Literature

चैत्र वद्य षष्ठी

जगदोत्पत्तीचें मूळ कारण ब्रम्हच. ब्रम्हाकडून उत्पन्न झालेल्या सृष्टीसाठी जे नियम करण्यास आले त्यांनाच ‘ वेद ‘ म्हणतात. हिरण्यगर्भ असलेल्या आदिनारायणानें ब्रह्मदेवास वेदाचा उपदेश केला. ह्या सृष्टीतील जीवमात्रांसाठी इहपरसाधक विधिनिषेधात्मक असे जे नियम आहेत तेच वेद. वेदांचा अभ्यास करूनच सृष्टीकर्त्यांने सृष्टी निर्मिली आहे. ऋषीमुनींनी त्या वेदांचा अभ्यास केला. मुनींनी आत्मशक्तीच्या बलाने वेद समजून घेतले. मंत्राचे निर्माते ते ऋषि किंवा वेदांचा अभ्यास केलेले ते ऋषि, असें म्हटलें जातें. वेद अपौरूषेय आहेत.

वेदामध्यें सांगितलेले विधिनिषेधात्मक धर्माचरण केवळ मानवापुरतेंच मर्यादित नाहीं तर देवता, पितृ याचीहि दृष्टी वेदच. ज्यांना ‘ लोकचक्षु ‘ असे नाव आहे अशा वेदांचा संबंध संपुर्ण जगताशी आहे. जगाच्या जीवनास, धारणेस कारणीभूत असा जो धर्म म्हणजेच वैदिक धर्म आहे तो जगांतील सर्व धर्मांत पुरातन होय. ह्या धर्मापासूनच इतर धर्माची निर्मिती झाली असल्याने इतर धर्मातहि वैदिक धर्माची मूलतत्वे आढळून येतात.

मनुपासून मानवाची उत्पत्ती आहे व त्याने लिहिलेल्या मनुस्मृतीचा आधार वेदच. मनुस्मृतीत मानवधर्माची मुलतत्वे सांगितली असून तीं तत्वे विश्वमान्य असल्याचें आधुनिक लोकही कबूल करतात.

प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img