Literature

चैत्र वद्य तृतीया

धर्म हा अर्थ व कामाचें मूळ आहे. धर्मबाह्य वर्तनाच्या याेगाने द्रव्यप्राप्ती केल्यास व कामप्रवृत्त झाल्यास या जन्मी किंवा परलाेकी सुख मिळत नाही. अर्थ अनर्थाला आणि काम क्राेधादींना कारणीभूत हाेताे. त्यामुळे त्यास समाजात काेणतेंच स्थान राहणार नाही. तसेच अशा अर्थ–कामानें मनुष्याची मनाेवृत्तीहि दूषित हाेते. मनोवृत्ति बिघडली म्हणजे सुख, शांति ही दुरावतात. दुष्ट मनोवृत्तीला परलाेकाचा विचारहि सुचत नाही.

आजचे कार्य हें पुढील जन्माचे प्रारब्धकर्म हाेय. आजच्या कर्माने मनुष्याची याेग्यता कळते, मनाेभावनेस याेग्य असें कर्माचरण घडत असते. सद्–विचारानें सत्कर्म घडते तर दुर्विचाराने दुष्कर्म घडते. संगतीसुध्दा मनुष्याच्या विचारास व कर्मास कारणीभूत असते. चाेरांचा सहवास झाल्यास चाैर्यकर्म व दुर्वर्तनी लाेकांचा सहवास घडल्यास दुष्कर्मे त्यास चिकटतात.

मानवांची कर्मे त्यांच्या मनाच्या शुध्दतेकरितां तसेच अशुध्दतेकरिताहि कारणीभूत असतात. सदाचारानें मन:शुध्दि हाेते तर दुष्कर्माने तें अपवित्र हाेते. एखादा मनुष्य चाेरी करण्यास प्रवृत्त झाला तर त्याचे मन विचलित हाेतें व चाेरी केल्यावर ती लपविण्यासाठीं ताे खाेटे बाेलताे. चाेरी व खाेटेपणा यामुळे कलुषित झालेले मन निगरगट्ट बनल्यास ताे त्याचा गुणच बनताे व अशा रितीने मनुष्य एकदां अधर्माचरणास प्रवृत्त झाला म्हणजे त्यांतच सुख मानून ताेच मार्ग अवलंबित रहाताे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img