आनंदित असतात. हिलाच ‘ विजयादशमी ‘ असेही म्हणतात. या नावांवरून तिचे महत्त्व उघडच दिसते. देव, मानव या सर्वांचा विजयी असा हा मंगलकारी दिवस आहे निसर्गाचे मनोहरत्व दृग्गोचर होणारी हीच एक मंगल वेळ आहे. कोणत्याही मंगलकार्यास प्रारंभ करण्यास व ते निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास हा एक सुयोग्य सुमुहूर्त आहे.

वैदिकधर्मपरंपरेस अनुसरुन आलेला हा दिवस परमार्थासाठी उपयोगात आणून बाल्यावस्थेपासून स्वतःवर झालेल्या संस्कारामुळे आपल्या व दुसऱ्याच्या उध्दारासाठी ब्रह्मचर्याश्रमांत असतांना शुभ अशा या विजयादशमीच्या दिवशीच मी तपश्चर्येसाठी बाहेर पडलो. ‘ तपसा किं न सिध्दते ? ‘ तपाने काय सिध्द होत नाही ? या म्हणण्याप्रमाणे आनंदित होऊन तूर्याश्रम स्वीकारासाठी मी हाच दिवस निश्चित केला. म्हणूनच विजयादशमीचा हा शुभदिवस माझ्या देहरूपी जन्माचा वर्धापनदिन आहे.

पूर्वाश्रमातील माता, पिता श्रीसमर्थसांप्रदाया असल्याने गर्भात असल्यापासूनच झालेल्या संस्काराचा परिणाम म्हणून ‘ श्रीसमर्थ हेच आपले गुरू होत ‘ अशी दृढभावना झाली व ब्रह्मनिष्ठा वाढविण्यासाठी याच विजयादशमीच्या सुमुहूर्तावर मी पुण्याहून सज्जनगडी जाण्यास निघालो. ते ब्रह्मनिष्ठातप अद्यापीहि चालु आहे. ‘ काळ सार्थकचि करावा ! जनासहित ‘ लोकांना बरोबर घेऊन कालाचे सार्थक करावे असा श्रीसमर्थांचा उपदेश आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img