Literature

क्षणिक संबंध

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे। 

समेत्यत्तु व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन २६

एवं भार्याश्च पुत्राश्च ज्ञातयश्च धनानि च । 

समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो ह्येषां विनाभवः २७

( वा. रा. अ. कां. स. १०५) 

-कोठून तरी आलेली दोन काष्ठे समुद्रांत कांही कालपर्यंत एक होऊन वेगळी होतात व दूर वाहून जातात. त्याप्रमाणेंच कोठून तरी या संसारांत एकत्र मिळालेले हे सर्वहि जीव कांही काळ एकत्र राहून वेळ आल्याबरोबर स्त्री पुत्र धन-धान्यादि संपत्ति इष्टमित्र यांना सोडून त्यांपासून वेगळे होतात व कोठें तरी दूर निघून जातात. मृत्युनंतर कोणाचा संबंध कोणाशी राहात नाही.

नात्र कश्चिद्यथाभावं प्राणी समभिवर्तते ।

तेन तस्मिन्न सामर्थ्य प्रेतस्या स्त्यनुशोचतः २८

यथा हि सार्थ गच्छन्तं ब्रूयात्कश्चित्पाथ स्थितः । 

अहमप्यागमिष्यामि पृष्ठतो भवतामिति ॥ २९ ॥

एवं पूर्वैर्गतो मार्गः पितृपैतामहैर्भुवः ।

तमापन्नः कथं शांचेद्यस्य नास्ति व्यतिक्रमः ॥ ३० ॥

कधींच मरण नसतांना या जगांत बायकामुलें इष्टमित्र यांच्या समवेत नेहमी राहावें असलेलें वैभव मनमुराद आनंदानें अनुभवावें अशी जरी सर्वांची इच्छा असली तरी तसे घडत मात्र नाही. मरणाराला कोणी वाचवूं शकत नाही. तसेच सामर्थ्य असतें तर तो रडता कां शोक करीत बसतां येईल पण त्यांना बांचवितां येत नाही. पुढे जाणाऱ्यांना उद्देशून तुम्ही पुढे व्हा मीहि तुमच्या पाठीमागून हा आलों’ म्हणून जसें म्हणतो व तसेच करतो त्याप्रमाणेच ज्या मृत्युमार्गानें त्याचे आजोबा पणजे वडील चुलते यापूर्वी गेले त्याच मार्गाचा अवलंब करून त्यांच्यामागून तोहि जात असतो. ज्याला टाळतां येणें शक्य नाही अशा मृत्यूकरितां व्यर्थ शोक करीत आयुष्याचा नाश करून घेण्यापेक्षां तेवढ्याच काळांत जन्मजरामरणांतून सुटण्याकरितां कांहीं अचूक साधन केलें तर कोण बरें त्या मृत्यूपासून कायमचाच मुक्त होणार नाहीं? 

या ठिकाणीं श्रीसमर्थांचा मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ होतो । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतो  हा श्लोक वाचकांना बिनचूक आठवेल.

home-last-sec-img