Literature

जीव कर्माप्रमाणे होतो

जीव वासनामय असतो. वासनेप्रमाणे त्या त्या सुखसंस्कारांच्या ठिकाण त्याचा निश्चय होतो. त्या निश्चयाप्रमाणे त्याच्या प्राप्तीकरितां तीं तीं कर्मे तो करतो व त्याचे त्याचें फळ भोगतो. यथाकारी यथाचारी तथा भवति । साधुकारी साधुर्भवति पापकारी पापो भवति पुण्यः पुण्येन कर्मणा भवति पापः पापेन इति । (बृ.अ. ४ ब्रा. ४-५)

–कर्माप्रमाणे व आचरणाप्रमाणेच जीव बनतो. सत्कर्मे करणारा सच्छील व सज्जन होतो. दुष्ट कर्मे करणारा दुःशील व दुर्जन होतो. पुण्यकमांनी पुण्यात्मा व पापकृतींनी पापात्मा बनतो.

तदेव सक्तः सह कर्मणैति लिंगं मनो यत्र निषिक्तमस्य । प्राप्यान्तं कर्मणस्तस्य यत्किंचेह करोत्ययम् ॥ तस्माल्लोकात्पुनरैत्यस्मै लोकाय कर्मण इति नु कामयमानः । (बृ. अ. ४-४-६)

— जीवाचें मन जिथे तिथे गुंतलेलें असतें, त्याच्या आसक्तीने तें तें कर्म तो करतो. त्या त्या कर्माचें फल अनुभवण्याकरितां त्या त्या लोकास जातो व कर्मफल भोगून संपेपर्यंत तिथे राहातो. त्या त्या लोकींचें सुख अनुभविण्या करितां तो तो देह त्याला प्राप्त होतो. त्या त्या देहानें त्या त्या लोकींचें कर्म प्राप्त सुख अनुभविल्याप्रमाणें परिक्षीण होत होत संपूर्ण नष्ट झाल्यानंतर त्या त्या लोकांतून भोगाच्या इच्छेनें पुन्हां कर्म करण्यास या कर्मभूमीस येऊन पोहोंचतो. येथें कर्माप्रमाणें तो नीचोच्च योनींतून जन्म घेतो, नीचोच्च जातीचा होतो. देहसुखाच्या वासनेने बाह्य पदार्थोपभोगाची इच्छा असेतोपर्यंत तो या जन्ममरणाच्या रहाटगाडग्यांत सांपडून असतो.

home-last-sec-img