Literature

ज्येष्ठ वद्य अमावस्या

ह्या विद्युतदीपाकडे पहा. बाहेरून कांचेचे आवरण आहे व आत सुक्ष्म तारांचे जाळे आहे एवढेच आपणांस दिसते.परंतु त्यांत प्रकाश उत्पन्न करणाऱ्या वस्तूची शक्ति मानवदेहातील चैतन्याप्रमाणे अदृश्य असली तरी तिचे अस्तित्व नाकारता येणार नाही. ‘ गमागमस्थं गमनादि वर्जितम् | ‘ अशी ही शक्ती आहे.आकाश कोठे ही जात नाही पण जाण्यायेण्यामध्ये आकाश असतेच. आकाश अखंड आहे तसेंच आपल्या देहातील चैतन्य कोठेही जात नाही व येत नाही पण ते सर्वव्यापी व अखंड आहे.

देहातील चैतन्य एकदा निघून गेले म्हणजे तेथे काय शिल्लक रहाणार? मातीच, मृण्मय शरीर. असे असले तरी मुर्ख मनुष्य दिव्य चैतन्यासाठी प्रयत्नशील न रहाता,चैतन्याची जाणीवही न ठेवता, दृश्य मृण्मय शरीरासाठी रात्रंदिवस खपत असतो. शरीराला श्रृंगारतो, शरीर सुखासाठी धडपड करून त्यांतच समाधान मानतो व शेवटी मृत्युची शिकार बनतो. पण देहांतील अनंत, अनादी, केवल शक्तीरूप, स्फुरणरूप अशारितीने तेवत असणाऱ्या आत्म्याची जाणीव त्यांना नसते. त्या आत्मशक्तीचे स्फुरण नसल्यास मन व इंद्रिये असूच शकत नाही आणि बाह्य जगाचाही संबंध असू शकत नाही तसेच सृष्टीही असू शकत नाही. बाह्यवस्तू व त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखादी भावना यांची जाणीव आत्मशक्तीच्या स्फुरणामुळे होते. स्वप्नसृष्टीत वरीलपैकी काहीतरी प्रत्यक्ष असते काय ?

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img