Literature

कार्तिक वद्य द्वितीया

आपण सर्वदृष्टीने विचार केल्यास धर्माचे मूळ आनंदरूपी परमात्माच आहे असे आढळून येईल. आनंदातूनच जीव जन्मास येतात व जगतातही आनंदानेच. आनंद नसेल तर श्वासोच्छ्वास करणेही शक्य नाही. सर्व जीव आनंदप्राप्ती करून घेऊन शेवटी त्यातच लीन होतात. जगाचे मूळही आनंदच. जगाची उत्पत्ति, स्थिती व लय झाल्यानंतरही अविच्छिन्न असा आनंदच उरतो व तो प्राप्त करून घेणे हेच आपले ध्येय होय. त्याचा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी शुद्धजीवनाचा प्रयत्न करणे हाच मानवी जीवनाचा मुख्य धर्म होय. त्यालाच सनातन धर्म अशी संज्ञा आहे. तो मानवनिर्मित नाही असे वेदांतून प्रतिपादिले आहे.

दृश्यवस्तू या केव्हातरी उत्पन्न झाल्या असून त्या केव्हातरी नाशही होणार हे नक्कीच. उत्पत्ति व नाश ज्या वस्तूंना आहे त्या सर्व अपूर्णच. श्रुतींनी त्यांना ‘ अल्प ‘ अशी संज्ञा दिली आहे. अशा अल्प व अपूर्ण दृश्य वस्तूंचा समुदाय म्हणजेच हे जग. जगाला उत्पत्ती, नाश चुकला नाही. दृश्यवस्तूंची निर्मिती करूनही स्वतः परमात्म्यास मात्र उत्पत्ति नाही. जगोत्पत्तीपूर्वी त्यांचे अस्तित्व असूनही तो जगरूप नसल्याने त्याला नाशही नाही. ज्याला उत्पत्ति व नाश ही दोन्हीही नाहीत तो परिपूर्ण होय. परिपूर्णता म्हणजेच खरे सुख शाश्वत सुख होय. त्यातच अनंत तृप्ती आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img