Literature

ऋग्वेदांतर्गत सृष्टिकर्म

‘ऋग्यजुस्सामाथर्व’ या चारी वेदांमध्ये ऋग्वेदाचीच प्रथम गणना होते. आधुनिक मताप्रमाणेहि अतिप्राचीन असणाऱ्या ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तांत सृष्टीची रचना व सृष्टीपूर्वील स्वरूपवर्णन आले आहे. सृष्टिरचनेचे वर्णन आणि सृष्टीच्या पूर्वील स्वरूपाचे वर्णन, हे एका परमात्म्याखेरीज इतक्या पुरातन काळीं, किंबहुना जगदाद्यकाली, दुसरा कोण सांगण्यास समर्थ आहे ? या उदाहरणानेंहि वेद परमात्मप्रणीतच होत असे कोणालाही वाटेल. आपण त्या नासदीय सूक्ताचा भावार्थ समजून घेऊ या.

नासदासीन्नो सदासीत्तदानीम् नासीद्रजो नोव्योमापरोयत ।। 

किमावरीवः कुद्दकस्य शर्मन्नम्भः किमासीद् गहनं गभीरम् ॥१॥(ऋ. १०-१२९-१-७)

— संबंध सृष्टीचा शेवटी प्रलय होऊन सृष्टींपूर्वीची स्थिति उरते. त्या ठिकाणी सृष्टिहि नसते व शून्यहि नसतें. सत्यादि गुणत्रय आणि व्योमादि भूतपंचकहि त्यावेळी नसते. त्या अद्वितीय आनंदरूपांत आवरणात्मकहि कांहीं नसतें व विक्षेपात्मकहि कांही नसतें. तें आवरण तरी कुठे, कसे व कोणाच्या सुखाकरितां तिथे असणार? ब्रह्मदेवाच्या दैनंदिन प्रलयांत, पृथ्वी आणि पृथ्वी तलें सर्व, एक जलमय तरी होऊन असते, पण तसेंहि कांहीं नसते.

या आखिल कार्यजाताच्या पूर्वी कारणरूप परब्रह्म एकच एक होतें. त्या परमात्मस्वरूपाहून दुसरें असें कांहींहि नव्हते. तेंच तें एक निव्वळ आपल्या अद्वितीयरूपानें, केवळ एक आनंदमात्र असल्यामुळे, तिथे व्यक्त अथवा अव्यक्त रूपानेंहि, सृष्टि म्हणून कांहीं नव्हतेच. या जगाचा मागमूसहि तेथें नव्हता. सत्त्वरजतम गुणांपैकी एखादाहि गुण त्या ठिकाणी नव्हता. तिथे कसलाहि संकल्प, कोणतीहि कल्पना नव्हती. कसलीहि कार्यस्फूर्ति नव्हती. आकाशादि पंचभूतेंहि त्या ठिकाणी नव्हती. त्रिगुण, पंचभूतें, नामरूप उपाधि, ज्ञान, इच्छा, क्रिया अशा अखिल कार्यकारणापूर्वी कार्यकारणशून्य आनंदच एक होता. सर्वप्रथम असणाऱ्या या आनंदमात्रतेंत दुसरें असे काय असणार ? अगदी कशाचीहि उत्पत्ति झाली नसतां निव्वळ आनंदच एक होता. ज्ञानमात्र आनंदच एक केवळ आपल्या अस्तित्वानें अद्वय असतां, दुसरें कांहींच नसता, त्या ठिकाण अन्य कोण आणि कशाच्या योगानें व कशाकरितां, कोणाला काय म्हणून आच्छादणार? त्या अद्वितीय आनंदमात्रतेंत दुसरें कांहीं नसता, आच्छादक आवरणहि नव्हतें. स्वसंवेद्य आनंदाच्या एका अस्तित्वाबांचून दुसरे कांहींच नसतांना हे आच्छादक आवरण असू शकेल तरी कसें निःसंकल्प, निर्विकल्प, निःस्फूर्तिक अशा त्या केवळ एक आनंदमात्रर्तेत, अन्यच कांहीं नसतांना, कोणाच्या हिताकरितां कोणाला सुख व्हावें म्हणून, कशाची उत्पत्ति झाली असणार! अन्य तरी काय असणार ? नित्य निर्विकार अशा त्या सच्चिदानंदधन स्वरूपांत, जग आणि जगत्प्रलयच नसतांना, जगत्प्रलयानंतर उरणारे तें अगाध एकार्णव जल तरी त्या ठिकाणी कसे असू शकेल ? आनंद .मात्रतेत एका आनंदाशिवाय दुसरे काय असणार

न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अन् आसीत् प्रकेतः || 

आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किंचनास ॥ २ ॥ (ऋ. ना. सू. १०-१२९-१-७ )

– मृत्यु आणि अमृतत्व अशी दोन्हीहि त्या ठिकाणी नसतात.रात्र आणि दिवस दोन्ही त्या ठिकाणीं नसतात. सूर्यचंद्राचाहि त्या ठिकाणी अभाव असतो. मनप्राणाशिवायच तेथें तें आपल्या आपण असतें. एका त्या ब्रह्मतत्त्वाखेरीज त्या वेळी कांहीं नसते. त्या वेळी तेथें मृत्युहि नव्हता. मृत्युसापेक्ष अमृतत्वहि नव्हते. बंधहि नव्हता आणि मोक्षहि नव्हता. रात्रहि नव्हती आणि दिवसहि नव्हता. कसल्याहि काळाची गणना नव्हती. कालाच्या गणनेस कारणीभूत होणारे सूर्यचंद्रहि त्यावेळीं नव्हते. आनंदमात्र ब्रह्मरूपच एक त्यावेळीं होतें. या जुगांतले प्राणी प्राणामुळेच श्वासोच्छ्वास असेपर्यंतच केवळ जगतात. तो प्राणस्पंद की एकदां थांबला, की त्या प्राण्यांत चैतन्य दिसून येत नाहीं. चैतन्य प्राणस्पंदानें प्रगट होतें या न्यायानें तिथेहि हा प्राणस्पंद असावयाला पाहिजे म्हणून कोणी आक्षेपील तर तोहि तिथे म्हणजे जगदाद्य परमात्मस्वरूपांत नव्हता. आनंद मात्र परमात्मरूप स्वतःच चैतन्यरूप असल्यामुळे त्याला अन्य प्राणादिकांची आवश्यकता नाही. तो आनंदरूपी परमात्मा प्राणाशिवाय व अशा कसल्याह प्राणस्पंदाशिवाय, वायुप्रचाराशिवाय, श्वासोच्छ्वासाशिवाय आपल्या एक चैतन्य मात्र स्वरूपानेंच, आपल्या निव्वळ आनंदमात्रतेनेंच केवळ शिल्लक होता. त्या आनंदस्वरूपाव्यतिरिक्त तिथे त्या वेळी दुसरें कांहीं एक अजिबात शिल्लक नव्हतें, म्हणून श्रुतीचें सांगणे आहे. असें हें सृष्टीपूर्वीचें निर्मळ आणि निर्भेळ स्वरूप एका आनंदमात्रतेशिवाय दुसऱ्या कोणत्याहि रूपाने, कोणाकडूनहि अनुमानित होऊं शकत नाही, हें खरें. पण हें झालें त्या शुद्ध स्वरूपाचें वर्णन. पण या सृष्टीची व्यवस्था कशी लावावयाची? या सृष्टीच्या कार्यकारणाचा कांहीं तरी संबंध लागला पाहिजे ना ? म्हणून विचारल्यास त्यानें उत्तर म्हणून यक्षानु रूपो बलिः ” या न्यायानें हा पुढचा उपक्रम आहे. प्रथम जगदादांचें केवळ आनंदरूप कळवून जगन्निर्बाहरूप कार्यकारणाचे निरूपण आतां पुढच्या श्रुतिमंत्रानें करणें आहे. त्याच्या भावार्थाकडेच एकदम लक्ष घालण्यापूर्वी समजण्यास सोपें जावें म्हणून त्याबद्दल थोडा पूर्वविचार इये करूं या तिन्ही कालींहि एकरूप असणाऱ्या सत्यरूपांत वर्तमान भूत-भविष्यादि कालगणना असं शकत नाहीं. ते नित्यनिर्विकार स्वरूप असल्याप्रमाणेच सदोदित असल्या मुळे, त्यांत अन्य कांहीं होत नाहीं व तें कार्याभावीं कसलेच कारणहि पण होऊं शकत नाहीं.

कारणं यस्य वैकार्ये कार्याभावे न कारणम् । 

कारणत्वं ततो नश्येत् कार्याभावे विचारताः ।

– कार्यामुळेच कारण कार्य नसतांना कारणहि नाहीं. कार्याचा अभाव झाला कीं कारणत्वाचाहि आपोआप अभाव होतो. कल्पित वंशावळींचा मूल पुरुष कल्पितच असणार म्हणून कार्यकारणशून्य अशा सर्वाध स्वरूपाच्या ठिकाणी झालेल्या सृष्टीचा केवळ आरोप ठरला; व हा आरोप केवल मूल स्वरूपाच्या अज्ञानानेंच होतो, असे झाल्यास, केलेल्या या आरोपास मूल स्वरूपाचे अज्ञानच एक कारण म्हणून जसे मानावयाचें व त्या आरोपित कार्याच्या पूर्वी त्या मूलस्वरूपाचे अज्ञान एक होते म्हणून जशी आरोपसापेक्ष तत्पूर्वील मूलस्वरूपाच्या अज्ञानाची कल्पित उभारणी करावयाची व त्यापासून आरोपात्मक असे हें कार्य झालें म्हणून कार्याची संगती लावावयाची त्याप्रमाणें “ अज्ञानमेवास्य हि मूलकारणम् । ” या आरोपित कार्यकारण-परंपरेला मूलस्वरूपाचे तमोरूप अज्ञानच कारण आहे. व तें या आरोपापूर्वी होतें म्हणून श्रुति सांगते.

तम आसीत्तमसा गूळहमग्रेऽप्रकेतं सलिलं सर्व मा इदम् । 

तुच्छयेनाभ्वापिहितं यदासीत्तपसस्तन्महिना जायतैकम् । (ऋ. ना. सू. )

प्रत्यगात्मा परं ज्योतिर्माया सा तु महत्तमः । ( पाशुपत ब्रह्म. उ.)

–सृष्टीच्या पूर्वी अति विलक्षण व अति गूढ असें तम म्हणजे आवरण होतें. सृष्टीचें अव्यक्त रूप होतें. त्यांतच ही सृष्टि विलीन होती. त्या तमोरूप तुच्छ मायेचें जें अवगुंठित चैतन्य होतें तेंच एक तसा संकल्प करून पुढे विविध विश्वरूपाने आकारलें. हें अज्ञानरूपी अथवा आवरणरूपी तम जगाच्या प्रारंभी होते. ते कुठे व कसे होते म्हणून कोणी विचारल्यास तें अज्ञान अथवा आवरण आपल्या तमोरूपानंच गूढ होते, गूढता हा त्याचा स्वभाव आहे म्हणून श्रुतीचे सांगणे आहे. हे सर्व जग पूर्वी त्याच्यांतच गुप्तरूपानें होतें. या आवरणालाच । प्रकृति अथवा माया म्हणतात. सूर्यापासून निर्माण झालेले ढग जसे सुर्याला आच्छादिल्यासारखे वाटतात, पण जसे आच्छादित नाहींत कीं त्याला स्पर्श करीत नाहीत, सूर्यमंडळापर्यंत जाऊन देखील पोहोंचू शकत नाहींत, सूर्यमंडळ मेघमंडळापेक्षां कितीतरी दूर असतें; त्याप्रमाणेंच परमात्मस्वरूपापासून झालेली ही माया परमात्मस्वरूपास आच्छादिल्याप्रमाणे वाटते पण खरें आच्छादित नाहीं, कीं त्याला स्पर्श करीत नाही, तेथपर्यंत जाऊन देखील पोहोंचूं शकत नाहीं. ब्रह्मतत्त्व या मायेच्या कक्षेच्या कितीतरी दूर असते. या ब्रह्मतत्त्वांत माया नसून देखील असल्यासारखी भासते. त्यास न आच्छादितां आच्छादिल्या सारखी वाटते. तेथें पोहचू शकत नसतांहि पोहोचल्यासारखी दिसून येते. त्याला हिचा कांहीं संपर्क नसतांनासुद्धां संपर्क झाल्यासारखा दाखविते. यामुळे मूलखरूपाचें अज्ञानच या मायेचें रूप होतें. या मा सा माया । या हिच्या उत्पत्तीवरूनच ही खोटी ठरते. मुळांत नसून भासत असल्यामुळे व भासली तरी हिचा मुळांत संपर्क नसल्यामुळे ही क्षुल्लक वाटते. तिच्या या क्षुल्लकतेमुळे हिला या मंत्रांत ‘ तुच्छ’ असें नांव दिलें आहे. काळ्या ढगांतून दिसून येणारा सूर्यप्रकाश काळ्या ढगांनी आवृत होऊन अंधुक दिसून येतो व ढगाला तो प्रकाशच कारणीभूत असल्यामुळे तो प्रकाशच पाऊस पाडतो असे वाटते; तसें मानावेंहि पण लागते. त्याप्रमाणेच मायेच्या ठिकाणी दिसून येणारा परमात्म प्रकाश, मानें आवृत होऊन सगुणसा दिसून येतो. याला शबल ब्रह्म म्हणतात. मायेला हें ब्रह्मतत्त्वच एक विवर्तकारण असल्यामुळे तें ब्रह्मतत्त्वच मायेला व मायेच्या विश्वरूपी कार्याला उत्पन्न करतें असे वाटतें. दुसऱ्या कारणाभावी तसें मानावेंहि पण लागतें. प्रकृतिर्जडा । प्रकृति ही खतः अचेतन असल्या मुळे तिला कारणत्व येत नाहीं. सूर्याचा प्रकाश अथवा उष्णता नसतांना ढग होत नाहीत व ढग उत्पन्न नाही झाले तर पाऊस पडत नाही. तसेंच ब्रह्म तत्त्वाची सत्ता नसतांना माया उत्पन्न होत नाही व माया उत्पन्न न झाली तर जग उत्पन्न होत नाही. स्वतंत्रपणें ढग जसा पाऊस पाडूं शकत नाहीं

त्याप्रमाणेच माया ही स्वतंत्रपणे जग निर्माण करू शकत नाही. या दृष्टीने ब्रह्मतत्त्वाकडे मायेचें व जगाचे कारणत्व लागू होतें. मायोपाधीने शबल म्हणून घेणारे ब्रह्मतत्त्वच आपल्या संकल्पद्वारा जगास कारण होते असे मानावेंहि पण लागते.

मायोपाधिर्जगद्योनिः सर्वज्ञत्वादिलक्षणः ।

—या मायोपाधीनें तें अखंड व्यापक स्वरूप किंचित झांकले गेल्यासारखे होऊन, जे सर्वज्ञत्वादि लक्षणयुक्त जगत्कारण झालें तेंच “बहुस्यां प्रजायेय “” मी बहु व्हायें “, अनेक प्रजेचें रूप धारण करावें म्हणून संकल्प करून त्या आलोचनेनें तें एकटेच अनेकरूप झालें. कोणतेहि कार्य शक्तिमुळेच होते. कोणत्याहि कार्याला हात घालण्यापूर्वी ‘ तुझ्यांत तितकी शक्ति असल्यास त्या कार्याला हात लाव’ असे म्हणण्याचीहि पद्धत आहे. • तितकी शक्ति असल्याशिवाय त्या कार्याला तूं हात कां घातलास?’ असे विचारण्यांतहि येते. यावरून कोणतेहि कार्य त्याला लागणाऱ्या शक्तिशिवाय होत नाही हे कळून येते. कोणतेंहि कार्य शक्तीने पार पडतें व संकल्पानें आरंभिलें जाते. कारणगुणाः कार्येषु संक्रामन्ति । म्हटल्याप्रमाणे हा आमचा अनुभव मुळांतली कांही ओळख पटवून देतो. सोऽकामयत । स तपो तप्यत । स ईक्षत । इत्यादि श्रुतिवाक्यांच्या आधारें सृष्टिउत्पत्तीपूर्वी परमात्म्याला सृष्टीचा संकल्प होतो, हे स्पष्ट होते.

home-last-sec-img