Literature

जीवन रहस्य

आजच्या प्रवचनाचा विषय जीवन रहस्य किंवा जीवनाचे ध्येय हा असून तो अत्यंत गहन व विस्तृत असाच आहे. *”सर्वे पदं हस्तिपदे निमग्नम”* किंवा *”शते पंचाशत”* या न्यायाने आजच्या विषयांत आपण जगणार कसे याचा सांगोपांग विचार असून जीवन सारसर्वस्व, जीवनाचे ध्येय, जीवनाची सार्थकता व जीवनांत करावी लागणारी मुख्य कर्तव्ये, आपल्या उन्नतीसाठी असलेली विविध साधनें हे सर्व विषय आजच्या ह्या विषयांत अंतर्भुत आहेत.

आपण आपल्या भोवताली असलेल्या विश्वाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास आपणास काय दिसेल ? न संपणारे गोंधळच गोंधळ. सर्व प्राणिमात्र नेहमीच काम करतांना दिसतात. अव्याहत त्या कामात मग्न झालेले दिसतात कोणालाहि क्षणाची विश्रांति नाही; श्रमाला मर्यादा नाही; जीवनकलह ‘चालू असून कोणासहि शांति वा समाधान नाही; एकसारखें कामच काम ; धावपळ चालू आहे; हे सर्व कशाकरिता चालले आहे ? याचे मर्म काय? याचे मुख्य कारण काय? असा जर विचार केला तर त्याचे उत्तर ‘जगणे’ हेच आहे. कारण भिकारी सुद्धा भिक्षा वगैरे मागतात तें जगण्यासाठीच राजेरजवाडयांच्या आज्ञासुद्धा जीवनासाठीच असतात. चोरहि जगण्यासाठीच चोरी करीत असतो. निरनिराळे पक्ष, निरनिराळ्या समाजाची निर्मिति, स्पर्धा वगैरे सुद्धा जीवनासाठीच. इतकेच काय पण धार्मिक किंवा अवतारी पुरुषांची कर्मेही जीवनासाठीच असतात. आपल्या सभोवार असलेल्या लोकांसाठी कर्मे करीत असता अवतारी पुरुष आपलाहि मार्ग चोखंदळीत असतात. म्हणून जीवन-विचारास भव्य स्वरूप प्राप्त होते हे सिद्ध होते. पण हे जगणे कशासाठी? आपण जगण्यासाठी करीत असलेल्या कर्तव्यापेक्षा त्यात काही वैशिष्टयपूर्ण उद्देश आहे काय? याचा विचार करण्यासाठी आजचा विषय घेतला आहे.

जगण्यासाठीच सर्व जीव आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत असतात असे आपण पाहातो. एखाद्या मनुष्यास “तू चांगल्या रीतीने जगावे म्हणून उत्तम राजोचित अनुकूल असे वातावरण आम्ही तयार करून देवू. परंतु तूं आणखी काही अपेक्षा न बाळगता काहीहि निराळा उद्योग करूं नको.” असें जर सांगितले तर तो त्यास होकार देईल काय? पशु, पक्षी, कृमि, कीटक यांनाहि वरील प्रमाणेच सांगितले तर ते संमति देतील काय? अर्थात् या प्रश्नास “नाही” हेच उत्तर मिळणार. कारण त्यास संमति देणे म्हणजे आत्मवंचनाच आणि ते तर्कदुष्टहि होईल. एखाद्या प्राण्यास किंवा मनुष्यास त्याच्या इच्छेस अनुरूप असे फल न मिळाल्यास त्यास अत्यंतिक नैराश्य येईल, अशा परिस्थितीत त्याला निर्बंधात ठेवल्यास त्यास जीवनाबद्दल अनास्था वाटू लागून जगण्याची इच्छा नाहीशी होईल व त्यास लवकरच मृत्यु प्राप्त होईल, अशी कितीतरी उदाहरणे आपण आपल्या सभोवार पाहिली असतील. अशा घटना आपण सूक्ष्मदृष्टीने पाहिल्या तर पुढील गोष्ट आढळून येईल. जीवनाचा उद्देश केवळ जगणे हा नसून त्यापेक्षाहि महत्त्वाचा असा उद्देश असला पाहिजे. तो कोणता याचा विचार केल्यास जीवनमुक्तीची अभिलाषा हाच तो असला पाहिजे असे आढळून येईल.

प्रत्येकाच्या इच्छा कशा आहेत याचा आपण विचार करूं. *”यःकश्चित् सौख्यहेतोः त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः।”* प्रत्येक प्राणिमात्र आपणांस जगणे आहे हे जाणतो आणि त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व प्रयत्न त्याच्या जवळ आहेत. पण त्यांत त्याला समाधान वाटत नाही. आपणांस निरंतर सुख, निरंतर आनंद मिळावा म्हणून तो सारखी धडपड करीत असतो. एखाद्यावेळी भान राहणार नाही पण सुखाची स्मृति, सुखाची आशा यासाठी चाललेले प्रयत्न आपणास पहावयास मिळतात. मुंगीपासून इंद्रापर्यंत सर्व जीवांना आनंद हवा असेच वाटते. तो आनंद प्राप्त होण्यासाठी आपला जन्म झालेला आहे असेंच श्रुति म्हणते. *”आनंदेन जातानि जीवन्ति”* *”आनन्दं प्रयन्त्यभिसंविशंति”* (तै. उ.) जन्म पावलेले जीव आनंदामुळेच जगतात व शेवटी आनंदातच विलीन होतात. असे असल्यामुळे इहलोकांत जन्म घेणे हे एक आनंदप्राप्तीचे साधन आहे असे उघड ठरते. याच्याच जोडीला नैसर्गिकरीत्या प्राणिमात्रांच्या इच्छा पाहिल्यास त्यांचा अखंड आनंद लाभाचा उद्देश असला पाहिजे असे आढळून येते.

या आनंदप्राप्तीच्या साध्य-सिद्धतेसाठी केली जाणारी कर्मे तितकीच महत्वाची आहेत. कदाचित् त्यामध्ये अधिकारभेद असू शकेल. साधनामध्येहि तारतम्य भाव असू शकेल व वैचित्र्यही असू शकेल. परंतु सगळ्यांचा केंद्रबिंदू एकच हे विसरून चालणार नाही. अनुभवाने संस्कारित झालेले जीव ज्या एकाच केंद्राकडे जात आहेत तो केंद्रबिंदु म्हणजेच अनंत सुख, अखंड आनंद होय.

प्राणीमात्रांत तारतम्य असतेच. मनुष्य व मनुष्येतर प्राणि यामध्ये स्वाभाविकतः मोठाच भेद आहे. मनुष्येतर प्राण्यांत सुखप्राप्तीची साधनें कमी प्रमाणात आढळतात. त्यांच्या परिस्थितीने ती साधने आपल्या ताब्यात ठेवलेली दिसतात. परिस्थितीवर मात करण्याची बुद्धि व शक्ती त्यांना असत नाही म्हणून केवळ इंद्रिय गम्य विषयासाठी धडपड करून मिळालेले अनुभव घेत घेत ते आपली जीवनयात्रा पुरी करतात इंद्रियावर मात करण्याची कला, विज्ञान, विवेक यामुळे मिळणारा आनंद त्यांना मिळू शकत नाही. निजसुख मिळावे अशी इच्छा त्यांनाहि असू शकेल. पण प्राप्तीची योग्यता असू शकत नाही. इंद्रिय विरहित असलेलें सुख-अतींद्रिय सुख साध्य करणे त्यांना अशक्य आहे. इंद्रिय सुख हे काही संपूर्ण किंवा चिरसुख नव्हे.

मनुष्याची जगण्याची तऱ्हा काही औरच आहे. आपल्या जीवनाचा स्तर ज्यायोगें रोजच्या रोज उंचावला जाईल याचा तो प्रयत्न करीत असतो व हेच मानवी जीवनाचे वैशिष्टय आहे. हीन स्थितीतून उन्नत स्थितीकडे जाणे आणि उन्नतावस्थेतच वाढत वाढत जाणे हीच सर्व प्राणिमात्रांत श्रेष्ठ असलेल्या मानवाची दृष्टी असते. इतर प्राणिमात्रापेक्षा मानवांत वैशिष्ट्य असल्यामुळे उन्नत स्थिति प्राप्त करून घेण्यासाठी, स्वत:च्या परिपूर्णतेसाठी व इच्छिलेले अखंड सुख मिळवण्यासाठी तो जन्मापासून सारखे प्रयत्न करीत असतो. आहार विहारांत जीवन संपविणे हा पशुपक्ष्यांचा धर्म-किंवा हीन प्राण्यांचे लक्षण आहे. पण मानव देहाचे वैशिष्टय केवळ देह जगविणे म्हणजेच व्यावहारिक जीवन जगण्यासाठी नाही. त्यापेक्षा काहीतरी जास्त मिळविण्यासाठीच त्याची निर्मिति केली आहे. _शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व आहार, निद्रा, भय, मैथुनादि बाबतीत मनुष्य व मनुष्येतर प्राणि समान आहेत. त्यांचा उपभोग एवढीच मानव देहाची इतिकर्तव्यता नाही. तसेच आपल्या आयुष्याचे एवढेच ध्येय आहे असे मानवाने समजू नये. देहसुखासाठी योग्य अशी साधने प्राप्त करण्याकरिता आयुष्य वाया घालविणे हे मनुष्य जन्माचें साध्य नाही. इंद्रिय, विषय, देह, पदार्थ यापासून मिळणाऱ्या सुखापेक्षांहि महत्वाचे असे निजसुख प्राप्त करून घेणे हे मनुष्याचे मुख्य ध्येय होय व त्या ध्येयासाठी प्रयत्न करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य होय.

जे विवेकी जन जितेंद्रिय होऊन ध्येयाकडे वाटचाल करीत पुढे पुढे जात असतात त्यांनाच चिरशांति मिळू शकते. बाल्यावस्थेपासूनच या श्रेष्ठ ध्येयाकडे वाटचाल सुरू केली पाहिजे व तें मिळण्यासाठी अव्याहत श्रम केले पाहिजेत. असे केल्याने त्याचे जीवन उन्नत होऊ शकेल. ध्येयाच्या शुद्धतेवरच यश अवलंबून असते व शुद्धध्येयवादीच आत्मोद्धारास योग्य असून तो सभोवतालच्या जगाचाहि उद्धार करू शकतो. अशा मनुष्यास वैषयिक सुख हे क्षुद्रसुख वाटत असते. हास्यास्पद अशा जीवनातून मुक्त झालेला मनुष्य पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या सिंहासारखें उदात्त जीवन जगू शकतो व तो शास्त्र, धर्म व संस्कृति यांना उजाळा देऊन चिरसुखासाठी प्रयत्नशील असतो. जे सुख तापत्रयाने किंवा विषयलालसेनें मलीन किंवा कमी होत नाही, निसर्गबंधनाच्या योगे संकुचित होत नाहीं असें पवित्र विशाल सुख हेच त्याचे मुख्य लक्ष्य असते. अशा पराकोटीच्या शाश्वत सुखासाठी (Maximum Happiness) मानवाने प्रयत्नशील असले पाहिजे तेंच मानवजन्मास योग्य असून तेच त्याचे ध्येय असले पाहिजे.

त्यामुळे इहलोकी मानवाची योग्यता वाढून उत्कृष्ट साधनांनी पुढे पुढे जावून तो प्रभावी पुरुष होईल. अशा मनुष्याच्या योग्यतेचे वर्णन सर्व शास्त्रांनी उत्तम रीतीने केलेले आहे. *”पृथ्वी तस्य प्रभावात् वहति दिनमिशं यौवने योगि शांत ।”* यौवनातच शांत झालेला योगी दिव्य पदाप्रत पोहोचतो व त्याची महिमा अवर्णनीय आहे. त्याच्या प्रभावाने जग चालू शकते. त्याच्या योगे जगाचा उद्धार होईल असे श्रुतिवचन आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ पुरुष प्रथम अध्यात्मिक उन्नति करून घेऊन आपणांवर येणाऱ्या आपत्तीचे आपल्या सामर्थ्याने निराकरण करीत असतात. शांत चित्ताने, उज्वल विवेकाने वैषयिक जीवनाचा तिरस्कार करून या जन्मातील अत्यंत महत्वाचा लाभ म्हणजेच परमात्म्याचा अनुभव निर्धाराने प्राप्त करून घेतात आणि त्यायोगें प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीनें, उत्तम शक्तीने जगताचा उद्धार करू शकतात. जन्मलेल्यास मृत्यु व मृत झालेल्यास पुनः जन्म हे ठरलेलेच आहे. पण अशा जन्ममृत्यूस काय किंमत आहे ? आत्मानुभव मिळवून परमात्मपद प्राप्त करून घेणाऱ्याच्याच जीवनाचे सार्थक होते. असे लोकच आपल्या कुलाचा व आपल्या सभोवार असणाऱ्या जगताचा उद्धार करू शकतील, *”कुलं पवित्रं जननी कृतार्था | वसुंधरा पुण्यवती च येन ।। अपारसंवित्सुखसागरेऽस्मिन् । लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः ।।”* ज्यांचे मन अपार ज्ञानमय सुखसागरांत मग्न झालेले आहे त्यांचेच कुल पवित्र होय. त्यांच्या जन्मदात्या आईस मातृत्वाचे सत्फल मिळून ती कृतार्थ होईल. त्याच्या भ्रमणामुळे भूमीहि पुण्यमय होईल. अध्यात्म ज्ञानाने प्राप्त झालेल्या आत्मसुखरूपी समुद्रात मन रममाण होऊन त्यांत पूर्णपणे तन्मयता प्राप्त होईल हे सोडून पशूंना स्वाभाविकतःच असलेल्या आहार निद्रादीमध्ये रममाण होणे म्हणजे पशुतुल्य जीवनच होय. मानव देहाचे भूषण व ध्येय असणारें निजसुखाचे साधन म्हणजेच अध्यात्मज्ञान होय.

मानव जन्म हा उत्तम जन्म आहे. नुसत्या इच्छेने किंवा मोबदल्यात मिळणारा असा हा जन्म नाही. कर्मप्रवाहात तरंगत जन्ममृत्यूच्या चक्रातून जात असतां कोणत्या तरी पुण्यफलामुळे प्राप्त होत असतो. स्वर्ग, नरक, बंध, मोक्ष यांना जाण्याचे मार्ग मानवजन्मामधूनच आहेत. या जन्मामध्ये काय करावयाचे हे ठरवून मृत्यूनंतर सुद्धा अनंत काल अस्तित्वात असलेल्यास काय अभिप्रेत आहे याचा विचार करणे हे एक उच्च कर्तव्य आहे. हा निर्णय घेण्यासाठी अनुरूप अशी साधनंहि मानव जन्मातच मिळू शकतात. यात थोडीहि चूक झाली तर पुढे कोणता जन्म प्राप्त होईल हे सांगणे कठीण आहे. पशुजन्म मिळाल्यास हा विचार व त्याचे साधन ही दोन्हीहि मिळणार नाहीत. पुढे मिळणाऱ्या नरजन्मापर्यंत वाट पाहू म्हटले तर तेहि आपल्या हाती नाही. कारण विषयवासना व तिच्यामुळे केली जाणारी कर्मे याच्यापासून कोणकोणते नवीन जन्म मिळतील हे सांगणे कठीणच. कर्मवश झालेल्या माणसाला त्या त्या भोगांमध्ये अडकावेच लागते. असे असल्यामुळे विषयवासनेने बद्ध होऊन या जन्मी मिळालेली सुवर्णसंधि घालविणे ही आत्मवंचनाच होय. नरजन्म हा भगवद्स्वरूप प्राप्तीसाठी मिळालेले मुख्य साधन आहे. त्या साधनानेंच भगवद्स्वरूप प्राप्त होणे शक्य आहे यासंबंधी कठोपनिषदांत *”इह चेदवेदीदथ सत्यमस्ति न चेदि हावेदीन्महती विनष्टिः।”* असे म्हटले आहे. या जन्मी विवेकी होऊन मानव सत्यसुखरूप होऊ शकतो. हे न उमजल्यास तो मोठया गर्तेत पडण्याची शक्यता आहे असें भगवद्गीतेत म्हटले आहे *”मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालवमशाश्वत । नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः।।”* जन्म म्हणजेच दुःख, अशाश्वतता आहे. योग्य साधनांनी पूर्णसिद्धी प्राप्त झालेले महात्मे माझ्याकडे येतात. अशा लोकांना पुनः जन्म नाहींच परमात्म प्राप्तीसाठी मिळालेल्या जन्माचे योग्य साधनांनी सार्थक न करितां विषयांत मग्न होणारे पापी लोकच होत. अशा मूर्ख, अधम लोकांना निजमुख मिळणार नाही असे परमात्म्याने सांगितले आहे. *”न माम् दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः।”*

मानवी जीवनाची सार्थकता सिध्द करण्याच्या कार्यामध्ये मनालाहि एक महत्वाचे स्थान आहे. मनुष्यजन्मप्राप्तीसाठी मन ही एक अमोल चीज आहे. जगव्यवहारात तें एक साधन आहे. मानवास प्राप्त होणाऱ्या अनेक शक्तींचे उगमस्थान मनच. कोणत्याहि कार्यसिध्दीसाठी मन अत्यंत खंबीर असावे लागते. हे मन ज्या विषयाचे चिंतन करील तोच आपणास प्राप्त होणार. मन ज्याचें ध्यान करील तत्स्वरूपी आपण होतो. *”यश्चित्त: तन्मयो भवति”* विषयामध्ये आसक्ति ठेवून त्यांचेच चिंतन केले तर मन त्यांत मग्न होऊन जडमूढ होईल. त्यांतील क्षणभंगुरता, दुःख असे दोष आपणांतच आहेत असा भास होईल. असे होण्याने आपला स्वतःचा खरा अधिकार मानव गमावून बसेल.

विषय लवकर नष्ट होणारे म्हणजेच क्षणभंगुर आहेत. कधी दिसतील, कधी त्यांचा भास होईल तर कधी मुग्ध करतील. त्यामुळे विवेकभ्रष्ट होऊन मानव त्या विषयांतच गुरफटून जाण्याची शक्यता असते. परंतु विषय मात्र त्याच्या स्वाधीन असत नाहीत, कारण त्यांना कशाचीहि पर्वा नसते. निसर्गप्रवाहात सांपडून ते वाटेल तिकडे जात असतात. त्यांच्यांत मग्न झालेला मानव मात्र त्यांच्या मागे धावत असतो व त्यामुळे तो अधिक दुःखी होतो. आशा भंग झाल्यावर रडकुंडीस येतो. अशा रितीने दुःखामध्ये तो बुडून जातो. अशा या दुःखदायी विषयाच्या मागे लागण्यात अर्थ काय? इंद्रियाधीन झाल्या मनुष्यास विषयात सुखाभास होतो. त्या भासाची कल्पना विषयांना नाही. सुखमय परमात्म्याने आपल्या अल्पांशापासून हे जग निर्मिले आहे व जगाचा अत्यल्पांश म्हणजे विषय होत. या विषयांत होणारा सुखाभास हाहि मूळ परमात्म्यामुळेच होतो. विषयांतील सुखाभास हृदयंगम वाटतो तर परमात्म्याची सुखमयता किती आनंददायी असेल? आपला विवेक परमात्म्याच्या दिशेनेंच असावा. विषयाच्या जाळयांत गुरफटलेल्या मला त्यामधून काढून घेऊन परमात्म्याकडे वळविणे योग्य होय. विवेक ज्या सुखाकडे वळेल तिकडेच मन धांवत असते. असे असल्यामुळे सुखासाठी विवेकी मनुष्य मूळ सुखधामाकडे का जावू नये? सावलीप्रमाणे असणारे अल्पविषयसुख मिळविण्याची मानव जीवनास धन्यता नाही. त्याने कोणतीच तृप्ति मिळत नाही. इतकेच नव्हे तर विषयाधीनता, अल्पता,परिवर्तनशीलता, विनाश, अशा निरनिराळ्या दोषांनी अतृप्ति व अधन्यता वाढून मन विषण्ण होते. मानव जीवनाचे ध्येय अल्पसुख नव्हें. अनंत सुख हेच ध्येय आहे. विषयांपासून अपार दुःख अल्प सुखप्राती होणार. आपले ध्येय अनंत सुख मिळविण्याचे आहे. विषयसुखाच्या अनुभवाने विषयतृष्णा वाढतात. त्यायोगें जीवनध्येय साध्य होऊ शकत नाही. विषयामुळे जन्म-मरण-प्राप्ती होत असते. मृत्यु प्रिय असलेल्या विषयांत मन गुंतवून त्यासाठी प्रयत्नशील असणे हे मानव जीवनाचे ध्येय नसून ती ध्येयाविरुद्ध अशीच वर्तणूक आहे. अशा या विषयाच्या मोहात न पडतां परमात्मप्राप्तीसाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असले पाहिजे. मानवामध्ये जन्मत:च विवेक असतो. मानवाप्रमाणेच तो वाढत असतो. मात्र या विवेकावर अज्ञानाचे एक पटल असते. त्याकारणाने इतके दिवस तो विषयांकडे धाव घेण्याचे श्रम करीत असतो. निरनिराळ्या जन्मांत गुरफटतो आणि इकडे तिकडे धाव घेत इतस्तत: फिरत असतो. आतापावेतों झालेल्या गोष्टी विसरून झालेल्या अनर्थाचा हिशोब न करता अनर्थ परंपरेतून बाहेर पडणे हे जागृत मनुष्याचे लक्षण होय. आतातरी विवेकावरील अज्ञान पटल दूर करून परमात्मा म्हणजे परम सुख हे हेरून त्यासाठीच प्रयत्न करावे. त्यांची दृढ इच्छा मनांत धरून त्यांच्या प्राप्तीसाठी एकसारखे प्रयत्न केल्यास मनांत बसलेली विषयाची ओढ़ आपोआप नष्ट होईल. मन शुद्ध होऊन तो परम सुखानुभवास योग्य होईल. मानवालाच मन:शुद्धि साधणे शक्य आहे. म्हणूनच मानव जीवनाचे ध्येय जे परमात्मपद मिळविणे ते त्यास शक्य आहे. जगतांत सर्वत्र उद्योगाचा, कर्मांचा सुळसुळाट दिसतो. कोणाकडेहि पाहिले तर तो कार्यतत्पर आहे असेच आढळते. हे कशाकरिता असा प्रश्न केल्यास निरनिराळया कार्याचे निरनिराळे उद्देश ऐकावयास मिळतील. सर्वांची कामें उद्योगरूपाने निरनिराळी आढळतील. त्यांचे उद्देशहि निरनिराळे असतील. एकंदर विचार करता दोनच उद्देश संभवतात. एक सुखाची प्राप्ति व दुसरा दुःख निवृत्ति. *”यः कश्चित् सौख्यहेतोः त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः ।”* सर्व कामांचा, उद्योगांचा उद्देश सुखप्राप्तीच, दुःखप्राप्तीसाठी कोणी काहीहि करीत नाही. दुःखनिवृत्तिसाठीच प्रयत्न करीत असतो. दुःख झाल्याने रडतो ते सुखप्राप्तीसाठी व दुःख निवृत्तिसाठी. कारण दुःखसमयीं रडल्याखेरीज समाधान मिळतच नाही. हे आपल्या निरनिराळया कर्मांतून दृग्गोचर होते. पण निजसुख कोणते ? त्याचे स्वरूप काय ? हे जाणून घेऊन त्याची प्राप्ति करून घेणे याकरिता उद्योगाची दिशा बदलून त्याप्रमाणे प्रयत्न करणे हे विवेकी मनुष्याचे कर्तव्य होय. जे सुख प्राप्त करून घेण्यास मन प्रसंगवशात् उद्दीप्त होतें तें निजसुख नव्हे. विषयसुखांत निजसुखाची कोणतीहि लक्षणे आढळत नाहीत. कारण विषयसुख हे दुःखकारकच. आधी विषयसुखासाठी धडपडतो व तें प्राप्त झाल्यावर कष्ट होऊन तो सुखाभास लवकर नष्टहि होतो. सर्व बाजूनी दुःखप्रद अशा भ्रमात्मक सुखाचा नाश करण्यासाठी विवेकाकडेच धांव घ्यावी लागेल. अशा प्रकारे विवेकवश होऊन मनुष्याने निजसुखाकडे दृष्टी ठेवल्यास श्रुतिसुद्धा मार्गदर्शन करतील. *”यो वै भूमा तत्सुखम्”* जे सर्वापेक्षा श्रेष्ठ, बंधनरहित असे आहे ते निजसुख होय. संकुचित व देशकालाची बंधने असलेली वस्तु सुखप्रद नाही. *”यत्र नान्यत् पश्यति नान्यच्छृणोति नान्यद्विजानाति स भूमा। यत्रान्यत् पश्यति अन्यत् शृणोति अन्यद्विजानाति तदल्यं ॥”* सुखांत दुसरा कोणताहि पर्याय असू शकत नाही. सुख म्हणजे सुखच. ज्यांत द्वैत नाही, तेच परिपूर्ण सुख होय. दृश्यसुख हे अल्पसुख होय. असें श्रुतीचे म्हणणे आहे.

ज्यांत वेगळेपणा आहे ते निजसुख नव्हे, ते विषयसुखच होय. त्याच्या प्राप्तीसाठी मनास निरनिराळे विचार करावे लागतात. विचारानुरूप प्रयत्न व कर्मेहि निरनिराळी करावी लागतात. कर्माचा परिणाम निरनिराळया मनोवासनेत होतो. एकूण त्यामुळे मनुष्यमात्र निजसुखापासून दूरवर जातो. म्हणून विषयसुख म्हणजे मानवाच्या प्रगतीला किंवा ध्येयाला अडथळाच आहे. हा अडथळा दूर करण्याची शक्ति मनुष्यांत नाही काय? ज्या नरजन्मांत स्वेच्छापूर्वक विवेक व संयम करता येतो त्या जन्मांत विषयरूपी पिंजरा नष्ट करण्याची शक्ति आहेच आहे. परंतु काही दिवस त्याच्या जीवनांत विवेक सुप्त असतो. त्याला सावधानतेने जागृत केले पाहिजे. विवेक आणि संयम यांनी विषयसुखबीज नष्ट करून निजसुखासाठी प्रयत्न करून प्रगति करणे हे मनुष्यत्वाचे मुख्य लक्षण होय. अपवित्र वासनांचे निर्मूलन झाल्याशिवाय परमात्म्याचे म्हणजे दिव्य प्रकाशाचे दर्शन होणार नाही. परमात्मा आपल्या अनंत अशा सुखरूपाने उपमारहित असल्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे मनुष्याचे महत्वपूर्ण कर्तव्य होय. दृश्य पण नष्ट होणारें, अपरिमित दुःखदायी अशा विषयसुखाचा संबंध सोडून मन परमात्म्याकडे वळवणे हीच जीविताची धन्यता होय. जीविताचे सारसर्वस्व होय आणि तेच आपल्या जीविताचे ध्येय होय. तें साधल्यानेच आपली कर्तव्यकर्मे संपुष्टांत येतात.
*”भोजनान्ते, स्मशानान्ते, मैथुनान्ते च या मतिः ।
सा सर्वदा यदि भवेत् को न मुच्येत बन्धनात् ॥”*
विषयसुखाचा उपभोग घेतल्यानंतर दुःखप्राप्तीच होत असल्यामुळे ते सोडून निजसुख प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हा उत्तम मार्ग होय. बाह्य जड पदार्थाच्या योगें प्राप्त होणाऱ्या सामान्य सुखासाठी आपल्या जीविताचें सारसर्वस्व असलेले जें निजसुख ते घालविणे योग्य होणार नाही. क्षणभंगुर सुखाकरिता जीविताचा नाश करणे अयोग्यच. अल्प सुखाने आपण कृतकृत्य कसे होणार? म्हणून आपणांस मिळालेली योग्यता, अधिकार यांना अनुसरून विवेकी बनून निजसुखप्राप्तीसाठी धडपड करून आपण त्याचाच ध्यास घेतला पाहिजे. यामुळे आपणांस धन्यता प्राप्त करून देणारे ध्येय म्हणजेच अनंत परमात्मसुखाची प्राप्ती होईल.

या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करणारी माणसे सुद्धा विषयांत गुरफटलेली आढळतात. त्याचे खरे कारण म्हणजे त्यांच्या ठायी असलेला सुखपरीक्षेचा, विवेकाचा व संयमाचा अभाव हेच आहे. म्हणूनच *”पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवाः । न पापफलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः ।।”* असें एक सुभाषित आहे. सर्वांना पुण्यफलरूपी सुख पाहिजे आहे. पण पुण्य मात्र ते करू इच्छित नाहीत. पापच करीत असतात. पण त्या पापामुळे मिळणारे दुःख त्यांना नको असते. विषय सुखासाठी धडपडणारा मानव म्हातारपण किंवा मरण हे चुकवू शकत नाही. या दोन्ही गोष्टी अत्यंत दुःखप्रद आहेत. विवेकी मनुष्याने विषयसुखाचा संपर्कहि नसलेला मार्ग चोखाळला पाहिजे. तो मार्ग म्हणजेच परमात्मपद प्राप्ति. परमात्मपदप्राप्ती झालेल्यांना पुनर्जन्म’ नाही. *”न स पुनरावर्तते न स पुनरावर्तते”* असें श्रुतींनी आश्वासन दिले आहे. जन्म नाही म्हणजे म्हातारपण व मरणहि नाही. म्हणून जन्ममरणापासून मुक्त करणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.

मृत्यु लोकांत प्राप्त झालेला मानवजन्म हा ऐहिक सुखासाठी किंवा विषयसुखासाठी नाही. हे जीवन म्हणजे संकटकालच. यांत सुख नाहींच. यांतील मार्गहि मनुष्यास चकविणाराच आहे. येथील ऐहिक सुखाचे सर्व प्रयत्न मुख्य ध्येयाच्या विरुद्ध आहेत. आपल्या हितासाठीच असे समजून केली जाणारी कर्तव्ये मूर्खपणाचीच आहेत. याकरिता आपण जागृत राहून त्या चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमात्मा सुखरुपी नसता तर सुखाची वासनाच निर्माण झाली नसती. पण तो सुखरूपी असल्याने त्याच्या अल्पांशरूपी अशा या जगांत सुखाची छाया तरी दिसते. नित्यसुखाची संपूर्ण कल्पना आपणांस आल्यास क्षुद्र विषयांचा त्याग करणे सोपे होईल. विषयापासून मुक्त होणे हेच आपले जीवन ध्येय.

वर्णाश्रम धर्मानेंच वागण्याचा प्रयत्न करा. जीवनावश्यक व्यवहार करून परमार्थासाठी झटा. जिवंत राहण्यासाठीच आहार आहे. पण आहाराकरितां जगावयाचे नाही. आपले सर्व व्यवहार परमार्थासाठीच असून निव्वळ जगण्यासाठी नाहीत. आपलें जगणे निव्वळ व्यवहाराकरितां नसून निजसुखप्राप्तीसाठी आहे. तें मिळवावयाचे म्हणजे विषयसुखाचा त्याग आलाच. अनेक जन्माच्या संस्कारामुळे ते एकदम जमणे शक्य नाही. क्रमाक्रमानें तें साध्य फरता येईल. परमात्म्याचे ठिकाणी निस्सीम अकृत्रिम प्रेमरूप भक्ति केल्याने, कृच्छ चांद्रायणादि प्रायश्चित्त घेतल्याने आणि विवेक वैराग्याने त्या विषयसुखाचा त्याग करणे शक्य आहे. भावनेने भासणारे विषयसुख ती भावना संपतांच नष्ट होते. परमात्म्याच्या दिव्य भावनेने विषयसुखभावनेचा नाश करून विषयसुखाचा त्याग करणे सुलभ आहे.

आतां जो अत्यंत विषयासक्त आहे त्याला परमात्म सुखाची भावना उत्पन्न होणे शक्य आहे काय ? हा प्रश्न पुढे येतो व तो अगदीं साहजिकच आहे अशांना परमात्मभावना उत्पन्न होणे कठीणच. कारण त्यांचे अंतःकरण परवश झालेले असते. त्यांच्यासाठी श्रुतींनी निरनिराळ्या प्रार्थना सांगितल्या आहेत. *”भद्रं नो अपिवातय मनः”* माझं मन मांगल्याकडेच ने. *”तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु”* माझें मन मांगल्याचा संकल्प करण्यायोग्य होवो. *”तं ह देवमात्म बुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये”* देहांतील आपुलकीची भावना नाहीशी करून आत्मबुद्धीचा प्रकाश करणाऱ्या परमात्म्यास, मुमुक्षु असलेला मी कधीहि विसरणार नाही. अशा अनन्य वृत्तींनी काहींनी प्रार्थना केल्याचे आढळते. *”शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ।”* ही अर्जुनाने केलेली प्रार्थना गीताभक्तांना माहित आहेच. अशा रीतीनें परमात्म्याची मनःपूर्वक प्रार्थना करणे म्हणजेच परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त करून घेणे होय. आपणांस असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी समर्थांच्या सहाय्याची आवश्यकता न्याय्यच आहे. श्रीकृष्ण भगवान सर्वसमर्थच होते. त्यांनी घालून दिलेल्या नियमाने संपूर्ण जग चालतें. *“भूतस्य जातः पतिरेक आसीत् ।”* सर्व सजीवांचा व देवतांचा तोच मुख्य होय. त्याचे अंशरूपी असलेले हे जग त्यांतच विलीन होणार आहे. या क्षणभंगुर जगांतील अविनाशी अशा परमात्म्यास शरण जाण्याची बुद्धी असणे हीच योग्य दृष्टी होय. *” समं हि सर्वभृतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्। विनश्यत्स्वविनश्यं तं यः पश्यति स पश्यति ॥” “समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ।।”*

परमात्म विषयी दृष्टी ठेवून जगणारे जे लोक आहेत त्यांना या जगतांतील विषयांचे भय असत नाही. या विरुद्ध वागणारे लोक आत्महिंसकच होत म्हणून *”उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैवद्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ।।”* आपण आत्मघात करून न घेता आपला उद्धार करून घेतला पाहिजे. आपणच आपलें बांधव किंवा शत्रु आहोत; असें परमात्म्याने भगवद् गीतेत सांगितले आहे.

आपला उद्धार म्हणजेच विषयवासनेचा त्याग. यासाठी दोन आश्रमांचा उपयोग होतो. पहिला गृहस्थाश्रम व दुसरा संन्यासाश्रम. सूक्ष्म निरीक्षणांनी व विचारांनी भोगांचा अनुभव घेऊन ते दुःखमय व निरुपयोगी आहेत, असे समजून उमजून परमात्म्याकडे वळणे व त्याची प्राप्ती करून घेणे यासाठीच गृहस्थाश्रम आहे. शुद्ध विवेकानें विषयांत सुख नाही हे समजून घेऊन, त्याचा संपर्कहि होणार नाही अशी काळजी घेऊन, परमात्मसुखास्वरूप ओळखून घेणे हे संन्यासाश्रमाचे कर्तव्य होय. विटाळ करून घेऊन स्नान करण्यापेक्षा विटाळच होणार नाही ही दक्षता घेणे हा बालसंन्यासमार्ग होय. अशा रीतीने भोगाने (गृहस्थाश्रमाने) व त्यागाने (संन्यासाश्रमाने) परमात्मप्राप्ती काय आहे असे शास्त्रवचन आहे. गृहस्थाश्रमात अनुभवाने मन शुद्ध करणे हा शास्त्रांचा उद्देश आहे. केवळ विषयसुखासाठी गृहस्थाश्रम नाही. विषयसुखांतील दोष ओळखून त्यांचा त्याग करणे हा याचा गभितार्थ आहे. *”ऋणत्रयमुपाकृत्य मनो मोक्षे निवेशयेत् ।”* हा प्रवृत्तिधर्म असला तरी पुढे निवृत्ती मार्गाकडे वळण्याची दृष्टी ठेऊनच हे सांगितले आहे. धर्म केवळ विषयसुखासाठी आहेत हा समज चुकीचा आहे. कारण वैषयिक दृष्टी सर्वांनाच असल्याने त्याकरितां धर्मरूपी पाठशाळेची गरज नाही; तसेच प्रयत्न व योजनेचीहि आवश्यकता नाही. धर्माने अर्थ व काम प्राप्त होतात. *”धर्मादर्थश्च कामश्च ।”* असे शास्त्रवचन असले तरी ते योग्य आहे. परंतु धर्ममूल असलेले अर्थ व काम यांचा उपयोग संयम सदबुद्धि यांनी करून तो परमेश्वरी प्रसाद आहे अशी भावना ठेवून दूषित विषयांचा त्याग करावा. एकंदरीत धर्मामुळे प्राप्त होणारे अर्थ व काम हे त्यागाचा अभ्यास करवून त्यास परमेश्वर प्राप्तीकडेच वळवितात. *”ज्योतिष्टोमेन स्वर्गकामो यजेत।”* स्वर्ग इच्छिणाऱ्या मनुष्याने ज्योतिष्टोम यज्ञ करावा, असे श्रुतींनी सांगितले आहे. या श्रुतींचे महत्व किती आहे हे पहा. ‘तु देह्याच्या मरणाने मरणार नसून तुला स्वर्गप्राप्ति होईल. म्हणजेच तू अविनाशी आहेस. अविनाशी मनुष्यास जगांतील विनाशकारी सुखांची काय परवा असणार? विनाशकारी सुखाच्या खुळाचा त्याग करून नित्यानंद सुखासाठी प्रयत्न कर; असाच त्या श्रुतिवचनाचा गर्भितार्थ आहे. स्वधर्माचरणाने चित्तशुद्धि होऊन वैराग्य प्राप्त होते. हे पुष्कळशा वचनांमधून सांगितले गेले आहे. *”धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा।”* *”सना आतनोतीति सनातनः।”* सनातन धर्म संपूर्ण विश्वाचे जीवन होय. इतकेच नव्हे पण तो जीवनाचा आधार आहे. सत्यसुखाची दृष्टी संपूर्ण जगतात पसरवून जगदोद्धार करणारा आहे. हे पहा सनातन धर्माच्या ईश्वरप्रार्थनेचे उदात्त स्वरूप. *”असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।।”* मिथ्याचा नाश करून सत्याची प्राप्ती करवून दे, अंध:काराचा नाश करून स्वयंप्रकाश दे व मृत्यूपासून सोडवून मला आत्मस्वरूपांत विलीन कर, हीच ती सनातन धर्माची प्रार्थना आहे.

हा नरदेह कितीहि चांगला असला तरी हे एक साधनरूप असल्याने आपणांस येणाऱ्या अनुभवांचे निरीक्षण केल्यास किंवा या देहाचे परिशीलन केल्यास या देहाचा शेवट नरकांतच आहे असे आढळून येते. या नरकांतून मुक्ति प्राप्त करून घेणे हेच मानव जन्माचें सार्थक. या विमोचनासाठी एकच एक उपाय म्हणजे मनास विषयांपासून निवृत्त करणे हा आहे. *”यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरीघ्यते । अतो निर्विषयं नित्यं मनःकार्य मुमुक्षुणा।।”* मन सदासर्वदा निर्विषयीं राखणे हेच मुमुक्षूचे कर्तव्य होय. विषयकल्पनारहित मनच मोक्षप्राप्तीस अनुकूल असते. बाकी इतर साधने म्हणजे याग, त्याग वगैरेसुद्धा मनाच्या विषयवासनाच. विषयकल्पना काढून टाकून मन निराकार करण्यासाठी योग, यागादींचा उपयोग होतो.

मनुष्यास अज्ञानाने भ्रम उत्पन्न झाल्यामुळे विषयसुखच आपल्या जीवनाचा आधार आहे असे वाटते. विवेक ज्या प्रमाणांत वृद्धिंगत होईल. त्या प्रमाणांत विषयसुखवासना कमी कमी होणे शक्य आहे. पण विवेकरूपी झरा सांपडण्यापूर्वीच जर मानव पतित झाला तर त्याला कोणाचा आधार मिळणार ? या प्रश्नाचे उत्तर “धर्म” हेच आहे. पूर्ण विवेकी बनण्यासाठी धर्मप्रवचनांची आवश्यकता आहे. जे कोणाचा मत्सर करीत नाहीत, ज्यांना लेशमात्रहि विषयेच्छा नाही, ज्यांच्या हृदयांत रागद्वेषाचा संपर्कहि नाही, अशा मनुष्यांना परमात्मसुख मिळू शकेल. ज्यांना परमात्मसुखप्राप्त झाले आहे त्यांच्याकडून धर्माचे यथार्थ स्वरूप तुम्हांस कळू शकेल आणि सनातन धर्मदृष्टीचा म्हणजेच सत्यदृष्टीचा विकास होऊ शकेल. अविनाशी अशा सत्याला योग्य असा मार्ग सनातन धर्मात सांगितला आहे. या धर्माचा आश्रय घेऊन क्षणोक्षणी परमात्म्याच्या ध्यानात मग्न होणे हे आपले जीवन रहस्य होय.

आज आपल्या देशांत परकीय संस्कृतीचा उदोउदो चालला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या भपक्याने भुललेली मनुष्ये ती संस्कृति जास्त चांगली आहे, असे समजून बिनदिक्कतपणे तिचा पुरस्कार करीत असलेली आढळतात. हल्लीचे राजकीय वातावरण, शिक्षण पद्धति ही या गोष्टीस प्रोत्साहन देत आहेत असे दिसून येते. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सनातन धर्माने निर्मल असे विश्वबंधुत्व, स्थिर अशी जनशांतता प्राप्त होत असल्याने त्याकडे चिकित्सक दृष्टीने पहाणारा सुशिक्षितवर्ग निराळाच. सनातन धर्माचा नि:पक्षपातीपणे अभ्यास न करता उगीचच वाचाळपंचविशी करणारा वर्ग आज मोठ्या प्रमाणांत आढळून येत आहे. अशा अवस्थेत सनातन धर्म शिल्लक राहील किंवा नाही हा एकच प्रश्न आहे. तथापि निराश होण्याचे कारण नाही. कारण सनातन धर्म स्वयंप्रकाशी आहे. जगातील सर्व कोलाहल नष्ट करून सर्व मानवांना सनातन धर्मास शरण जावे लागेल. या आधीच मॅक्समुल्लर, शॉपनहेर, आदि पाश्चिमात्य विद्वानांनी या धर्मास मंगल गीतें गाईली आहेत. या जगात दिसणाऱ्या पण नष्ट होणाऱ्या सर्व ऐश्वर्यास कंटाळून किती तरी पाश्चात्य विद्वान सनातन धर्माकडे वळलेले आढळतात. उत्तरीय प्रांतात तर भगवी वस्त्र धारण केलेली कितीतरी पाश्चात्य माणसें मी पाहिलेली आहेत. सनातन धर्माचे सार जाणून मोक्ष मिळविण्यासाठी जन्म आणि संस्कृति ही आडवी येत असतील तर पुढील जन्मी भारतांत जन्म घेऊन भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या सनातन धर्माचे सार जाणण्याचा निर्धार केलेलेहि पाश्चात्य आढळतात. आपल्या देशांत पाश्चात्य शिक्षण घेतलेले अनेक लोक सनातन धर्मास अनन्यभावाने शरण आलेले आढळतात असें असल्यामुळे सनातनधर्म धुळीने भरलेल्या दैदिप्यमान रत्नासारखाच आहे यात संदेह नाही. अर्थात हे काही लोकांनाच समजणे शक्य आहे. परंतु एवढयाने भागणार नाही. सर्वच जनता या धमाकडे आकृष्ट झाली पाहिजे. सनातन धर्म मानवाच्या उत्कृष्ट जीवनाच्या कोणत्याहि अंशास कमी लेखत नाही. इतकेच काय पण मनुष्य कुलाला हितकर अशा सर्व शास्त्राचे अत्युत्तम सार त्यांत सामावले आहे. इहपरलोक मिळवून देणारा, शेवटी निरवधि सुखाये ध्येय पुढे ठेवणारा व सर्व जनतेस त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे योग्य लाभ देणारा सर्व वाहकता असलेला धर्म म्हणजेच श्रेष्ठ सनातन धर्म होय. ऐतिहासिक दृष्टया अवलोकन केल्यास जगांतील सर्व धर्म या सनातन धर्मापासून झालेले आहेत किंवा त्याचेच काही अंशी अनुकरण करणारे आहेत असे आढळून येते.

अशा अगाध, सुख स्रोत असलेल्या सनातन धर्माचे अवलंबन करून सर्व मानवजात मोक्षाकडेच म्हणजे परमात्मसुखाप्रत जावो व अखंड सुख मिळवो हे या मानव जीवनाचे ध्येय होय.

– श्रीधर संदेश (अधिक चैत्र १८८६)
सन १९६४

home-last-sec-img