Literature

आषाढ शुद्ध नवमी

विष्णुच्या नाभिकमलापासून ब्रह्मा व ब्रह्माच्या ललाटापासून रूद्र उत्पन्न झाला. ‘ हिरण्यगर्भः समवर्तताग्रे ‘ या क्रमाने ब्रह्मविद्येचा सांप्रदाय सुरू झाला. अगदी सुरवातीस हिरण्यगर्भ उत्पन्न होऊन त्यापासून सृष्टी उत्पन्न झाली, त्याचवेळी हिरण्यगर्भामध्ये सर्वप्रथम मीपणाची जाणीव झाली. ‘ बहु ‘ व्हावयास हवे म्हणूनच सुरवातीस मीपणाची स्फुर्ती झाली. ही स्फुर्ती व स्वसंवेदना यांचे ज्ञान आपणांस कोणत्या अवस्थेत दृग्गोचार होते ? जागृत किंवा स्वप्नावस्थेंतच की नाही ? ‘ मी ‘ असे सर्वांकडून सांगितले जाते व त्यावेळी स्वसंवेदना असतेच. स्वप्नांत सुध्दा मीपणाची स्फुर्ती असते. जागृत किंवा स्वप्नावस्था याशिवाय गाढनिद्रेंत असतांना मीपणाची जाणीवच उरत नाही. सद्गुरूकृपेने समाधीसुख लाभल्यास त्यावेळीही जाणीव शिल्लक रहात नाही. मीपणाची स्फुर्ती स्वप्नामध्ये भावनारूपाने व जागृत अवस्थेत स्पष्ट दिसून येते. सुषुप्तावस्थेत मात्र ती अव्यक्त असते आणि समाधी अवस्थेत तर विरघळूनच जाते. हिरण्यगर्भामध्ये सर्वप्रथम मीपणाचे स्फुरण झाले, त्यानंतर ‘ बहु ‘ होण्यासाठी अनेक रूपे त्यांनी धारण केली. त्यांचे बहुतत्वरूप म्हणजेच विराट पुरूषाचे रूप होय असे म्हटले जाते. मीपणाचे स्फुरण झालेले हिरण्यगर्भाचे स्वरूप व्यक्त व अव्यक्त अशा दोन प्रकारचे आहे, म्हणजेच तो व्यक्तही आहे व अव्यक्त तर आहेच आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img