Literature

चैत्र शुद्ध एकादशी

प्रायः शिव व विष्णू या दोघांच्या भक्तामध्ये खडाजंगी चालत असते. ही भांडणे मिटवावीत असाहि ‘ श्रीरामावतार ‘ घेण्यात परमात्म्याचा एक उद्देश असावा आणि हे स्पष्ट करून दाखविण्याकरीतांच त्याने तद् बोधक नाम ‘ राम ‘ असे ठेवून घेतले हे पुढील मंत्रावरून स्पष्ट होते.

‘नारायणाष्टाक्षरे च शिवपञ्चाक्षरे तथा |
सार्थकार्णव्दयं रामो रमन्ते यत्र योगिनः ||

‘ॐ नमो नारायणाय ‘ हा नारायणाष्टारी मंत्र आहे आणि ‘नमः शिवाय ‘ हा शिव पंचाक्षरी मंत्र आहे. देवता, मंत्र यातील वाच्य- वाचक संबधामुळे अभेद मानला जातो. ह्या दोन्ही मंत्रातील सारभूत अक्षरांचे ऐक्य ‘राम ‘ शब्दांत आहे. अष्टाक्षरातील ‘रा’ व पंचाक्षरातील ‘म’ मिळविला म्हणजे ‘राम ‘ हे रुप तयार होते. संस्कृत ‘रामः ‘ आणि प्राकृत ‘ राम ‘ अष्टाक्षरातील ‘ रा ‘ काढला तर ‘ ॐ नमोनायनाय ‘ असें उरते. ‘ न अयनाय ‘ म्हणजे मोक्षस्थान प्राप्त होत नाही किंवा कोणत्याहि दृष्टीने आश्रणीय नाही असा त्याचा अर्थ झाला. यावरून ‘ रा ‘ ह्या अक्षरांचे किती महत्त्व आहे हे समजून येईल. अष्टाक्षरी मंत्र जो इतका तारक म्हटला जातो तो या केवळ ‘ रा ‘ च्या आधारानेंच हेंहि ह्यामुळे लक्षात येईल. तसेच पंचाक्षरीतील ‘ म: ‘ काढला तर ‘ न शिवाय ‘ असे उरते. ‘ न शिवाय ‘ म्हणजे योग्य, कल्याणप्रद अथवा सुखकारक होत नाही असा अर्थ होतो. पंचाक्षरी मंत्र जो इतका तारक म्हणून म्हटला जातो तो या केवळ ‘ म ‘ काराच्या आधारानेंच, हे त्यामुळे लक्ष्यात येते व ‘ राम ‘ शब्दाचे महत्व आणि त्यांत दिसून येणारे हरिहरैक्य ह्या दोन्ही गोष्टी मनावर चांगल्याच बिंबतात.

श्री प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img