Literature

ज्येष्ठ वद्य एकादशी

मनुष्य आपले जुनें फाटके कपडे फेकून देऊन नवीन धारण करतो त्याप्रमाणे आत्मा आपल्या जीर्ण शरीराचा त्याग करून नव्या शरीरांत प्रवेश करतो असे म्हटल्यावर शरीर व आत्मा एकच आहेत असे सिद्ध होईल काय ? या बाबतीत ‘ शरीर नाश पावतें पण त्यातील आत्मा नाश पावत नाही’ असे उपनिषदातील एक वचन आहे. नाशरहित असलेला ‘मी’ योग्य प्रमाणाने समजून घेतला पाहिजे. देहात मीपणा असणे अयोग्यच कारण देहास मरण आहे. ‘मी’ देह नसून त्यातील आत्मा ‘मी’ आहे हें समजणे विवेकीपणाचे लक्षण होय. आत्मा म्हणजेच परमात्मा व परमात्मा म्हणजेच आत्मा. आत्मा, परमात्मा हे पर्यायसूचक आहेत. हे संपूर्णपणे जाणल्यास आपण सर्व अमर होऊ म्हणजेच परमात्मस्वरूप होऊ.

शुद्ध नारायणस्वरूपी परमात्मा एकमेव असून तो सर्वजगव्यापी आहे. त्याच्याशिवाय इतर दुसरे काहीही नाही. अवतारादि हे भक्तांच्या भावनेने कल्पिले आहेत. रामकृष्णादी स्वरूप शिव, विष्णू, गणपती यांच्या मुर्ती हे सर्व आदिनारायणरूपी परमात्म्याची रूपे होत. भगवंताने भक्तांसाठी धारण केलेली रूपे म्हणजेच अवतार. ती रूपे आपापली कामे संपवुन अदृश्य झाली आहेत.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img