Literature

आनंदघन परमात्मा

परमात्माच एक आनंदघन आहे. त्याच्या या दिव्य रूपानें तो या प्रपंचाच्या अंतर्बाह्य घनदाट भरलेला आहे. हेच या विशाल विश्र्वाचे अगदी मूळस्वरूप. तेंच यांत असणाऱ्या सर्व जीवांचेहि पण एकमेव परिशुद्ध रूप. अखिल विश्वाच्या या स्वानंदसाम्राज्याला संसारतापत्रयाची कसली झुळुक सुद्धां लागत नाहीं. इथें दुःखशोकाचा मागमूसहि पण नाहीं. कोणत्याहि वैषम्याची येथें कल्पना उत्पन्न होत नाहीं. श्रेष्ठकनिष्ठतेचा कसलाहि भाव येथें उमटत नाही. प्रपंचांत भासणारी कोणतीहि उणीव यांत दिसून येत नाही. यांत कसलीहि धांवपळ नाहीं. कोणतीच उपाधीहि नाही. सोलीव केळाप्रमाणें परमात्म्याचे निष्प्रपंच रूप आहे. या आत्मीय साम्राज्यांत चिन्मात्र असा एकच एक परमात्मा आपल्या आनंदघनतेनें चोहींकडे विराजमान आहे.परमात्मा हा स्वसंवेद्य आणि स्वयंप्रकाश असल्यामुळे अद्वितीय आहे. न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतो ऽ यमग्निः ।

तमेव भान्तमनुभाति सर्वे तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥ (कठ० २-५-१५) या मंत्राचाच अनुवाद भगवद्गीतेच्या या श्लोकांतून दिसून येतोः न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम || ( भ.गी. १५-६)

याचेच विवरण श्रीसमर्थांच्या या खालील ओबींतून दिसून येतें : तेथे चंद्र सूर्य ना पावक | नव्हे काळोखें ना प्रकाशक । उपाधि वेगळे एक । निरुपाधि ब्रह्म ॥ (दासबोध १७-२-५ ) तेथें सुख असे वाढ । नाहीं मनास पवाड | मनेंवीण कैवाड । साधनाचा ॥ (दा. ७-२-१६) देह बुद्धीचे थोरपण | परब्रह्मी न चले जाण । तेथें होतसे निर्वाण । अहं भावासी || (२३) उंच नीच नाहीं परी । राया रंका एकचि सरी । जाला पुरुष अथवा नारी । एकचि पद ॥ (२४) स्वर्ग मृत्य आणि पाताळ । तिहिं लोकींचे ज्ञाते सकळ । सकळांसि मिळोन एकचि स्थळ | विश्रांतीचें ॥ (२८) गुरुशिष्या एकाच पद । तेथें नाहीं भेदाभेद । परि या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ।। (-२९) देहबुद्धिच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ति । एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतिवचन ॥ ( दा. ७-२-३०) परमात्म्याच्या अल्पाल्पांश प्रकाशानें हे सूर्य, चंद्र, तारका, विद्युत् आणि प्रतिप्राणिपदार्थ तारतम्यानें प्रकाशमान होत आहेत. प्रति लहानमोठ्या किरणांतून जसा सूर्याचा एकच एक प्रकाश असावा, त्याच प्रमाणे या अखिल विश्र्वातल्या सकल दृश्य पदार्थातून परमात्म्याचाच प्रकाश ओतप्रोत भरला आहे. मृगजळाच्या सगळ्या त्या तरंगांतून सूर्याचा प्रकाशच ओतप्रोत जसा भरून असतो, त्याचप्रमाणे या विश्रांतल्या निखिल दृश्य पदार्थांतून परमात्म्याचाच एक प्रकाश ओतप्रोत भरून आहे. हा परमात्माच आम्हां सर्वांचें सारसुखरूप आणि सारसर्वस्त्र होय.

home-last-sec-img