Literature

चैत्र शुद्ध द्वादशी

राम या नावांत ‘ र + आ+ म् + अ’ अशी अक्षरे आहेत ह्यात ‘र’ हें श्रीरामाचे रूप आहे. जी रेफारूढ ‘ आ ‘ + ‘म्’ + ‘ अ ‘ ही अक्षरे त्रिगुण, त्रिगुणाभिमानी ब्रम्हा, विष्णू व रूद्र ह्या देवता. त्यांच्या ब्रम्ही, वैष्णवी, रौद्री या शक्ती होत.

” रामकृष्ण नामें उन्मनी साधिली | योगियां लाघली सकल सिध्दी|” हे श्रीमत् ज्ञानेश्वरांचे वचन सर्वप्रसिध्दच आहे. ज्या ठिकाणी मोठे मोठे योगी रममाण होतात अशा सार-गर्भित अर्थाची केवळ ब्रह्मरूपच ही ‘ राम ‘ अशी दोन अक्षरें आहेत. ह्याच अर्थाने श्री एकनाथ महाराजांनी ” नाम ब्रह्म नाम ब्रह्म | येणे पुरती सकलकाम | संसाराचा श्रम | कांही उरो नेदी रे || ” असें म्हटले आहे.

राम शब्दातील ‘ र ‘ हे अग्निबीज आहे. त्यामुळे तें प्रकाशरूपात पर्यवसित होतें व सच्चिदानंदरूप परमात्माच असा त्याचा अर्थ आहे. ‘ र् + आ = रा ‘ र् हे व्यंजन निष्फळ ब्रह्मरूप आणि आ हा स्वर मायारूप प्राण आहे. स्वराशी व्यंजनाचा जो संयोग ‘ रा ‘ या अक्षरात आहे तो क्रियाशक्तिप्राणरूप मायेचा संयोग निष्कल परब्रह्माची होऊन बनलेल्या सगुण परमात्म्याचे द्योतक आहे. देह असेपर्यंत ऐहिक वैभवाची आवश्यकताहि बहुजन समाजास असते. तसेंच भरभराटहि व्हावयास पाहिजे असतें हे लक्षात घेऊन ‘ म ‘ हा वर्ण अभ्युदयार्थ आहे. एकूण ‘ रा ‘ ह्या अक्षराने सृष्टीकर्ता मायाविशीष्ट सगुण साकार परमात्मा असा अर्थ होऊन ‘ म ‘ कारानें जगत्सृष्टिस्थितीलयप्रवेश, भक्तानुग्राहकत्व, भक्तकामकल्पतरूत्व द्योतित होते.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img