Literature

कार्तिक शुद्ध पंचमी

आपली सर्व कामे, जीवनातील प्रत्येक क्रिया परमेश्वर प्राप्तीसाठीच असावी. तसेच त्याच्या सेवेसाठीच आपण सर्व काही करतो असे समजून औदासिन्य सोडून कामे केल्यास आपणास सर्व श्रेय मिळेल. परमात्म्याच्या प्राप्ती करताच हा मानवजन्म असल्याकारणाने यःकश्चित विषयासाठी त्याला राबवाल काय ? प्रीतीसारखा अमूल्य पदार्थ काल्पनिक सुखाच्या मागे लागून घालविणे इष्ट आहे काय ? सर्व जीवनाचे लक्ष्य असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी जास्त प्रेम ठेवून वागल्यास त्याची भक्ती केली असे होईल. त्याच्या प्राप्तीसाठीच आपल्या हाती प्रेम हे एकच साधन आहे. निर्धाराने त्याचे संपादन करा तेवढ्याकरताच आपले जीवन आहे असे समजा. आपले न्याय्य दैनंदिन कष्ट व्यवस्थितपणे चालु ठेवा. पण ते सर्व परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे, तसेच ही सर्व परमात्म्याची सेवाच अशी जाणीव ठेवून करा. याप्रमाणे आपण परमेश्वरासाठी काम केले असता प्रेमाने वागल्यास खरोखरच भक्ती केल्यासारखे होईल.

परमात्मप्राप्तीसाठी अत्यंत प्रेमळ अशा भक्तिभावाने साधना करणे आवश्यक आहे. जीवनाचे सर्व व्यवहार त्या साधनेसाठीच झाले पाहिजेत व असे झाले तरच आत्मसुख मिळेल. सुखाच्या भ्रांतीने जगाची उत्पत्ती झाली आहे, ती भ्रांती जाऊन आत्मस्वरूपाचे दर्शन झाल्यास, त्यां सुखांत एकरूप होऊन निराळे आहे असे न वाटणे यालाच *’ आत्मसुख, ब्रह्मानंद ‘* असे म्हणतात. ते सुख म्हणजेच परमात्मा !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img