Literature

अश्विन शुद्ध प्रतिपदा

उत्पत्ती नसणाऱ्या पासूनच हे जग निर्माण झाले आहे. सर्वांच्या शेवटीही अस्तित्वात रहाणाऱ्या शाश्वत
अशा कारणामुळेच हे जग उत्पन्न झाले आहे. उत्पत्तिरहित कारण मोठे की त्यापासून झालेले कार्य मोठे ?
उत्पन्न झालेल्या या जगाचे जे उत्पत्तिरहित कारण आहे तेच याचे कारण असल्याने तेच कार्यापेक्षा मोठे ठरते,
हे म्हणणे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

कारणाचा महिमा कितीही गायला तरी तो थोडाच असून त्यापेक्षा कितीतरीपटीने तो मोठाच आहे. म्हणून
कारणच मुख्य होय, कारणच प्रमुख होय. कशाच्या प्राप्तीने मनुष्य पुर्ण बनतो ? या प्रश्नास सहजरित्या '
कारणाची प्राप्ती कारणापासूनच पूर्ण होते ' असे उत्तर कोणीही देऊ शकेल.

आता यादृष्टीने विचार केल्यास 'कारणस्वरूपी' आनंद आपणास पाहिजे की 'कार्यरूपी' आनंद पाहिजे,
असे विचारले तर 'कारण'च परिपूर्ण असल्याने 'कारणाचाच' आपण आश्रय घ्यावा हेच स्पष्ट ठरते. कार्याची
सत्ता अगदीच थोडी. कार्य अल्प आहे. ज्याला नाश आहे ते अल्पच. ज्यास उत्पंत्ति, नाश आहे अशी

उत्पत्तिनाशयुक्त गोष्ट, पदार्थ वा जग आहे ते सर्व अल्पच. कार्य नाशयुक्त असल्याने ते अल्पच म्हटल्यानंतर
'अल्प सुख' हवे की 'अनंत सुख' हवे या प्रश्नास 'अनंत सुख' हवे हेच उत्तर कोणीही देईल. अशाप्रकारे कार्य
अल्प आहे असे म्हटल्यावर सुखप्राप्तीसाठी आपण कारणाचाच आश्रय घेतला पाहिजे हे स्पष्ट होते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img