Literature

आषाढ वद्य द्वादशी

ओढ्याच्या उगमापासून अगदी लहान प्रमाणांत उत्पन्न होऊन पुढे पुढे सरकणाऱ्या, हळू हळू मोठा होत
तरंगत जाणाऱ्या व शेवटी फुटून पाण्यांतच एकरूप होणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे या देहरूपी ओहोळाच्या
उगमापासून म्हणजेच ह्रदयाच्या खालच्या बाजूस असलेल्या नाभिभागापासून लहान प्रमाणांत उत्पन्न होऊन
हळू हळू मोठे होऊन देहांत असणारे ' चित् ' म्हणजेच ज्ञान काही काळ नाम-रूप-रूपी प्रवाहात वहात जाऊन
शेवटी फुटून निश्चल अशा ज्ञानांत विलीन होणारेच ते ' चित्त ' होय. पाणी व बुडबुडा यांच्यात वेगळेपणा
नसतो त्याचप्रमाणे देहामधील चिदानंदरूपी आत्मा आणि चित्त हे कांही वेगळे नाहीत. पाण्याहून वेगळा
दिसणारा बुडबुडा पाण्याहून वेगळा नसतो तो पाणीरूपच असतो त्याप्रमाणे मूळपासून विचार केल्यास चित्
आणि चित्त ही वेगळी रूपे दिसत असली तरी त्यांचे रूप म्हणजेच निश्चल ज्ञान होय.
माया अथवा संसार यामुळे ब्रह्मांडात उद्भवणारी निरनिराळी आकाररूपे ही एकाच निश्चल अशा
आनंदरूप आत्म्यांचे केवळ दृक् स्वरूप होय. चित्तवृत्ती म्हणजेच कोठल्यातरी नामरूपाचा आभास वेगळा
आहे असे समजून त्याचा विचार केल्यास तेथे फक्त चित्तच आहे असे आपणास आढळून येईल आणि ते
म्हणजेच निश्चल, निर्गुण, निराकार आनंद म्हणजे आत्मा होय हे लक्षात येईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img