Literature

जन्माला कारण वासना

बाह्य पदार्थोंशी इंद्रियांचा संयोग घडून निर्माण होणाऱ्या देहसुखाच्या वासनेनें हातून झालेल्या कर्मांना तत्तत्फलरूपी जन्म प्राप्त होत असल्याकारणानें ती वासना असेतोपर्यंत आलेला एक जन्म संपून आणखी असेच एकामागून एक अनेक जन्म प्राप्त करून घेतच राहिले पाहिजे. भिन्न भिन्न सुखाची कल्पना, हीच भिन्न भिन्न सुखाची वासना बनते. त्या त्या भिन्न भिन्न वासनेच्या पूर्तीकरितां त्या त्या कर्मफलप्राप्तीच्या उद्देशानें भिन्न कर्माचरण अपरिहार्य ठरतें. या भिन्न भिन्न कर्माचरणांची भिन्न भिन्न फलेंहि लाभावी लागतात आणि अशाप्रमाणे प्राण्याला भिन्न भिन्न जातींतून व भिन्न भिन्न योनीतून जन्म घ्यावे लागतात. अशा रीतीनेंच पशुपक्ष्यादि अनेक योनी आणि वर्णविभागानें व धर्मविभागानें अनेक मनुष्यांच्या जाती जगांत रूढ झाल्या हें तर्कानेंहि जाणतां येतें. इच्छेविरुद्ध फलांची कर्मे हातून घडली तरी ईश्वरी संकल्पानुसार त्या त्या कर्माचें तें तें फळ निमूटपणें जीवाला अनुभवावयाला लागतेंच, हेंहि विचारानें समजून येतें. स्वइच्छेनें अथवा अनिच्छेनें विस्तवाला शिवल्याबरोबर चटका बसतोच. एवंच जन्ममीमांसेच्या दृष्टीने भिन्न सुखाची कल्पना, नंतर त्याची वासना, त्यानंतर त्या त्या कर्माचा उद्देश, तें तें कर्म, त्याचें तें तें फल आणि त्या फलानुरूप प्राप्त होणाऱ्या भिन्न भिन्न धर्मकर्माच्या भिन्न भिन्न योनी व त्यांतहि त्या त्या योनींतल्या भिन्न भिन्न जाती व पोटजातीतील होणारे विविध जन्म अशा एका पाठीमागून एक लागलेल्या पायऱ्या दिसून येतात. एवंच जन्माला मुख्य कारण वासना म्हणजे पूर्वकाल्पनिक अथवा आनुभाविक भोगसंस्काराने उत्पन्न होत असलेली त्या त्या विषयाची ती इच्छाच हें स्पष्ट होते.

विषयभोगाच्या वासनेने येणारा एक जन्म आणि दुसरा पारमार्थिक वासनेने येणारा असे यांत दोन प्रकार आहेत. मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात या म्हणीप्रमाणे पूर्वजन्माचे संस्कार त्याच्या बाल्यांतच प्रगट होतात  नव्हे गर्भातच प्रगट होतात याला बरीच उदाहरणे आहेत. उत्कट संस्कार गर्भातूनच प्रगट होतात असे झाल्यानंतर जन्माला पूर्वसंस्कार, पूर्ववासना, पूर्व कर्म कारण असतें हैं सिद्ध करण्यास दुसरे प्रमाणच यावयाला नको. डोहाळे गर्भाचे संस्कार दाखवितात, गर्भाची योग्यता दर्शवितात, हे तत्त्व सर्वविदित आहे. पूर्वजन्माच्या वासनेनें पुनर्जन्म होतो असें न झाल्यास गर्भातच वाम देवानें अहं मनुरभव सूर्यश्चेति‘ असा आपला सर्वात्मभाव बोलून प्रगट केला नसता. जडभरताचेहि या बाबतीत एक उदाहरण घेतां येईल. बाह्य ज्ञानवैराग्याचे कपिल मुनी हें एक उदाहरण आहेत.

अशा ओघानें जन्माला कारण विषयवासनाच असे जर आढळून येतें तर ती वासना असेपर्यंत जन्म कसा बरे चुकेल पंचभूतात्मक देह पंचभूतांत विरून गेला तरी आचरलेल्या भिन्न भिन्न कर्मफलाप्रमाणे भिन्न भिन्न सुखाची व त्या सुखाच्या दृष्टीने लाभणाऱ्या भिन्न भिन्न देहाची वासना दुसरा देह धारण करते. वर्षे वापरण्याची वासना असेपर्यंत जुनी वस्त्रें भूमवर टाकून नवीन धारण केली जातात, त्याप्रमाणे देहसुख अनुभविण्याची इच्छा असेपर्यंत जीर्ण देह सोडून नवीन देह धारण केला जातो. पसंत न पडलेली मूर्ति मोडून त्या मातीनेच पुन्हां मनपसंत अशी दुसरी मूर्ति बनविल्याप्रमाणे पसंत न पडलेला देह लीन करून टाकून दुसरा एक देह त्या पंचभूतांनींच बनविला जातो.

home-last-sec-img