Literature

कार्तिक वद्य तृतीया

या जगातील वस्तूपासून सुखप्राप्ती होत नाही. पण ते पूर्ण असते तेच सुखस्वरूप व तेच अमृत होय. त्यालाच आपण परमात्मा म्हणतो. त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे योग्य होय. त्यायोगे मानवजन्माचे सार्थक होईल. जगातील सुखापासून तुम्हास कधीही तृप्ती मिळणार नाही व त्यामुळे तुम्ही कृतकृत्यही होणार नाही. अविनाशी असा आनंद मिळाल्याशिवाय देहत्याग केल्यास तुम्ही काहीही साधले नाही असेच होईल.

नरजन्माचे संपूर्णपणे सार्थक करावयाचे असल्यास आपण कशासाठी जन्मलो हे समजून घेऊन ते साध्य करून घेणे हे आपले श्रेष्ठ असे कर्तव्य होय व ते या जन्मीच साध्य करून घेणे योग्य होय. त्यासाठी परमात्म्याने आपल्या जीवनात काही प्रेरणा उत्पन्न केल्या आहेत. त्या प्रेरणा शुद्धरितीने वापरणे हाच सनातन धर्म होय. त्या प्रेरणांचा कसा उपयोग करावा याचे विवरण वेदामध्ये दिले आहे. यावरूनच सनातन धर्मास ‘ वैदिक धर्म ‘ असे म्हणतात. त्यात दिलेल्या विधिनिषेधांचा उद्देश, योग्य मार्गदर्शनाने विषयवासना घालवून मृत्युपूर्वी आत्मसुख, शाश्वत सुख मिळवुन देणे हा आहे. यासाठी कर्म, उपासना व ज्ञान असे तीन विधी सनातन धर्माचे सांगितले आहेत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img