Literature

आषाढ वद्य नवमी

रज्जूंत जशी सर्पभावना व शिंपल्यात ज्याप्रमाणे चांदीची भावना होते त्याप्रमाणे मुर्ख मनुष्य देह म्हणजेच
आत्मा, असे समजतो. रज्जू हा सर्प नव्हे हे समजवून देतो तोच आप्त व सद्गुरू समजावा व ते समजण्यासाठी
आवश्यक असे जे ज्ञान तीच ' परमात्मकृपा ' होय. सत्याचे ज्ञान होण्यासाठी ह्याची आवश्यकता आहे.
'आपण आहोंत म्हणजेच जग आहे' अशी एक म्हण आपणा सर्वांना माहित आहे. आपल्या
अस्तित्वामुळेच तिन्ही लोकांचे अस्तित्व जाणवते. आपण नसलो म्हणजेच आपली जाणीव नसल्यास तिन्ही
लोकांचीही जाणीव रहात नाही, जागृती व स्वप्नांत स्पष्टास्पष्ट असलेली मीपणाची जाणीव गाढ झोपेत
असूच शकत नाही त्याप्रमाणे जागृती, स्वप्न जेथे नाही तेथे तिन्ही लोकही नाहीत हा अनुभव सर्वांनाच आहे.

परमात्म्याचे आत्मरूप केवळ आनंदघन आहे म्हणून तुला जर आत्मसुख हवे असेल तर इतर कशाचीही
जाणीव किंवा वृत्ती उद्भवूं न देता निर्विकल्पपणे तु ज्या आनंदस्वरूपात आहेस त्यातच रहा. *'तत्वमसि'* या
महावाक्याच्या उपदेशाचे आचरण कर. अन्यथा बहिर्मुख होऊन काहीतरी कल्पना करून घेऊन कोणत्यातरी
स्त्री-पुरूषाची आकृती किंवा पदार्थ यासंबंधी सुखाची मृगजलवत् कल्पना करून घेऊन आपले स्वतः योग्य ते
ज्ञान म्हणजेच केवळ आनंदस्वरूप अशा निर्विकल्प समाधीपासून वंचित होऊ नकोस.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img