Literature

कार्तिक शुद्ध दशमी

आपल्या जीवनामधील कष्ट नाहीसे करून अचल, शाश्वत सुखप्राप्तीसाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. परंतु सर्वांना आवश्यक वाटणारे शाश्वत सुख मिळविण्यासाठी हा मृत्युलोक अपुरा पडतो. कारण यातील प्रत्येक गोष्ट अशाश्वत आहे. हा मृत्युलोक परलोक प्राप्तीकरताच आहे. तसेच तो शाश्वत असे परमसुख प्राप्त करून घेण्याचे एक साधनही आहे. म्हणुन या मृत्युलोकातील भोग्य वस्तुत सुख मानणे अयोग्य होय. भोग्य वस्तुंपासून शाश्वत सुख प्राप्त होत नाही. ते भोग्य वस्तुपेक्षा निराळेच आहे. त्याची प्राप्ती करून न घेता इंद्रियसुखासाठी जगणे म्हणजे जीवनाचा अपव्यय होय आणि तसेच वागणे हे मानवजन्माचे ध्येयही नाही. कारण *’ दृष्ट्वेमान्लोकान्कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायात् | ‘* असे श्रुतीचे वचन असून कर्ममय असलेल्या या मृत्युलोकाला चांगल्याप्रकारे जाणून घेऊन त्यातून वैराग्य प्राप्त करून घ्यावे असाच या वचनाचा भावार्थ आहे.

परमात्म्याने मानवाला विशेष अशी बुद्धी, शक्ती दिली आहे. इंद्रियापासून प्राप्त होणाऱ्या सर्व बाह्यसुखापेक्षा अलौकिक असे सुख कोणते आहे ते ओळखून ते प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या शक्ति, बुध्दीचा आपण उपयोग केला पाहिजे. असे केल्यानेच चिरशांती म्हणजेच शाश्वत सुख प्राप्त होणार आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img