Literature

गुरुपौर्णिमा

ॐ. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढपीर्णिमा, आषाढपौर्णिमेस पाऊस असतोच. पाण्याला संस्कृतमध्ये ‘जीवन’ असे म्हणतात, ‘जीवन भुवनं वनम् ।’ गुरुपौर्णिमा आणि पावसाळा. ह्यांच्यात काहीतरी समजून घेण्यासारखे असे आहे का ? आहे. पाऊस म्हणजे जलवर्षाव जल म्हणजे जीवन. जीवनाधार तत्त्वांचा वर्षाव म्हणजेच पावसाळा आणि अशाच वेळी गुरुपौर्णिमा येते. ह्या गुरुपौर्णिमेनें काय दर्शविले जाते ? तर गुरुसुद्धां जीवनाधार असणारे तत्त्व पावसाप्रमाणे वर्षतो. आत्मतत्त्वाचा म्हणजे आत्मज्ञानाचा वर्षाव करतो. कसा वर्षाव ? पावसासारखा. पावसासारख्या वर्षावात काय वैशिष्ट्य आहे ? तर ‘सर्व समत्व’ आहे. पाऊस हा अमका, हा तमका, हा पापी, हा पुण्यवान, ह्याच्या जमिनीवर आपण वर्षावे आणि इतरांच्या म्हणजे पाप्यांच्या जमिनीवर वर्षू नये असे कांही पाऊस जाणत नाही. तो सर्व समत्वाने चोहोकडे वर्षाव करतो आणि जलसमृद्ध करतो, जीवन समृद्ध करतो. त्याच प्रमाणे गुरूहि आपपर, चांगला-वाईट असें न पाहतां सर्वत्र ज्ञानोपदेश करतो. जीवन हैं कशामुळे ? कित्येक म्हणतील अन्नामुळे. पण श्रुतींचे सांगणे असे आहे की, हे सर्वच विश्व आनंदामुळेच झालें, आनंदापासून झाले. भृगुपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. त्यांत ‘भृगुर्वे वारुणिः । वरुणं पितमुपससार । अथीहि भगवो ब्रह्मेति ।’ (तैति उ.) वरुणाचा पुत्र भृगु वरुणाजवळ जाऊन आत्मज्ञानाची याचना करूं लागला. भृगूंनी आपल्या वडिलांजवळ जाऊन ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा प्रदर्शित केली. ‘अधीहि भगवो ब्रह्म ।’ ब्रह्म काय ते मला समजावून सांगा अशी प्रार्थना केली. ‘तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व ।’ ‘तप हैं एक ब्रह्मज्ञानाचे साधन आहे. त्यामुळे तपाने तूं ब्रह्म जाण’ असा उपदेश वरुणानी भृगूस केला. ‘ते तप म्हणजे विचाराख्य तप कसे करावयाचे ?’ ‘ज्याच्यापासून ह्या चराचर विश्वाची उत्पत्ति होते आणि उत्पन्न झालेले हे सर्वहि विश्व, अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज एवढेच नव्हे तर देव, तिर्यक्, मनुष्य सर्व यच्चयावत भूतजात ज्यामुळे जगतें आणि शेवटी ज्याच्या प्राप्तीकरतां सर्व जगाची आशा सोडून त्याची प्राप्ती व्हावी म्हणून त्याच्याकडे वळते आणि ते जाणून ज्याच्यांत हे अखिल विश्व, हे सर्वहि प्राणी एकरूप होतात ते परब्रह्म. आणि ते तूं जाण !” त्याने विचार केला. ‘अन्नं ब्रह्मेति व्यजानात् ।’ ‘अन्नाने प्राणी जगतो, अन्नानेच उत्पन्न होतो, अन्नातच विलीन होतो आणि अन्नप्राप्तीसाठीच प्रयत्न करीत असतो. म्हणून अन्न हेच परब्रह्म.’ असे त्याने प्रथम जाणले. पण त्याचा तो प्रयत्न तोकडा ठरला. कारण तो मूलग्राही नव्हता. मग शेवटी विचार करता करतां ‘आनन्दो ब्रह्मेति व्यजानात् ।’ ‘आनंद हेच परब्रह्म आहे.’ असें त्यानें जाणले. आनंदामुळेच हें सर्व जग निर्माण होते. उत्पन्न झालेले हे सर्वहि प्राणी जर अन्नानें जगत नसतील तर प्राणानें जगतात का ? नाही. ‘न प्राणेन न अपानेन मत्य जीवति कश्चन । इतरेण तु जीवन्ति यस्मिन्नेता।’ ‘प्राण आणि अपानानें प्राणी जगत नाही. दुसऱ्याच कशामुळे, कोणत्या तरी कारणाने प्राणी जगतो तें कारण कोणते ? तर ‘आनंद’, ‘आनन्देन जातानि जीवन्ति । आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्तीति ।” आनंदाच्या प्राप्तीच्या इच्छेने प्राणी जगून असतो आणि जगतोहि. पण आनंदाच्या आधारानेच. आनंद हेच जीवनाचें साधन व साध्य आहे. आणि शेवटी तो आनंदातच एकरूप होऊन जातो, हा आनंद म्हणजेच परब्रह्मस्वरूप. ह्यालाच ‘राम’ असेहि म्हणतात.

‘रमन्ते योगिनो यस्मिन् नित्यानन्दे चिदात्मनि । इति रामपदेनासौ परं ब्रह्माभिधीयते ।’ योगी, आत्मज्ञानी ज्या अनंत आनंदात एकरूप होऊन असतात, ज्या नित्य आनंदरूपांत विरघळून गेलेले असतात, सदैव रममाण असतात असा तो आनंदरूप परब्रह्मच ‘राम इत्यभिधीयते ।’ राम ह्या शब्दाचा अर्थ किंवा लक्ष्य आहे. राम म्हणजे आत्मा. तेव्हां ‘हृदयीं असतां श्रीराम । आनंदघन पूर्ण काम ।” ‘ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।” तो हृदयांतच आहे. रामाला ईश्वर म्हणा किंवा परब्रह्म म्हणा. ईश्वराचे लक्ष्य स्वरूपहि परब्रह्मच. तेव्हा राम हाहि परब्रह्मरूपाने आणि सद्गुरुरूपाने आमचे ध्येय आहे, प्राप्य आहे, आश्रयस्थान आहे.

‘आमुचे कुळी रघुनाथ । रघुनाथे आमचा परमार्थ । जो समर्थांचाहि समर्थ देवा सोडविता ।। त्याचे आम्ही सेवकजन । सेवेकरितां झाले ज्ञान ।’ असे समर्थांनी स्पष्ट सांगितले आहे. ‘रघुनाथ भजने ज्ञान झाले । रघुनाथ भजने महत्त्व वाढले । म्हणूनी तुवां केले पाहिजे आधी ||’ असा आपला अनुभव सांगून ‘हे तो आहे सप्रचित । आणि तुज वाटेना प्रचित । साक्षात्कारे नेमस्त । प्रत्ययो करावा ||’ हे स्पष्ट आहे. ‘आधी केले मग सांगितले ।’ असा हा ज्यांचा बाणा, त्यांचे हे स्पष्ट असे सांगणे आहे की, ‘माझा हा अनुभव तुलाहि पाहिजे असल्यास तूहिपण मी सांगतो तसें कर. त्याला शरण जा! मला जसे ‘रघुनाथ भजने ज्ञान झाले त्याप्रमाणे तुलाहि पण होईल. म्हणून ‘राम’ हा सद्गुरू आहे. उपनिषदांत सुद्धां ‘राम हा सद्गुरू’ असे वर्णन केले आहे.

‘मुक्तिकोपनिषद’ म्हणून एक शेवटचे उपनिषद आहे, त्यात ‘मयोपदिष्टं शिष्याय तुभ्यं पवननन्दन । इदं शास्त्रं मयाऽऽदिष्टं गुह्यमष्टोत्तरं शतम् ।’ रामानी सर्व उपनिषदांचा विचार केला. तसे रामाला काही विचार करायला नको. ते स्वतः सिद्ध आहेत. त्यांना सर्व उपनिषदांमध्ये हीं एकशे आठ उपनिषदे रुचली व त्यांनी त्यांतून निवडून काढून मारुतीला उपदेशिली आणि पुढे त्यांचा प्रसार जगांत झाला. तर ‘रामः सर्व भूतेषु ददौ ।’ हे ज्ञान, शास्त्र रामानी सर्व भूतांना दिले असे उपनिषद सांगते. त्यामुळे राम हे सद्गुरू आहेत. समर्थांचे सद्गुरू म्हणजे ‘श्रीराम’, हे तुम्हालाही माहीत आहे व मलाहि माहीत आहे.

‘गणेश शारदा सद्गुरू । संत महंत मुनेश्वरू । सर्वहि माझा रघुवीरू । सद्गुरुरूपे ।।’ तेव्हा राम हे सद्गुरू आहेत. ‘ऐसा जो का परमपुरुष । निर्विकल्प निराभास । शुद्धबुद्ध स्वयंप्रकाश । आत्माराम । ऐशियाजी सद्गुरुरामा । अगाध तुमचा महिमा । ऐक्यरूप अंतर्यामा मूळपुरुषा ।। तुझिये कृपेचेनि उजेडे । तुटे संसारसांकडे । दृश्य मायेचे मढें । भस्मोनि जाय तुझिये कृपेचा प्रकाश करी अज्ञानाचा नाश । भाविक भोगिती सावकाश अक्षयीपद ।।’ अशी स्तुती श्रीसमर्थांनी पंचसमासीत केली आहे. ‘अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः ।’ अज्ञान नष्ट करणारे असे कोणते तरी एक दैवत असेल तर ते ‘गुरुदैवत’. ‘अज्ञानग्रासक’ इथे ग्रासक ह्याचा अर्थ सूर्य अंधारग्रासक आहे असे म्हटल्याप्रमाणें, तो काही अंधार गिळीत नाही, नष्ट करतो.

‘अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाअनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||’ अज्ञान नष्ट करणारा तो सद्गुरु कशामुळे ते नष्ट करतो ? ‘ज्ञानाञ्जनशलाकया मोहांधःकाराने डोळे झाकलेले आहेत ते जो ज्ञानशलाकेने उघडतो तो सद्गुरु. ‘जो अज्ञान अंधकार निरसी । जीवात्मया परमात्मयासी ऐक्य करी ।’ असा तो सद्गुरु. तेव्हां हे गुरुरूप म्हणजे रामरायाचं सगुणरूप आणि निर्गुणरूप म्हणजे ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ सत्य, ज्ञान, सत्तामात्ररूप, ज्ञानरूप आणि केवळ आनंदरूप, निराकार, निर्गुणरूप होय. तात्पर्य, गुरु हा संसारतारक आहे. ‘जो आत्मज्ञान उपदेशी जीवात्मा परमात्मयासी ऐक्य करी ।’ असा हा गुरु शब्दाचा अर्थच आहे. ‘जें सकळ श्रमांचे सार्थक । जें भाविका मोक्षदायक ।” ‘जें महावस्तूचे साधन । अद्वैतबोधाचे अंजन । जेणे पावती समाधान । महायोगी ।।’ जेथे दुःखाचा दुष्काळ । निव्वळ सुखाचे अळूमाळ । आनंद सुखाचा सुकाळ । तेंचि तें आहे ।। ऐसें जें महाअगाध | योगेश्वराचें स्वतःसिद्ध । आत्मज्ञान परमशुद्ध | पापांडावेगळें ॥ नाना मतें मतांतरें । सृष्टीत चालती अपारें । तयामध्यें ज्ञान खरें । वेदांतमतें । असो सर्वप्रकारें शुद्ध । जें सर्वांमध्ये प्रसिद्ध । तया ज्ञानाचा प्रबोध । मज दीनासी करावा ।।’ म्हणून अजून देखील जे कोणी रामरायास शरण जातात, समर्थांना शरण जातात ते ज्ञानीच होतात. रामाची भक्ती केल्याने काय होते ? तर ‘ज्ञान बोलावें टळेना ऐसे ।’ असे सामर्थ्य येते असे समर्थानी सांगितले आहे. असो !

आज गुरुपौर्णिमा. तेव्हा तुम्ही सर्वहि गुरुदर्शनाकरता इथे आलात. गुरूंची आराधना गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष. गुरु आराधनेनें काय होते ? तर आत्मलाभ होतो. ‘गुरोराराधनं कुर्यात् श्रेयसे भूयसे नृणाम् ।’ गुरूंची आराधना करावी. कशाकरता? ‘श्रेयसे भूयसे नृणाम् ।’ मोक्षापेक्षेने आराधना करावी हे उत्तमच. पण गृहस्थांना केवळ मोक्षाचाच अवलंब करून भागत नाही. त्यांना ‘भूयसे’ ऐहिक जीवनसाधने पण आवश्यक आहेत व ती लागतात. गुरुआराधनेनें ऐहिक जीवन सुखसमृद्ध होते आणि परब्रह्माची प्राप्ती होऊन मोक्षाचाहि लाभ होतो असे गुरुगीतेत सांगितले आहे. ज्याला गृहस्थाश्रमाची इच्छा नाही व ज्याने निवृत्तीमार्ग चांगला म्हणून त्याचा अवलंब केला आहे त्या विरक्ताला केवळ मोक्षाची प्राप्ती ह्या गुरुआराधनेने होते. संसारिकांना दोन्हीची प्राप्ती होते व ज्ञानवैराग्ययुक्त अशा विरक्तांना केवळ मोक्षाची प्राप्ती होते. थोडक्यात म्हणजे ‘न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकः। शिवशासनतः शिवशासनतः शिवशासनतः शिवशासनतः ।’ गुरुगीतेत म्हटलेले आहे. गुरूहून अधिक कांही नाही. गुरूच सर्वश्रेष्ठ आहे. कुणी सांगितले ? ‘शिवशासनतः शिवशासनतः ।’ प्रत्यक्ष शिवानी सांगितले.

तात्पर्य, गुरुविण ज्ञान झाले । हे तो घडेना ॥” ‘करोनि नाना सायास केला चौदा विद्यांचा अभ्यास ऋद्धिसिद्धी सावकाश । ओळल्या जरी ।’ ‘तरी गुरुकृपेविण कांही । भवतरणोपाय तो नाही असे समर्थांचे स्पष्ट सांगणे आहे आणि ह्याला श्रुती आधार आहे. ‘तद्विज्ञानार्थ गुरुमेवाभिगच्छेत् ।” ते जाणण्याकरितां गुरूलाच शरण जायला पाहिजे असे सांगितले आहे. ‘आचार्यवान् पुरुषो वेद ।’ ज्यांने गुरूंचा आश्रय केला आहे त्यालाच ते तत्त्व कळले. आचार्यांकडून शिकविली गेलेली विद्याच परिणामकारी होते. ‘पुस्तकज्ञाने निश्चये धरणे । तरी गुरु कासया करणे ।’ असे समर्थांनी पण सांगितले आहे. तेव्हां ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।।’ गीतेत सुद्धा असेच सांगितले आहे. गुरु शरणागती, गुरुसेवा आणि परिपश्न शंका समाधान ह्या साधनानेच आत्मज्ञानाचा लाभ होतो. ‘गुरुकृपाप्रसादेन ब्रह्मविष्णुशिवादयः । सामर्थ्य तत्प्रसादेन केवलां गुरुसेवया ब्रह्मा, विष्णु, महेश्वरांना इतके जे सामर्थ्य प्राप्त झाले ते गुरुकृपेमुळेच. ‘असो जयासी मोक्ष व्हावा । तेणे सद्गुरु करावा । सद्गुरुविण मोक्ष पावावा । हैं कल्पांती न घडे ॥’ तात्पर्य, असे हे सद्गुरूंचे मोठे पद आहे.

सद्गुरुचेनि अभयंकरे । प्रगट होईजे ईश्वरें । संसारदुःखें अपारें । नासोनि जाये । जैसी नेत्रीं घालतां अंजन । दृष्टीस पडे निधान । तैसे सद्गुरुवचनें । ज्ञान प्रकाशें ।।’ असे हे सद्गुरुपद फार दुर्लभ आहे.

‘सर्वचिन्तावधीः गुरुः ।’ सद्गुरुप्राप्ती झाली म्हणजे सर्व चिंतेची बोळवण होते. चिंता राहात नाहीं. ‘हे सर्वहि सद्गुरुपाशी । सद्गुरू पालटे अवगुणासी । नानायलें ॥’ तेव्हां त्या सद्गुरु तत्त्वाच्या आराधनेकरितां तुम्ही येथे जमलेले आहांत. आला आहांत दुरून. ते सद्गुरुरूप कसे आहे ते तुम्हाला माहीत आहे ?

‘ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति । द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।’ ब्रह्मानंदरूप आहे. ‘गुरुरेव पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।’ असो.

पाऊस पडतो आहे. भिजतां आहां. तिकडे त्या जीवनाचा वर्षाव झाला आणि इकडून आत्मतत्त्वाच्या जीवनाचा वर्षावहि पण झाला. गुरूंचे सांगणे काय आहे? ‘ तत्त्वमसि ।’ तें परब्रह्मतत्त्व तूं आहेस. आपण ते परम ब्रह्मतत्त्व अंगी बाणवून घेऊन दुसऱ्यांना जे ते ब्रह्मतत्त्व अंगी बाणवतात तेच सद्गुरु ‘जो ब्रह्मज्ञान उपदेशी । तो सद्गुरु।” त्या ब्रह्मज्ञानाने सर्व अरिष्टानिष्ट नष्ट होवो | त्या सद्गुरूची तुम्हावर पूर्ण कृपा होवो आणि तुमच्या अडीअडचणी सर्वहि नष्ट होवो; ज्ञान प्राप्त होवो आणि त्या आनंदघन स्वरूपासी एकरूप होऊन तुम्हां सर्वाचेहि जीवन दिव्य होवो.

पहा ! प्रत्यक्ष बोलणे, चालणें नसले तरीहि सर्वांच्या आपत्ति, दुःख, जे कांही अरिष्टानिष्ट असेल त्याचे निवारण होवो म्हणून तीनदा आन्हिकाच्यावेळी खाली जमिनीवर तीर्थ टाकतो. सर्व विश्वातले दुःख नष्ट व्हावे म्हणून ते तीर्थ टाकले जाते. त्यामुळे त्यानें तुम्हा सर्वांचेहि दुःख नष्ट होतेच आणि गुरु कोठे गेला नाही. तो तुमचे शुद्धरूपच आहे. तुमच्या हृदयातच आहे. माझे जे हे, ते तुमचे स्वरूपच आहे. इतकी जवळीक असतांना, मी बोललो नाही, प्रत्यक्ष आपल्या अडीअडचणी सांगता आल्या नाहीत असे वाटू देऊ नका ! सर्व दृष्टीनेहि उत्कृष्ट होवो. आनंदरूप व्हा ! जीवनमुक्त व्हा !! अरिष्टानिष्ट सर्व जाऊन तुम्हां सर्वांचे जीवन आनंदरूप होवो. उणीव म्हणून कसलीहि न राहता, चांगले होवो ! आणि जे वाईट आहे ते समूळ नष्ट होवो ! मंगलमय जीवन होवो ! पवित्र जीवन होवो ! आनंदरूपाचे जीवन होवो. सर्वहि सुखी असा !!

जय जय रघुवीर समर्थ!

home-last-sec-img