Literature

आषाढ शुद्ध पौर्णिमा

आज गुरूपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा. ह्या दिवशी पाऊस असतोच. गुरू पौर्णिमा व पावसाळा
यांत काहीतरी समजून घेण्यासारखे आहे. पाऊस म्हणजे जलवर्षाव व जल म्हणजेच जीवन. जीवनाधार
तत्वांचा वर्षाव म्हणजे पावसाळा व त्याचवेळी गुरूपौर्णिमा येते. या दिवशी गुरूही जीवनाधार असे तत्व
पावसाप्रमाणे वर्षतो, आत्मतत्वाचा म्हणजे आत्मज्ञानाचा वर्षाव करतो. पावसामध्ये सर्वसमत्व आहे
त्याचप्रमाणे गुरूही आप-पर, सुष्ट-दुष्ट असे न पाहतां सर्वांस ज्ञानोपदेश करतो.

गुरू आराधनेने आत्मलाभ होतो. मोक्षापेक्षेने आराधना करावी हे उत्तमच, पण गृहस्थांना केवळ मोक्षाचाच
अवलंब करून भागत नाही. त्यांना ऐहिक जीवन साधने पण आवश्यक आहेत व ती लागतातही. गुरू
आराधनेने ऐहिक जीवन सुखसमृध्द होते व परब्रह्माची प्राप्ती होऊन मोक्षाचाही लाभ होतो असे गुरूगीतेंत
म्हटले आहे. गुरूची आराधना गुरूपौर्णिमेच्या दिवशी विशेष. तेव्हा त्या सद्गुरूतत्त्वाच्या आराधनेसाठी तुम्ही
येथे जमलेले आहात, आला आहात खूप दुरून.

पाऊस पडत आहे. भिजता आहांत. तिकडे त्या जीवनाचा वर्षाव झाला व इकडून आत्मतत्त्वाच्या जीवनाचा
वर्षावही पण झाला. गुरूंचे सांगणे काय आहे ? *' तत्त्वमसि '* तें परब्रह्मतत्व तू आहेस. ते परम ब्रह्मतत्त्व स्वतः
अंगी बाणून घेऊन दुसऱ्यांना तें तत्त्व अंगी बाणवतात तेच सद्गुरू त्या ब्रह्मज्ञानाने तुमचे सर्व अरिष्ट नष्ट होवो.
त्या सद्गुरूची तुम्हावर पूर्ण कृपा होवो तुमच्या सर्व अडीअडचणी नष्ट होवोत, ज्ञान प्राप्त होवो आणि आनंदघन
स्वरूपाशी एकरूप होऊन तुम्ही सर्वांचेही जीवन दिव्य होवो ! आनंदरूप व्हा ! जीवनमुक्त व्हा !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img