Literature

आषाढ वद्य पंचमी

अग्नि, संकट, दुष्ट, रोग, शत्रु व अधर्म यांना वाढू देऊ नये. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुळाचाच नायनाट करणे
सज्जनांना क्षेमकर आहे. अर्थात नायनाट करण्याचे काम क्रोधच करू शकतो. क्रोधामुळेंच ऋषीमुनी आपले
मन व इंद्रिये ताब्यात ठेवू शकले. क्रोधाच्या द्वारेच दुष्ट मार्गाचा त्याग करून सन्मार्गाचे अवलंबन होऊ शकते.
क्रोधानेच परमार्थसाधन होते व मोक्षप्राप्तीही होऊ शकते. क्रोधामुळे उच्छृंखल इंद्रिये मन यांना जिंकून
अज्ञान-निवृत्ति करता येते, क्रोध हीच दमनशक्ति होय. क्रोध म्हणजेच प्रतिक्रिया व अचलशांती म्हणजेच
क्रोधावर केलेला महान क्रोध होय.

ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण, धर्मपालन, सज्जनपोषण, दुष्टनिर्दलन याद्वारे सत् साधन व सदाचाराचा
प्रभावी जय विश्वविज्ञात होतो तोच खरा क्रोध होय. याउलट आपली क्रोध-पुर्ती करण्यासाठी सज्जनांना
कष्टदायक व बाधक ठरणारा क्रोध सर्वथैव त्याज्यच होय. तो स्व-परांना अहितकारकच होय. क्रोधामध्येही स्व-
परहितदृष्टी ठेवली पाहिजे. अन्यथा असा क्रोध म्हणजे परवशता व आत्मदौर्बल्यच. क्रोधवश होऊन इतरांना
विनाकारण त्रास देऊन त्यांचे अनहित करणे हा अविवेकच होय. सत्कार्यसाधन व जोपावेतो शक्य होईल
तोपावेतो प्रतिस्पर्ध्याच्या हिताचे पालन योग्य व न्याय मार्गांने करणे हाच विवेकजनित क्रोधाचा अर्थ होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img