Literature

कार्तिक शुद्ध अष्टमी

प्रत्येक मनुष्यमात्र शाश्वत सुखासाठीच धडपड करीत असतो. परंतु सुखासाठी मिळणारे वैषयिक अनुभव आपणास समाधान मिळू देत नाहीत हे जाणून अनुभवी साधकाने ‘ आपल्यातच असलेल्या परमात्म्याला आपण जाणू शकणे हेच शाश्वत सुख होय ‘ असे म्हटले आहे. यावरून सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रांत वसत असलेले हे आत्मतत्त्व आहे हे उघड होते. यालाच आपण परमात्मा किंवा ब्रह्मतत्त्व असेही म्हणतो. त्याच्या ध्यान-ज्ञानाने आपल्या जन्माचे सार्थक होणार आहे म्हणजेच अखंड तृप्ती प्राप्त होणार आहे. विषयाच्यामागे लागुन मिळणारे सुख हे अशाश्वत सुख होय. कारण जगातील धन, धान्य, पशु, स्त्रिया इत्यादी सर्व भोग्यवस्तु एखाद्यास दिल्यातरी त्यास शाश्वतसुख प्राप्त होणार नाही असा अनुभव आहे. त्यामुळे तो कृतकृत्याही होत नाही. ‘ विषयापासून शाश्वतसुख मिळत नाही हे जाणून त्याचा त्याग करून मनःशांती मिळविणे यातच कृतकृत्यता आहे ‘, असे भगवान मनूंनी म्हटले आहे.

सर्वसाधारणतः मनुष्याची प्रवृत्ती विषयांचा उपभोग घेऊन मग शाश्वतसुखासाठी प्रयत्न करण्याची असते. पण विषयसुखाच्या भोगाने तृप्ती न होता उलट त्यांची इच्छा वाढतच जाते व त्यामुळे शांति मिळत नाही. अग्नीत तूप ओतल्याने तो न विझता जास्तच भडकतो त्याप्रमाणे विषयाचा उपभोग घ्याल तसतशी इच्छाशक्ती त्याकडेच वाढत जाऊन मनःशांती प्राप्त होणे कठीण होते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img