Literature

ज्येष्ठ वद्य द्वादशी

मानवास होणारी सर्व दुःखे स्वयंप्रकाशी अद्वितीय अशा परमात्म्याची जाणीव नसल्यानेच उद्भवतात. या दुःखनिवृत्तीसाठी ‘ त्या परमात्म्याचे स्वरूपाचा शोध घ्या व त्याचा मनःपूर्वक अभ्यास करा ! ‘ असा श्रुतिमातेचा उपदेश आहे. तसेंच आपण त्या परमात्म्यास कोठे शोधावयाचे व तो कसा सापडणार ? या प्रश्नालाही श्रुतिमातेने उत्तर दिले आहे.

आपल्या दृष्टीच्याद्वारे दिसून येणाऱ्या सर्व वस्तु व प्राणिमात्र नारायणस्वरूप होत. आता दिसत असलेले हे स्वरूप पुर्वीही होते व पुढेही राहणार. भुत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांत दिसणाऱ्या गोष्टी, त्या पाहणारा व समजून घेणारा हे तिन्ही नारायणस्वरूपच होत. नारायण या शब्दाचा अर्थ ‘ नराणाम् समूहः नारः, तस्य आयनम् आश्रयः नारायणः ‘ नरांचा समूह म्हणजे नार व त्यास आश्रयभूत असणारा तो नारायण. सर्व प्राणिमात्रांत व सर्व वस्तूंत आंतून बाहेरून सर्वत्र नारायण व्यापलेला आहे. त्याला सर्वसाधारण उदाहरण द्यावयाचे झाल्यास घटाचे उदाहरण देता येईल. घटांत हवा भरलेली आहे. ती हवा व घटाबाहेरील हवा आपण वेगळी समजतो कां ? मोठ्यां भांड्यातील पाणी तांब्याने काढल्यास तांब्यातील पाणी मोठ्या भांड्यातील पाण्यापेक्षा निराळे आहे असे आपण म्हणू शकतो का ? तांब्यातील पाणी पुन्हा मोठ्या भांड्यात ओतल्यास ते एकत्र होईल की नाही ?

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img