Literature

‘जगीं धन्य तो’

अनुकूल वेदनं सुखं प्रतिकूलवेदनं दुखःम् । सुखानुशयी रागः । दुःखानुशयी द्वेषः ॥ अनुकूल बुद्धि सुखाची आणि प्रतिकूल बुद्धि दुःखाची भावना निर्माण करते. ही सुखकारक वस्तु आहे असें वाटल्यानंतरच त्या वस्तूची प्रीति जडते. ही दुःखकारक वस्तु आहे असे वाटल्यानंतरच त्या वस्तूचा द्वेष उत्पन्न होतो. समीचीन म्हणजे ही वस्तु चांगली आहे असे वाटले की, त्या वस्तूचें ध्यान जडतें, तिची अभिलाषा होते. असमीचीन म्हणजे ही वस्तु वाईट आहे, असे वाटल्यानंतर त्या वस्तूचा द्वेष जडतो व त्याग घडतो. निःस्पृह साधकानें दृश्य पदार्थाकडे लक्षच मुळी घालू नये. कोणाची निंदा, कोणाची स्तुति, आपला परावा मानणे अभिमान घेणें हे कांहीं करूं नये. एक आनंदघनस्वरूपाचे ध्यान, एकान्त वास, निर्वाहाकरितां मधुकरी, आच्छादनाकरितां वस्त्र, मन रमविण्याकरितां ज्ञानवैराग्यप्रधान सद्ग्रंथांचे वाचन, यापलीकडे निःस्पृहापाशी कांहीच असू नये. याहून अधिक काही करू गेल्यास तोच एक मनाचा विषय होऊन बसतो आणि आत्मचिंतन सुटते.

सदा सेवि आरण्य तारुण्य काळी । मिळेना कदा कल्पने चेनि मेळीं । चळेना मनी निश्चयो दूढ ज्याचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥” (मनोबोध ५४) असे श्रीसमर्थानी म्हटले आहे. समाजात जरी असले तरी अरण्याचे वातावरण आपल्या भोवती ठेवावें. शरीर म्हणजे एक गड, बुद्धी-पत्नी; मन-मंत्री, इंद्रिय-सैन्य वासना परिचारिका अशी सर्व कामादि-शत्रुपक्षला मिळाली असता तेथील तरुण तेजस्वी साधकाला राजाप्रमाणे केवळ आपल्या हिताकडे लक्ष देऊन तत्त्वाच्या बळाने इथे विवेक रूपी खड्गाच्या आणि वैराग्यरूपी ढालीच्या जोरावर कामादि शत्रूंना जिंकावयाचे आहे. ‘शितोष्णाहारनिद्राविजयः। सर्वदा शांतिः। निश्चलत्वम्। विषयेंद्रियनिग्रहः। एते यमाः। गुरुभक्तिः। सत्यमार्गानुरक्तिः। निर्दुष्टसुखागतवस्त्वनुभवः। तद्वस्त्वनुभवेन तुष्टिः। निःसंगता। एकान्तवासः। मनोनिवृत्तिः। फलानभिलाषः। वैराग्यभावः । नियमाः ।‘ मण्डल ब्राह्मणोपनिषदांत प्रारंभीच दिलेले हे यमनियम निःस्पृह साधकाच्या नित्य आचरण असावेत.

‘देहस्य पञ्चदोषा भवन्ति।‘ देहांत पांच दोष आहेत. कामक्रोधनिःश्वास भयनिद्राः । कोणते ते सांगतात : १ काम, २ क्रोध, ३ निःश्वास, ४ भय आणि ५ निद्रा, याच्या निवृत्तीचा उपायहि अशा रीतीने दाखवितात. तन्निरासस्तु निःसंकल्पक्षमा लध्वाहाराप्रमदितातत्व सेवनम् ।कामाच्या निवृत्तीकरितां देहात्मक बुद्धि त्यागणे तो संकल्प म्हणजे ती वृत्ति मनात येऊ न देणे, कोणत्याहि स्त्रीचा आकार मनांत ठसेल असे प्रेमाचें अथवा द्वेषाचे आचरण कोठे न ठेवणें. कल्पना आणि आकार मनांत आल्यान निराकार आनंदमात्र स्थितीत त्याचा तत्क्षणी लय करणे आणि वृत्तीचा उद्गम न होऊ देतां निर्विकल्प आनंदांत समरसून जाणे. क्षमा करणें ही क्रोधावर मात्रा आहे. एकंदरीत आपल्याला त्रास न होईल अशा दृष्टीनें सभोवार विवेकाचें कुंपण घालून चित्ताचा क्षोभ न होऊ देणें, न बोलणें, स्थलत्याग करणें, निरहंकार असणे हे क्रोधावरचे उपाय आहेत. हलका आहार घेतला म्हणजे श्वास मंद चालतो. जितका श्वास मंद होईल तितकें मन एकाग्र होते. आणि शांत असते. श्वास म्हणजे एक भाता आहे, त्याचे कमीअधिक प्रमाण करणे आपल्या हातांत आहे. जास्त श्रम न करणे, प्रकृति अशक्तहि न होऊ देणें व शांत वृत्ति राहील आणि सहज पचेल असा हलका आहार घेणे. दोन भाग अन्नानें, तिसरा भाग पाण्याने भरणे आणि चौथा भाग मोकळा ठेवणें हें योग्यांच्या आरोग्यकारक भोजनाचे लक्षण आहे. श्वासाचा भाता मंद चालू करण्याचे हे उपाय आहेत. ‘हितं मितं सदाऽश्नीयाद्यत्सुखेनैव जीर्यते । धातुः प्रकृप्यते येन तदन्नं वर्ज्ययेत् सदा ॥ आहारस्य तु द्वौ भागौ तृतीयमुदकस्य तु । वायोः संचरणार्थाय चतुर्थमवशेषयत् ।।कुठे न चुकणे, कोणाचा द्वेष न करणे, कोणाची निंदास्तुतिः अपरोक्षहि न करणे, निष्पाप आचरण ठेवणे, मनानेंहि कोणाच्या अहिताचे चिंतन न करणे हे एवढे असले म्हणजे भयाचे कारण उरत नाही. भयावरचे हे उपाय आहेत. निदेनें तर द्वेष वाढतोच, तसा स्तुतीनेंहि तद्विरुध्द माणसाचा द्वेष पत्करावा लागतो. म्हणून निःस्पृह साधकाने दोन्हींचा त्याग करावा. द्वितीयाद्वै भयं भवति । (बृ. आ.) वेगळ्या प्राणिपदार्थाच्या भावनेनें भयाची उत्पत्ति होते. उदरमंतरं कुरुते अथ तस्य भयं भवति। परमात्म रूपाहून जो थोडेहि आपल्याला भिन्न लेखतो त्याला भय होते. ‘आनंदब्रह्मणो विद्वान् न बिभेति कुतश्चनेति ।‘ (ब्रह्मवल्ली) | सर्वाधिष्ठान, अनंतानंत आनंदरूप आपणच एक आहों या स्वरुपानुभवानें ब्रह्मरूप ज्ञानी कोठेहि भीत नाहीं. निद्रा कमी करण्यास अधिक श्रम न करणे व वर सांगितला तसा लघु आहार घेणें उपयोगी पडतात. दुसरा उपाय म्हणजे तत्त्वचिंतन. राहूमुळे जसे ग्रहण त्याप्रमाणेच निद्रेमुळेहि आत्मप्रकाशाला आणि जाणिवेला एक ग्रहणच लागते. नाभीकडच्या भागाहून काही तरी काळोखा सारखे वर येऊन मुखस्थानांत असलेल्या जाणीवरूप आपल्याला झांकून टाकल्यासारखे वाटते; आणि मग डुकली येते, देह कोलमडून पड़तो. हे एक आवरक तम आहे. तमःसाक्षित्वाच्या स्वयंप्रकाश आनंदघनरूपत्वाच्या अभ्यासानें, चिंतनाने त्या आवरणाचें आच्छादन न होऊं देतां रहाणे हा निद्राजयाचा उपाय आहे.

home-last-sec-img