Literature

कार्तिक वद्य एकादशी

प्राणिमात्रांत तारतम्य असतेच. मनुष्य व मनुष्येतर प्राणी यामध्ये स्वाभाविकताच मोठा भेद आहे. मनुष्येतर प्राण्यांत सुखप्राप्तीची साधने कमी प्रमाणात आढळतात. त्यांच्या परिस्थितीने ती साधने आपल्या ताब्यात ठेवलेली दिसतात. परिस्थितीवर मात करण्याची बुद्धी व शक्ती त्यांना असत नाही म्हणून केवळ इंद्रियगम्य विषयासाठी धडपड करून मिळालेले अनुभव घेत घेत ते आपली जीवनयात्रा पुरी करतात. इंद्रियावर मात करण्याची कला, विज्ञान, विवेक यामुळे मिळणारा आनंद त्यांना मिळू शकत नाही. खरे आत्मसुख मिळावे अशी इच्छा त्यांनाही असू शकेल. पण प्राप्ती करण्याची योग्यता असू शकत नाही. इंद्रियाविरहित असलेले सुख, अतीन्द्रिय सुख साध्य करणे त्यांना अशक्य आहे. इंद्रियसुख हे काही संपूर्ण किंवा चिरसुख नव्हे.

मनुष्याची जगण्याची तऱ्हा काही औरच आहे. आपल्या जीवनाचा स्तर ज्याच्या योगाने रोजच्या रोज उंचावला जाईल याचा तो प्रयत्न करीत असतो व हेच मानवी जीवनाचे वैशिष्ठ्य होय. हीन स्थितीतून उन्नत स्थितीकडे जाणे आणि उन्नतावस्थेतच वाढत वाढत जाणे हिच सर्व प्राणीमात्रात श्रेष्ठ असलेल्या मानवाची दृष्टी असते. इतर प्राणीमात्रापेक्षा मानवात वैशिष्ठ्य असल्यामुळे उन्नतस्थिती करून घेण्यासाठी, स्वतःच्या परिपूर्णतेसाठी व इच्छिलेले अखंड सुख मिळविण्यासाठी तो जन्मापासून सारखे प्रयत्न करीत असतो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img