Literature

ज्येष्ठ वद्य त्रयोदशी

सर्व प्राणीमात्रामध्ये असलेले नारायणस्वरूप सर्व विश्वास कारणीभूत आहे. त्याकडे परमार्थदृष्टीने पाहिल्यास अकारण परब्रम्हस्वरूप नारायणच होय.

निरनिराळ्या रूपाने नटलेल्या या विश्वाच्या उत्पत्तीस मायाच कारणीभूत आहे. मायेच्या शक्तीला असाध्य असे काहीच नाही. माया तिला हवे ते, हवे तेव्हा निर्माण करू शकते. यामुळे जगाच्या उत्पत्तीस माया कारणीभूत आहे की नारायण ? अशी शंका येणे स्वाभाविकच आहे. तसेच नारायण सर्वत्र व्यापलेला असल्यामुळे जगांतील सुखदुःखात नारायण भागीदार आहे काय ? अशीही शंका येईल. त्याला ‘मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् |’ माझ्या आश्रयाने माझ्या प्रकाशांतच मायेला चेतना मिळून चराचर सृष्टी निर्माण होते’ असे भगवंताचे उत्तर आहे. माया ही छायेप्रमाणे जड आहे. छायेचा आश्रय जसा देह तसा मायेचा आश्रय नारायण म्हणजेच परब्रह्म होय.

मायेला ‘नार’ असेही नांव आहे आणि मायेचा आयन म्हणजेच आश्रयदाता तो नारायण होय. छाया विकारी आहे पण परमात्मा अविकारी आहे. देहाची छाया कधी लांब तर कधी लहान अशी देहाप्रमाणे लहान- मोठी असू शकते. छाया ही स्थान, काल यानुरूप बदलत असते. छायेचा आकार, विकार, रंग यांचा शरीराशी संबंध नसतो. त्याप्रमाणे मायेच्या विकारांनी उत्पन्न होणाऱ्या सुखदुःख यांचा नारायणाशी संबंध नसतो.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img