Literature

आषाढ शुद्ध षष्ठी

सर्व दृश्यवस्तूंत गुरू हा श्रेष्ठ आहे असे समजून त्यांची सेवा केली पाहिजे. गुरूपेक्षा श्रेष्ठ अशी एकतरी वस्तू आहे काय? जगांतील कोणतीही वस्तू गुरूची बरोबरी करू शकणार नाही. म्हणूनच त्रिलोकांत शोध करून शेवटी हताश होऊन ज्ञानदात्या सद्गुरूसाठी योग्य असा दृष्टांत मला सापडला नाही. असे श्रीमत् शंकराचार्य म्हणतात.

गुरूआराधनेचा क्रम सोपा आहे असे आपण समजतो. ‘गुरू आज्ञापालन’ हे ‘शिष्याचे मुख्य लक्षण होय.’ असे श्रीसमर्थांनी म्हटले आहे. भक्ताहून गुरू नेहमीच निराळा असतो. पण तत्वांत भेद असू शकत नाही. हे योग्य प्रकारे जाणल्यास भक्तही तत्वस्वरूप होऊ शकतो. तत्वस्वरूपांत ‘अद्वितीयता’ हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. जे सदाचे एकमेव असून त्यांत निराळेपण असू शकत नाही तेंच ‘अद्वितीय स्वरूप’ होय. त्या स्वरूपाकडे जाणाराही अद्वितीयच होय.

गुरू स्वतः अद्वितीय आहेत. त्यांना स्वतःच्या रूपाशिवाय इतर कोणतेही रूप असत नाही. त्यांच्या स्वरूपाखेरीज जी इतर सृष्टी आहे तिला माया, दुःख इत्यादी असते. असे असल्याने त्यांचे भजन करणाऱ्या भक्तास ते काय देऊ शकणार? यासाठी वेळ व्यर्थ घालवू नका. आयुष्य अत्यंत अनिश्चित आहे म्हणून अनेक जन्मांत केल्या जाणाऱ्या साधनांनी खरे सुख मिळविले पाहिजे व त्यासाठी शक्यतो लवकर सद्गुरूस शरण जाऊन त्यांच्या मुखाने ‘आत्मसुखतत्व’ जाणून घेऊन कृतकृत्य झाले पाहिजे.

*श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img