Literature

ज्येष्ठ वद्य अष्टमी

अमृताच्या एक बिंदुमात्र सेवनानें सर्व देव अमर झाले. अमर म्हणजे जरामरणरहीत त्यांना म्हातारपण नाही व मृत्युही नाही. पण परमात्म्याच्या ध्यानादी गोष्टी अमृतापेक्षाही श्रेष्ठ होत. अमृतसेवनांने देवता जरामृत्युरहीत होऊन नित्य तरूण व सकल ऐश्वर्यसंपन्न झाल्या. पण हे अमृत म्हणजे दुसऱ्या अमृतसागरातील एक थेंब मात्र म्हणजेच महाअमृताचा अंशात्मक गुणधर्म असलेले आहे. हे सापेक्षक असल्याने नाशवंतच असे श्रुती म्हणते. अमृत जर नाशवंत असेल तर त्याने अमरत्व मिळणे कसे शक्य होईल ? आणि मग खरे अमृत कोणते ? हा प्रश्न पुढे येतो.

देवलोक अमर आहे असे म्हटले जात असले तरी त्यांनाही अधःपतन व मृत्यु आहे. मानव दिर्घायुषी झाल्यास शंभरवर्षे जगतो त्याचप्रमाणे देवताही शंभर वर्षेच जगतात. परंतु त्यात फरक आहे. देवांच्या आयुर्गणनेप्रमाणे देवांचे आयुष्यमान आणि मानवाच्या आयुर्गणनेप्रमाणे मानवाचे आयुष्यमान त्यांच्या त्यांच्या गुणकर्मानुरूप दीर्घ किंवा अल्प असते. म्हणून मानवाप्रमाणे देवांनासुध्दा मृत्यु टाळता येत नाही. केवळ भगवत्-साक्षात्कार ज्यांना झाला आहे त्यांच्या बाबतीतच ‘ अतिमृत्युमेति | ‘ असे म्हटले आहे. ज्यांना अमर व चिरसुखी व्हावयाचे आहे त्यांनी ‘ तमेवं विदित्वा ‘ परमात्मस्वरूप यथार्थत्वाने ओळखले पाहिजे व त्यासाठी मुख्यमार्ग म्हणजेच ‘ भगवद् आराधना ‘

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img