Literature

चैत्र वद्य द्वादशी

दुस-याची म्हणून जी कल्पना भासते ती ' मी ' ह्या अनुभवांतून पुसून टाकली म्हणजे जें काहीं उरतें तें केवळ ' मी '
च होय. ह्या केवळ ' मी ' व्यतिरिक्त जी दुसरी कल्पना आहे तेंच ' अज्ञान ' होय. आपल्यास दुस-या पदार्थापासून
सुखप्राप्ति होते ही कल्पना दु:खाला मूळ कारण होत असते. ' मी ' खेरीज जें दुसरें काहीं आहें तें सर्व दु:खदायकच
असतें. सुखप्राप्तीसाठीं इतर पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा किंवा कल्पनाहि न करतां आपण स्वत:च सुखरूप झाले
पाहिजे, आनंदरूप झालें पाहिजे. दु:खाचा अभाव असणें, होणें म्हणजेंच आनंद होय. तेथें दु:ख ही भावना कधीच
भासत नाही. पण ह्या जगांत दु:खाचा अभाव असलेला एकहि पदार्थ नाहीं. म्हणूनच हें जग आनंदमय नसून
दु:खायुक्त आहे.

आनंदात इतर कशाचाही अंतर्भाव नसतो. तो एकरूप आहे. जें नाहिसे होतें, जातें नाश पावतें तें दु:ख आणि तें
गेल्यावर फक्त आनंदच उरतो. हा आनंदच उरल्यावर मग कोणती इच्छा शिल्लक रहाणार ? किंवा कशाच्या
प्राप्तीची इच्छा होणार ? आनंद प्राप्तीची किंवा सुखाची इच्छा दु:खनिवारणासाठीच होत असते. पण आनंदप्राप्ती
झालेल्यास कधींहि दु:ख होणें शक्य नाही.
आपलें सत्यस्वरूप केवळ आनंद हेंच असून ते शाश्वत अनिवाशी आहे.

श्री प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img