Literature

आदर्श राज्य

आश्रित लोक सुखाने असले पाहिजेत. त्यांचा योगक्षेम उत्तम चालला पाहिजे. सर्व प्रजेच्या ठिकाणी सुखशांतीचें साम्राज्य पसरले पाहिजे. त्यांच्यांत ऐक्य असावें. त्यांची सुस्थिति दिवसेंदिवस वाढीला लागली पाहिजे. त्यांच्या आस्तिक्यबुद्धीचा दिवसेंदिवस विकास होत गेला पाहिजे. अध्यात्मनिष्ठेचें दिव्य तेज सर्वत्र फांकत असावें. प्रत्येकाच्या हृदयांत प्रकाशत असलेल्या · विश्वबंधुत्वाचें दिव्य दर्शन सर्वांना निववीत असावें. विविध विद्यांनीं व कलांनी राष्ट्र अलंकृत, सुंदर पुरुषाप्रमाणें सदैव शोभत असले पाहिजे. सौहार्द व सहानुभूति सर्वत्र नांदत असावी. जनीं वनीं निर्धास्तपणे उशाशी पैशाच्या थैल्या घेऊन कुणालाहि कुठेहि सुखानें झोपतां यावें, इतकी विश्वासार्ह भूमिका लोकांची असावी. अन्य स्त्रियांकडे पूज्य दृष्टीने पाहण्याचा सर्वोस अभ्यासच झालेला असावा. त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे कुठे माता तर कुठे भगिनी, कुठे कन्या या नात्यानें परस्त्रियांबरोबर वागण्याचा सर्वांना सरावच पडलेला असावा. वाटेंत अंधार पडून शेजारच्या अनोळखीच्या गांवीं एखादी स्त्री गेली असतां तेथील माणसांच्या वर्तनावरून तिच्या माहेरच्या माणसाप्रमाणेच तिला तेथें वाटावें, इतकें कोणत्याहि स्त्रीला कुठेहि प्रेमानें व निर्भयानें राहातां यावें. राष्ट्रांतील कोणत्याहि धर्माच्या व कोणत्याहि जातीच्या प्रत्येक व्यक्तीचे हृदय इतकें परिशुद्ध व निष्पाप असावें, इतकें बंधुत्वानें ओथंबलेले असावें. रामराज्यां तील प्रजेचें हें एक लक्षण आहे. मनुष्याचा हा आदर्श आहे. स्वराज्याचे हें सौभाग्य आहे. प्रजेची ही उन्नति आहे. हेच खरें सुखासमाधानाचे दिव्य जीवन आहे. प्रजेंत कुठे चुकूनहि प्राणिहिंसा होऊं नये. आईप्रमाणेच गाईवर सर्व धर्मांच्या व जातीच्या प्रत्येक आबालवृद्धार्चे प्रेम असावें. आपल्या शरीरावर प्रत्येकाचें जितकें प्रेम असते तितकेंच तें किडामुंगीपासून प्रत्येक प्राण्याचे आपल्या शरीरावर असते. आपल्या शरीराचे संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येकजण जसा दुसऱ्याच्या साहाय्याची अपेक्षा करतो, त्याप्रमाणेच प्रतिप्राणी दुसऱ्याच्या साहाय्याची अपेक्षा करीत असतो. जागतिक जीवनाचे हे एक सामान्य लक्षण प्रति माणसाच्या आंगवळणी पडून रामराज्यातल्या प्रतिव्यक्तीला ‘आत्मवत्सर्वभूतेषु’ झाले पाहिजे. हिंसा म्हणून ती कसली कुठे, मनानें व वाणीनेंहि होता कामाची नाही. प्रजा आणि अधिकारी यांच्यांत लबाडी म्हणून कसली नसावी. सर्वत्र हिताचा व हार्दिक प्रेमाचा व्यवहार असावा. लांच खाणेंच कोणाला ठाऊक नसावें. आपुलकीनें सर्व कार्मे व्हावींत. एखाद्याच्या नेतृत्वाखाली होऊं पाहणाऱ्या कोणत्या एका कामाकरितां म्हणून इतक्या अशा पैशाचा अंदाज झाला असला तर एक पैहि व्यर्थ खर्च न करतां श्रमोचित वेतनाचा मात्र स्वीकार करून बाकीचा पैसा राष्ट्राचा म्हणून तो परत करण्याचा प्रामाणिकपणा व राष्ट्रप्रेम असले पाहिजे. राष्ट्रांतील कोणाचाहि एक पै-पैसाहि अनाठायी खर्च होऊं नये की तो अन्यायानें मिळविलेला असू नये. प्राप्तीपेक्षां कोणाचाहि खर्च अधिक असू नये. एकहि कर्जबाजारी नसावा. राष्ट्रांत अनेक चित्रविचित्र पशुपक्ष्यांच्या संग्रहाने तिथे तिथे परम रमणीय उद्यानें शोभत असावीत; व ती आपल्या निरुपम शोभेनें जनमनाच्या शांतिसमाधानाचीं निकेतनेच होऊन राहावीत. जागजागी वस्तुसंग्रहालये असावीत. अलंकारप्राय अशा अनेक सुखसोयींनी राष्ट्र परम शोभायमान असावें. ठिकठिकाणी गोधनाची खिल्लारें राष्ट्रभर असावीत घरी दुभतें नसलेल्या राष्ट्रांतलि प्रत्येक कुटुंबाला इथून अपेक्षित दुधाची सोय होत असावी. गोदुग्ध हें भूतलावरचें अमृत आहे. यांत षड्स असतात. या सर्व धातूंची पुष्टी होते. सद्यः शुकरं पयः । यानें वीर्याचा सांठा होतो, देहाची कांति वाढते, मेंदूची शक्ति वाढते. यानें मनुष्य निरोगी राहून दीर्घायुषी होतो. ( चहा, कॉफी, गांजा, तंबाखू, अफू, धूम्रपान अशी देखील कसलींहि व्यसनें राष्ट्रांत नसावीत. मग मद्यमांससेवन तर दूरच राहिलें. ऐकूनहि तें कोणास ठाऊक नसावें. ) संबंध राष्ट्रांतूनच मादक द्रव्याच्या सेवनाची सक्त मनाई अमलांत आलेली असावी. सरकारने प्रजेच्या सर्वतोपरी हिताकरितांच सर्व कायदे करावेत व ते आपल्या हिताकरितां आहेत असें प्रजेनें मानावें. चोरून मारून कुठेहि कांहीं कायद्याविरुध्द व्यवहार होऊं नये व तो करण्याची प्रवृत्तीहि लोकांत असू नये. राष्ट्रांतील पुण्यपावन पवित्र तीर्थक्षेत्र, मठ व आश्रम म्हणजे परमात्म्याच्या दिव्य साक्षात्काराची दैवी केंद्रेच होत. राष्ट्रांतल्या मठाधिपतींवर व महंतांवर राष्ट्राच्या दिव्य जीवनाची अधिक भिस्त असते. ते राष्ट्राच्या जीवनानौकेचे कर्णधार आहेत. त्यांनीहि आपली जबाबदारी ओळखून असावें व तसे वागावें. तशी त्यांची तयारी असावी. ते मंगलमय आत्मीय आनंदाच्या दिव्य जीवनाचे आदर्श होत. राष्ट्राच्या भव्य वैभवमंदिराचे मठ व देऊळे व त्यांतील संन्याशी व महंत हे आधारस्तंभ होत. त्यांच्या सुस्थितीवरच राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असतें. विश्वधर्माचें यथार्थ ज्ञान करून देणारी विश्वविद्यालयेंच हृीं. मठाधिपति आणि महंत यांच्या संदर्शन-संभाषणानें उच्च कोटीच्या पवित्र जीवनाचे दिव्य पाठ इतर जनांना मिळावेत व त्यांचे शांतिसमाधान व्हावें. यांच्या दर्शनमात्रेकरूनच आसुरी भावनांच्या दुष्प्रवृत्तींना आळा पडून दैवी संपत्तीचें साम्राज्य सर्वत्र पसरलें पाहिजे. सर्व साधु, संन्यासी यांच्यावर याचे उत्तरदायित्व असते. आपल्या तपोबलानें त्यांनी समाज सुधारला पाहिजे. अशा शुध्दात्म्यांच्या संदेशाप्रमाणे वागून मुक्त होणें हेंच मानवदेहाचें सार्थक ही भावना लोकांच्या नसानसांतून प्रवाहीत असावी. राष्ट्रामध्ये कोणालाहि दैन्य, दारिद्र्य नसावें. आजारपणाच्या वेळी व अडीअडचणीच्या वेळी परस्परांनी परस्परांना साहाय्य करतांना त्यांच्या व्यवहारांत पाई म्हणून प्रयत्न केल्यासहि कुठे आपला, परका ही भावना व किंचित्मात्र उदासीनताहि कोणाला आढळू नये. एखादा माणूस रस्त्याने जात असतां मागातच असाहाय्य होऊन पडलेला जर आढळला तर त्याला खांद्यावर घेऊन रुग्णालयांत पोहोचवितांना कोणाला कसल्या तऱ्हेचेंहि ‘ मीपण’ आड येऊं नये. मी मोठा, मी सावकार, मी आचारशील ब्राह्मण, हा हनि, हा दरिद्री, हा अधिकारी, ( हा यवन, हा खिश्चन, हा अस्पृश्य ) अशा तऱ्हेची भावना त्यावेळी कोणाच्याहि अंतःकरणांत साहजिकच उत्पन्न न होईल इतकी भूतदया सर्वत्र असली पाहिजे. ते अस्पृश्यादि असतील तर प्रायश्चित्त घेऊन शुद्ध होण्याइतके आचारप्रेमहि ब्राह्मणादि उच्च वर्णात असलें पाहिजे. हेच भारतांत असणाऱ्या उन्नत मनुष्यजातीचें आदर्श जीवन होय. अन्याय, विषमता आणि फसवणूक ही कोठेंहि दिसून येऊं नयेत. प्रजा आणि अधिकारी यांच्यांत परस्पर प्रेमाचा व आपुलकीचा हितसंबंध असावा.

home-last-sec-img