Literature

कार्तिक शुद्ध प्रतिपदा

संचित, प्रारब्ध व आगामी असे कर्माचे तीन प्रकार आहेत. अनेक जन्मांना कारणीभूत असणाऱ्या कर्मास *’ संचित ‘* म्हणतात. एका जन्मांतच शेकडो जन्मांना कारणीभूत असे कर्म व संकल्प जीव करत असतो. त्यातील ह्या जन्मास कारणीभूत असणाऱ्या कर्मास *’ प्रारब्ध ‘* असे म्हणतात. आणि पुढील अनेक जन्मास कारणीभूत ठरणाऱ्या या जन्मातील कर्मास *’ आगामी ‘* असे म्हणतात. देहसुखाची वासनाच जन्मास कारणीभूत असते. ती वासना आत्मसुखाच्या अनुभवाने घालविता येते व स्वतः आनंद ब्रह्मस्वरूपात विलीन झाल्यामुळे पुढील अनेक जन्मांना कारणीभूत असणारी संचित, प्रारब्ध व आगामी इत्यादी कर्मे ज्ञानीलोकांच्या ‘ मी ‘ निश्चित आनंदरूपब्रह्म आहे या जाणीवेमुळे संपूर्ण नष्ट होऊन व त्याच्या जन्मास कारणीभूत असणारे प्रारब्ध आयुष्यमान संपेपर्यंत आपली फळे देऊन आपोआपच नष्ट होते. ज्ञानी मनुष्याची पापपुण्ये, त्याचे हितचिंतक व त्यांचा द्वेष करणारे हेही नष्ट होतात. अशाप्रकारे जन्ममरणास कारणीभूत असलेल्या तिन्ही कर्मापासून मुक्त होऊन या जन्ममरणाच्या चक्रात ते पुन्हा सापडत नाहीत.

*’ मी अद्वितीय आहे ‘* ही जाणीव आनंदरूपाशिवाय इतर कोठेही असू शकत नाही. माझ्या ठिकाणी इतर दुसरे काहीही नाही असे निश्चित ज्ञान सातत्याने असणे किंवा त्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच प्रकाश. त्याच्यामुळे देहात असलेल्या कामक्रोधादि विकारांच्या बाधेने मनाच्या ज्या कल्पना आहेत त्यांना बाह्यप्रपंच दृश्यानेही बहिर्मुखता राहूं शकत नाही. त्याचे मन दिसेनासे होते. त्या प्रकाशामुळे जन्ममरणाची कल्पना नष्ट होते व त्यालाच *’ मोक्ष ‘* म्हणतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img