Literature

अश्विन शुद्ध नवमी

विषय हेच विषापेक्षा महान विष आहे. असे कां म्हणावयाचे ? तर विषय हे विष एका जन्मातच आपले
काम संपवित नाही. एका जन्मात आपल्याला मारून मोकळे करीत नाही. त्याचे सामर्थ्य महान आहे. ते
मनुष्यास वारंवार जन्मास घालून पुन्हा पुन्हा मारते. विषय विषाचे हे एक लक्षण आहे. सामान्य विष मनुष्यास
एकदांच मारते पण विषयसुखरूपी विषाचे तसे नाही. ते अनेक जन्म देऊन अनेकदा मारते. म्हणूनच ' विषय
एव घोरं विषम् ' विषयच अत्यंत घोर असे विष आहे.

श्रेयस वेगळे व प्रेयस वेगळे. आपल्या वेगवेगळ्या फलानी ते मनुष्यास घेरते. प्रेयस जन्ममरणास कारण तर
श्रेयस मोक्षास कारण असते. मंदबुध्दी मनुष्य या जन्मी दिसून येणाऱ्या सुखाचे अनुकरण करून त्याचा
उपभोग घेतो. येथील दुःखाशिवाय इतर कोठे तरी सुख मिळेल या आशेने तसेच हाती आलेले सुख निसटून
जाईल की काय व ते निसटून गेले तर ते चांगले नाही असे समजून, हे सुख जीवनास चांगले आहे, अनायसे
प्राप्त होणारे व योगक्षेमास योग्य आहे असा विचार करून अल्पबुध्दी मानव प्रेयसालाच, प्रपंचसुखालाच
निवडतात. बुध्दीमान मानवमात्र श्रेयसापेक्षा अत्यंत क्षणभर रहाणारे, विजेप्रमाणे चमकून नाहीसे होणारे,
दुःखाच्या तोंडी देणारे ' प्रेयस ' हे खरे सुख नसून, ते जन्मपरंपरेला कारणीभूत होऊन, जन्मोजन्मी दुःख देऊन
छळ करते म्हणून त्यास न निवडता श्रेयसाचे गुणधर्म ओळखून त्यालाच महत्त्व देऊन *' श्रेयोगामी '* बनतो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img