Literature

कार्तिक वद्य पंचमी

उपासना हा दुसरा विधी होय. या जगाच्या उत्पत्तीचे कारण परमात्मा होय. ‘ कर्तुं, अकर्तुं अन्यथा कर्तुंम् ‘ करणे, न करणे व निरनिराळ्या रूपांनी करणे या सर्व गोष्टींना परमात्माच समर्थ आहे. हे जग अपूर्ण आहे. त्यामुळे कोणाच्या तरी आश्रयाखेरीज स्वसामर्थ्याने हे जग चालणे शक्य नाही. दुःखनिवृत्तीकरता व इष्टप्राप्तीकरता बलवान अशा कोणाचे तरी सहाय्य असणे अत्यंत आवश्यक आहे. या जागतिक व्यवहारात बलिष्ठांच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणारा अनुभव आपणांस परमात्म्यापर्यंत नेऊ शकेल. याकरता जो समर्थ आहे त्याचेच साह्य घेणे योग्य होईल.

परमात्म्याला ‘ ब्रह्म ‘ असेही नांव आहे. *’ ब्रह्मत्वात् ब्रह्म ‘* तो आनंद, ती शक्ति, तो कारूण्यनिधी, ते सामर्थ्य हे सर्व म्हणजेच परमात्मस्वरूप. जगनिर्मात्याच्या अनुग्रहाशिवाय आपले कोणतेही काम होऊ शकणार नाही. म्हणून त्याचा अनुग्रह प्राप्त करून घेण्यासाठीच *” उपासना कांड “* आहे. परमात्म्याने उत्पन्न केलेल्या जगतांतील मानव हा एक सूक्ष्म भाग आहे. म्हणून पुर्णस्वरूप असलेल्या परमात्म्यास विसरणे योग्य नाही. त्याच्या कृपेने इहलोकी सुख मिळवून मरणोत्तर शाश्वत सुख मिळू शकते. याकरिता त्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंतिक आदराने त्याची सेवा करणे म्हणजेच ‘ उपासना ‘ !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img