Literature

कार्तिक वद्य अमावस्या

मानव जन्म हा उत्तम जन्म होय. नुसत्या इच्छेने अथवा मोबदल्यामध्ये मिळणारा हा जन्म नाही. कर्मप्रवाहात तरंगत जन्ममृत्युच्या चक्रांतून जात असतां कोणत्यातरी पुण्यफलांमुळे तो प्राप्त होत असतो. स्वर्ग-नरक, बंध-मोक्ष यांना जाण्याचे मार्ग मानवजन्मामधूनच आहेत. या जन्मामध्ये काय करावयाचे हे ठरवून मृत्युनंतर सुध्दा अनंतकाल अस्तित्वांत असलेल्यास काय अभिप्रेत आहे याचा विचार करणे हे एक उच्च कर्तव्य होय. हा निर्णय घेण्यासाठी अनुरूप अशी साधनेही मानवजन्मातच मिळू शकतात. पण यांत थोडीही चूक झाली तर पुढे कोणता जन्म प्राप्त होईल हे सांगणे कठीण आहे. पशुचा जन्म मिळाल्यास हा विचार व त्याचे साधन ही दोन्हीही मिळणार नाहीत. पुढे प्राप्त होणाऱ्या नरकजन्मापर्यंत वाट पाहू म्हटले तर तेही आपल्या हाती नाही. कारण विषयवासना व तिच्यामुळे केली जाणारी कर्मे यांच्यापासून कोणकोणते नवीन जन्म मिळतील हे सांगणे कठीणच. कर्मवश झालेल्या मानवाला त्या त्या भोगामध्ये अडकावेच लागते. असे असल्याने विषयवासनेने बध्द होऊन याजन्मी मिळालेली सुवर्णसंधी घालविणे ही आत्मवंचनांच होय. नरजन्म हा भगवद्स्वरूपाच्या प्राप्तीसाठी मुख्य साधन आहे. त्या साधनानेच भगवद्स्वरूप प्राप्त होणे शक्य आहे. 

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img